निवडणूक प्रक्रिया समजावून देताना

रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यानं निवडणूक प्रचार जोरात चालला होता. अनेक पक्षांच्या रॅली विनयच्या घरासमोरून जात होत्या. विविध पक्षांचे झेंडे, चिन्ह विनय बारकाईने पाहत होता. रॅलीत दिल्या जाणाऱ्या घोषणांची त्याला गंमतही वाटत होती. हे सारं पाहत असताना शेजारीच उभ्या असलेल्या आईला त्यानं विचारलं, ‘‘तू कोणाला देशील गं मत?’’ 

आई हसली अन् म्हणाली, ‘‘अरे विनय आपलं मत गुप्त असतं. आपण कोणाला मत देणार हे असं सांगायचं नसतं.’’
‘‘गुप्त मत? ते कसं आणि का?’’
‘‘अरे! आपल्या देशाची निवडणूक पद्धत आहे ही. गुप्त मतदान करून ज्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं मिळतील, तोच उमेदवार निवडून येतो.’’
‘‘अगं, पण हे निवडून आलेले लोक काय करतात? त्यांना निवडून का द्यायचं?’’ 
‘‘ते आपले म्हणजे जनतेचे ‘लोकनियुक्त प्रतिनिधी’ म्हणून काम करण्यासाठी निवडून दिले जातात.’’
‘‘पण ते करतात काय?’’
‘‘हे लोकप्रतिनधी ज्या भागात निवडून येतात, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पाणी, रस्ते, चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं, ही त्यांची जबाबदारी म्हणजे त्याचं कामच असतं. आपल्याला ज्या नागरिकांनी निवडून दिलं आहे त्यांच्यासाठी उत्तम शिक्षण, चांगल्या दळणवळणाच्या सोयी देण्यासाठी ते प्रयत्न करत असतात.’’
‘‘म्हणजे आई, निवडून आलेले हे लोक आपल्याला सोयी-सुविधा देतात?’’
‘‘हो! तसंच. म्हणजे बघ हा.. आपल्या देशातील नागरिक सरकारला ‘कर’ देतात. आपण बाहेर जातो, तेव्हा काही रस्त्यांवर टोल, पार्किंगचे पैसे देतो. असेच अनेक वेगवेगळ्या करातून सरकारकडे काही पैसा जमा होतो. त्यातील काही पैसा (निधी) लोकप्रतिनिधींना त्या भागातील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी दिले जातात.’’
‘‘म्हणजे सरकार त्यांना निधी देते.’’
‘‘हो...निवडून आलेले लोकप्रतिनीधी आपल्या भागातील रहिवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून सरकारकडून अधिक निधी मंजूर करून त्यातून आपल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत असतात. हेच त्यांचं महत्त्वाचं काम असतं.’’ 
‘‘कळलं का आता?’’, आई विचारते.
‘‘हो गं! पण, मग आपल्या शहरात तर चांगले प्रतिनिधी निवडून यायला हवेत ना?’’
‘‘बरोबर! आणि त्यासाठी आपल्या शहरातील सर्व नागरिकांनी मतदान करायलाच हवं.’’
‘‘सर्वांनी मतदान करायलाच हवं? का?’’
‘‘अरे, बघ हं... तुला एखाद्या परीक्षेत प्रत्येक विषयात एक-एक गुण कमी मिळाला तर तुझ्या एकूण गुणांवर त्यांचा परिणाम होऊन तुला कमी टक्के मिळतात ना! तसंच एक-एक मतानं आपल्याला चांगला प्रतिनिधी मिळून आपल्या गावाचं, शहराचं आणि आपल्या देशाचं भविष्य बदलू शकतं, बरं का!’’
‘‘भविष्य बदलतं? आई मतदानाला एवढं महत्त्व आहे?’’
‘‘हो! लोकशाही व्यवस्थेत मतदान करणं सर्वांत महत्त्वाचं आहे. म्हणूनच तर मतदान करणाऱ्या व्यक्तीला ‘मतदार राजा’ असं म्हणतात. सकाळपासून एकतोहेस ना! मतदार राजा जागा हो!...’’
‘‘आई, मी कधी होणारा गं राजा?’’, इति विनय.
‘‘तू अठरा वर्षांचा झालास की, तुही राजा होशील! म्हणजे तुलाही मतदानाचा अधिकार मिळणार.’’
‘‘पण विनय फक्त राजा होऊन उपयोग नाही बरं... राजासारखं काम पण करायला हवं.’’
‘‘म्हणजे’’
‘‘म्हणजे...मतदान करणं हा जसा आपला अधिकार आहे, तसचं ते आपलं कर्तव्य पण आहे. देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणं आपलं पहिलं कर्तव्य आहे.!’’
‘‘म्हणजे जसं वाहतुकीच नियम पाळणं आपलं कर्तव्य आहे. तसंच मतदान पण ना!
‘‘हो.’’
‘‘आई मला राजा व्हायला अजून पाच वर्षं आहेत... पण मला जेव्हा मतदानाचा अधिकार मिळेल, तेव्हा मी चांगला ‘राजा’ म्हणजे चांगला नागरिक होईन!! ’’
- रेश्मा बाठे