जादूची टोपी 

दिंनाक: 17 Feb 2017 13:08:46


 

एका गावात एक वृद्ध गृहस्थ राहत असे. त्याला तीन मुलगे होते. त्यातल्या मोठ्या दोघांची लग्नं झाली होती. धाकटा अजून लहान होता. आपण आता फार दिवसांचे सोबती नाही हे त्या वृद्धाच्या लक्षात आलं तेव्हा त्याने आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावलं आणि आपल्या संपत्तीची त्यांच्यामध्ये वाटणी करून टाकली. आपली सर्व शेतजमीन आणि बागाईत त्याने मोठ्या मुलाला दिली, मधल्याला सगळी गुरंढोरं दिली आणि धाकट्या गुणीरामला फक्त एक टोपी दिली. त्या टोपीत एक विलक्षण गुण होता. ती टोपी घातली की माणूस अदृश्य होत असे!
पुढे थोड्याच दिवसांत तो वृद्ध गृहस्थ मृत्यू पावला. वडिलांच्या मृत्यूनंतर तिघे भाऊ एकत्रच राहत असत. मोठे दोघेजण आपापल्या कामात असत. गुणीरामवर मात्र कामाची जबाबदारी नसल्याने तो आपला वेळ मौजमजेत घालवत असे. तो होताही मोठा चलाख. त्यामुळे आपल्या भावांचा, गावकर्‍यांचा तो फार लाडका होता.
पंरतु भावांच्या बायकांना मात्र गुणीराम आवडत नसे. त्यांना वाटे आपल्या नवर्‍यांच्या कष्टावर याची मजा चालली आहे. त्यामुळे त्या त्याला सारख्या घालूनपाडून बोलत असत. भावांच्या नकळत त्याला त्रास देत असत.
या जाचातून कायमची सुटका करून घेण्यासाठी एके दिवशी गुणीरामने घर सोडलं. त्यानंतर कितीतरी दिवस-रात्र तो चालत होता. दम लागला की विश्रांती घ्यावी, झाडावरची फळं, कंदमुळं खाऊन गुजराण करावी आणि पुन्हा चालावं, असं करत गुणीराम एका मोठ्या शहरात आला.
त्या शहरात एक राजा राज्य करत होता. त्याला एक राणी होती. राजा आणि राणी पोटच्या पुत्राप्रमाणे प्रजेचा सांभाळ करत असत. त्यामुळे प्रजा सुखी होती.
नाही म्हणायला प्रजेला एक दु:ख अटळ होतं. त्या शहराबाहेर एक मनोरा होता आणि त्या मनोर्‍यात एक चेटक्या आणि एक चेटकीण राहत असत. ती दोघं मोठी सामर्थ्यशाली होती. दर अमावस्येच्या रात्री त्यांच्या मनोर्‍यात सर्व नागरिकांचा दरबार  भरत असे. या दरबारात उपस्थित राहून सर्व नागरिकांना त्या चेटक्याला व चेटकिणीला आदरपूर्वक मुजरा करावा लागे. चेटक्यांच्या दृष्टीने जे गुन्हेगार असत त्यांना या दरबारात कडक शिक्षा केेली जात असे आणि या दरबारात कोणीच गैरहजर राहू शकत नसे. कारण कोणाचीही गैरहजेरी चेटक्याच्या ताबडतोब लक्षात येत असे आणि त्याला फटक्यांची शिक्षा मिळत असे.
परंतु राणी मात्र या दरबारात हजर राहत नसे. ती इतकी चांगली आणि दयाळू होती की, त्या चेटक्यांचं चेटूक तिच्यावर चालत नसे. परंतु एकदा मात्र त्यांना चांगली संधी मिळाली. राणीच्या हातून एके दिवशी काही लहानशी चूक झाली होती. त्या दिवशी चेटक्याने चेटकिणीला फुलवाली बनवून राजवाड्यावर पाठवलं. राणीनं ङ्गुलं विकत घेतली आणि त्यांचा वास घेतला मात्र, एकदम तिचं नाक लांब होऊ लागलं. लांब होता होता नाक चांगलं एक फुटभर लांब झालं. राणीचं सौंदर्य लयाला गेलं. ती भारी विचित्र दिसू लागली.
