परिसर आणि आपण

दिंनाक: 02 Feb 2017 15:38:29

 

दयाळ पक्षी

सध्याच्या मोठमोठ्या हौसिंग कॉम्प्लेसमध्ये शोभेकरता झाडं लावली जातात. एवढंच नव्हे, तर कुठलंही झाड कुठेही लावलं जातं आहे. त्याचं रोपण करताना जागा किती आहे, ते नंतर किती मोठं होणार आहे, आसपास राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होणार आहे की नाही? या कशाचाही विचार केला जात नाही. असा कोणताही विचार न करता गुलमोहर, चाफा, कांचन आणि सुबाभूळ, म्हणजे ज्यावर कुठल्याही पक्षांना घरटं करता येणार नाही, अशी झाडं लावली जातात.ही झाडं खूप वाढली, तर महापालिकेची माणसंत्यांचा पूर्ण सफाया करून मोकळी होतात. त्यांचा फक्त सांगाडा उरतो. कधी कधी आंब्यासारखी झाडंही लावली जातात, पणशेजारीशेजारी किमान ४ ते ५ रोपं. गर्दीमुळे यातलं कुठलंच रोप नीट वाढत नाही.निसर्गाचं संवर्धन करणंही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ती बजावण्यासाठी अगदी लगेच एखाद्या जंगलामध्ये किंवा टेकडीवरच गेलं पाहिजे असं नाही. हा एक निव्वळ गैरसमज आहे. याची सुरुवात आपण आपल्या सभोवतालच्या परिसरापासूनही करू शकतो. अगदी आपल्या घराच्या आसपास अनेक पक्षांची वसतिस्थानं असतात. आता हे पक्षी आपल्या वस्त्या कुठे करू शकतील? त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. कारण झाडं कापून त्यावर सिमेंटची जंगलं वाढू लागली आहेत. टेकड्यांवरही मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. टेकड्या फोडून, त्यावर ‘so called eco homes / townships’ उभारल्या जाता आहेत. कुणालाही न विचारता झाडं कापली जातात आणि कुणालाही न विचारता नको ती झाडे लावली जातात. हे आताचं वास्तव आहे.आजकाल निसर्गाचा विचार न करता पडीक जमिनी किंवा झाडं तोडून हौसिंग कॉम्प्लेस बांधले जातात आणि तिथले पशु-पक्षी बेघर होतात. त्यामुळे अशा ठिकाणी जर स्थानिक झाडं लावली, तर त्यांना निवाऱ्यासाठी जागा मिळेल. बकुळ, कदंब यांसारखी फुलझाडं; आंबा, फणस, जांभूळ, उंबरयांसारखी फळझाडं;हिरडा, बेहडा यांसारखी काही औषधी झाडं;आपटा, तामण (आपले राज्यपुष्प)ही झाडं कधीही लावली जात नाहीत.तामण हे महाराष्ट्राचं राज्यपुष्प आहे, हेसुद्धा आपल्याला माहीत नसतं. फार कमी ठिकाणी हे पाहायला मिळतं. तामण बहरला की, इतका सुंदर दिसतो की, त्यापुढे गुलमोहरही फिका पडेल. स्थानिक झाडांवर पक्षीसुद्धा घरटी करतात. या सगळ्याचा विचार न करता सोसायटीमध्ये गुलमोहर आणि (उंदिरमारी) ग्लिरीसिडिया लावला, तर पक्षी कसे वाढतील? तिथे फक्त कबुतरेच दिसतील. त्यांची प्रजा आणि त्यामुळे पसरणारे रोग दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि त्याचबरोबर त्यांना घालवण्याचे उद्योगही. स्थानिक झाडं लावल्याने परिसंस्था (Ecosystem)वाढायला मदत होते. फुलपाखरं काही विशिष्ट झाडा-झुडुपांवरच अंडी घालतात. त्या अंड्यांवर इतर कीटक येतात. त्या कीटकांमुळे पक्षी यायला सुरुवात होते. वटवट्यां (Ashy Prinia),वेडा राघू (Green bee-eater), चीरक पक्षी (Indian Robin), चष्मेवाला (Oriental White-Eye), ठिपकेवाली मनोली(Scaly-breasted Munia)यांसारखे पक्षी येऊ लागतील.

मुनिया - ठिपकेवाली मनोली

 

कबुतरांची संख्या कमी होणार नाही, पण किमान इतर पक्षांना यावंसं तरी वाटेलं. चिमण्या कमी होत आहेत असं आपण म्हणतो; पण त्या वाढाव्यात म्हणून काहीच केलं जात नाही. सांगा बरं, गुलमोहोरावर किती पक्षी घरटी करतात? सुबाभुळीचासोसायटीमध्ये नक्की काय उपयोग होऊ शकतो? बघा विचार करा. तुमचं तुम्हीच ठरवा, तुम्हाला गाड्यांच्या हॉर्ननी सकाळच्या साखरझोपेतून जागं व्हायचं आहे की, पक्षांच्या किलबिलाटानं!!