विज्ञान सप्ताह

दिंनाक: 17 Feb 2017 15:51:57
विज्ञान सप्ताह

विज्ञान हा शब्द खरं तर खूप उर्जा देणारा आहे. गर्भाशी नातं सांगत, त्यातील विज्ञानासोबतच सफर करत आपण या पृथ्वीतलावर येतो. आईच्या गर्भात रुजल्यापासून आपण विज्ञानाशी खऱ्या अर्थाने जोडले जातो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर विज्ञानाशी असणारं आपलं नातं दृढ होत जातं. शारीरिक विकासाच्या निरनिराळ्या टप्प्यांमध्ये साथ देणारं हे विज्ञान आपल्या मनाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्येही तितकंच आपल्या सोबतीला असतं. पण या सोबतीमध्ये कायमचं असते ती तार्किकता. अतार्किक असं काहीच नसतं. तार्किक भूमिका मांडणारं, ठोस प्रयोगांवर, सिद्धांतांवर आधारलेलं आणि सातत्य राखणारं विज्ञान आपली सोबत करतं ते स्पष्ट, प्रामाण्यवादी पुराव्यांच्या सशक्त भांडवलावर. यात कोणत्याही कपोलकल्पित गोष्टींना स्थान नाही, अगदी मनोवैज्ञानिक शास्त्रातही नाही. म्हणूनच विज्ञानाची सोबत काल, परिस्थिती सापेक्ष  नसते, ती नेहमीच काल, परिस्थिती निरपेक्ष असते. त्याआधारावरच विज्ञान आपल्याला ठोस, चिरंतन आणि  वैश्विक मूल्ये देतं. त्या चिरंतन, वैश्विक मूल्यांच्या आधारावरच कोणे एके काळी मांडल्या गेलेल्या गॅलिलियो, न्यूटन यांच्या विज्ञानाला आजही आपण प्रमाण मानतो. आजही त्याच विज्ञानाच्या सोबतीने वावरतो. त्या विज्ञानाचा अविभाज्य भाग असणाऱ्या तंत्रज्ञानाने आज खूप उंच भरारी मारली आहे. इसरोने एकाच वेळी सोडलेली याने आज अंतराळात यशस्वीपणे उड्डाण करत आहेत, याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेत आहोत.  

आज असे एकही क्षेत्र नाही ज्यात विज्ञान नाही, ज्या विज्ञानाचा आपण अविभाज्य भाग आहोत याचे भान आपण राखले पाहिजे. यासाठी आपण शिक्षणविवेक या संकेतस्थळावर विज्ञान सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहात देत आहोत विज्ञानविषयक लेख, आपल्याला माहीत असलेल्या आणि माहीत नसलेल्या अनेक वैज्ञानिक गोष्टी. त्यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. 
वाचा आणि कळवा.