याच सुमारास गुणीराम शहराजवळ आला होता. शहराजवळच्या चेटक्यांच्या मनोर्‍याच्या भिंतीला टेकून तो विश्रांती घेत होता. दिवसभराच्या वाटचालीमुळे तो थकला होता. कधी आपला डोळा लागला ते त्याला कळलंच नाही. कसल्याशा आवाजाने तो जागा झाला. पंख लावलेली चेटकीण त्याच्या दिशेने वेगाने येत होती. तिच्या हातात कसलंसं धारदार शस्त्र होतं. गुणीरामनं चपळाईनं आपली टोपी घातली तो अदृश्य झाला, त्यामुळे चेटकीण जी सरळ आली ती मनोर्‍याच्या भिंतीवर जोराने आदळली. तिला गुणीरामचा भयंकर संताप आला. दुसर्‍या दिवशी अमावस्येच्या रात्री भरणार्‍या दरबारात गुणीरामला चांगली अद्दल घडविण्याचा तिने निश्‍चय करून टाकला.
 सकाळ होताच गुणीरामने राजाची भेट घेतली आणि चेटक्या व चेटकिणीचं पारिपत्य करण्याची एक कल्पना राजापुढे ठेवली. शिवाय राणीचं नाक पूर्वीसारखं होणार होतं ते वेगळंच.
गुणीरामच्या सांगण्यावरून राजाने चेटक्यांना असं कळविलं की, आजच्या रात्रीच्या दरबाराला राणीसाहेब हजर राहतील. पण तत्पूर्वी त्यांचं नाक पूर्वीसारखं करण्यात यावं.
चेटक्यांना आनंद झाला. अनेक दिवसांची त्यांची इच्छा फलद्रूप होणार होती. म्हणून त्यांनी तत्परतेने राणीचं लांब झालेलं नाक पूर्वीसारचं करून टाकलं आणि ते आतुरतेने राणीची वाट पाहू लागले.
रात्री चेटक्यांच्या मनोर्‍यात नागरिकांचा दरबार भरला. चेटक्या आणि चेटकीण दगडात कोरलेल्या सिंहासनावर बसले होते. सारे नागरिक आपापल्या जागी उभे होते. आता फक्त राजपरिवार तेवढा यायचा होता.
थोड्या वेळात तोही आला. राजा, इतर मानकरी आणि बुरखा घेतलेली राणी, सगळा राजपरिवार सिंहासनापाशी आला आणि त्यापैकी एकेकाने चेटक्यांना मुजरा करायला सुरवात केली. मुजरा करायला म्हणून राणीने बुरखा बाजूला सारला तो गुणीराम सगळ्यांच्या नजरेस पडला. चेटक्यांनी अक्राळविक्राळ चीत्कार केला. चेटक्याने कमरेची तलवार काढली आणि गुणीरामवर झडप घातली. इतक्यात गुणीरामने जादूची टोपी डोक्यावर घातली आणि तो अदृश्य झाला. त्याला मात्र चेटक्या व चेटकीण दिसत होती. त्यामुळे आपल्या तलवारीने त्याने दोघांनाही कंठस्नान घातलं.
अशा प्रकारे गुणीराममुळे त्या शहराला  लागलेलं चेटक्यांचं ग्रहण नाहीसं झालं. प्रजा संतुष्ट झाली. राजाने गुणीरामला आपला सेनापती नेमलं, त्याला मोठा आलिशान वाडा बांधून दिला. त्यांनंतर गुणीरामने आपल्या भावांना व त्यांच्या बायकांना तिकडेच बोलावलं. कारण आता त्याचं राजकन्येशी लग्न ठरलं होतं.
- अनंत भावे