घडण पालकत्वाची
 
 
 
 
 
 
नमस्कार, शिक्षण विवेकच्या ब्लॉगवर तुम्हाला भेटताना खूप आनंद होत आहे. 
पालकहो, आजकालची पिढी खूप स्मार्ट आहे असं सगळीकडे बोललं जात असताना आपण पालकांनी  मागे राहून कसं चालेल? आपल्यालासुद्धा स्मार्ट पालकत्व निभावण्याची वेळ आली आहे. नोकरी, व्यवसाय, इतर जबाबदार्‍या पार पाडताना  मुलांना दिला जाणारा वेळ खूप कमी झालाय. मग या वेळात जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण वेळ (Quality Time) कसा दिला जाईल, याचा विचार आता आपल्याकडून झाला पाहिजे. 
जन्माला आलेलं मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती असते. त्याला  माणूस म्हणून घडताना आकार देण्याचं काम मात्र बर्‍याच अंशी आपल्या पालकांच असतं. निदान पहिली ८  ते १० वर्षापर्यंत तरी आपली पालक म्हणून असलेली भूमिका खूप महत्त्वाची असते. मुलांच्या सर्वांगीण विकासात शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक, नैतिक या सर्वच बाबतीतला विकास  महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या विकासात पालक म्हणून आपण मुलांना कशी मदत करू शकतो, पालक म्हणून मोठं होताना आपली काय जबाबदारी आहे? या काही प्रश्‍नांची साध्या, सोप्या टिप्ससह उत्तरे मिळवू या या नवीन सदरात - ’घडण पालकत्वाची !’
--------------------------------
 
आईच्या पोटातच बाळाची शारीरिक वाढ सुरू होते. जन्मानंतर बाळाची शारीरिक गरज ओळखून काळजीवाहू पालकांनी एक जबाबदार भूमिका निभावण्याची आवश्यकता असते.
वाढ आणि विकास हे दोन शब्द समानअर्थी न वापरता त्यातला फरक जाणून घेणे आवश्यक आहे. 'वाढ' ही काही प्रयत्न न करताही होत राहणार आहे; पण ’विकास’  ही मात्र एक प्रक्रिया आहे, ज्यात आपली भूमिका मोलाची आहे. 
लहानपणी मान धरणे, पालथं पडणे, पुढे सरकणे, रांगणे, बसणे, उभे राहणे, चालणे हे टप्पे पहिल्या वर्षात महत्त्वाचे असतात. त्यानंतर तोल सावरता येणे, एखादी वस्तू हातात नीट धरता येणे, हातात धरून खाता येणे, पळणे या काही कृती 2 वर्षापर्यंत महत्त्वाच्या असतात. तर डोळे व हातांचा समन्वय साधणे, बोटांमध्ये एखादी बारीक वस्तू धरता येणे, खडू हातात धररून गारगोटया मारणे, जोरात पळणे, उडया  मारणे, चढणे, उतरणे, बागेतले खेळ खेळता येणे यांसारख्या काही कृती पाच वर्षापर्यंत करता येणे अपेक्षित असते.
सहा  महिन्यांचा अर्णव अजून मान धरत नाही, पालथं पडत नाही अशी त्याच्या आईची तक्रार, पाच वर्षाच्या आरोहीला अजून भरवावं लागतं, तिचं तिला जेवताच येत नाही, हे एवढं सांडून ठेवते, अशी तिच्या आईची तक्रार, तर सोहमला बागेत फक्त झोपाळाच खेळायचा असतो. बाकी काही त्याला आवडतच नाही, असं सांगणारी त्याची आई. 
आपण किती दिवस अशा नुसत्या तक्रारी करत राहणार आहोत. नाही न ! मग चला सगळे मिळून प्रयत्न करू या. आपल्या मुलांना त्यांच्या मोठं होण्यात मदत करू यात. शारीरिक विकासाला चालना देणार्‍या पुढील काही कृती मुलांकडून करून घेतल्यास शरीर सदृढता येण्यास व समतोल येण्यास मुलांना नक्कीच मदत होईल. 
 
 
शारीरिक विकासाला चालना मिळण्यासाठी--
 
वय
  • ० -३/४ महिने  - सारखं कडेवर न घेता खाली खेळू दया. नजर स्थिर होण्यासाठी स्थिर खेळणं दाखवा.
  • ६ - १० महिने - घरभर बाळाला फिरू दया. फक्त त्याच्यावर लक्ष ठेवा. पुढे सरकून, रांगून त्याला स्वतःला एखादया वस्तूपर्यंत पोचू द्या. 
  • २-३ वर्ष - डाळींबाचे दाणे खाणे, चुरमुरे खाणे, उड्या मारणे, पायर्‍या चढणे-उतरणे, पळणे इ. कृती  मुलांना मनसोक्तपणे करू द्या. 
  • ४-६ वर्ष - छोट्या छोट्या डब्यांची झाकणे लावणे, काढणे, कागद फाडणे, काकडी सोलणे, डाळी भरून ठेवणे, पीठ मळणे, मणी ओवणे, चित्र काढणे, रंगवणे, कणिक खेळायला देणे, त्यापासून वेगवेगळे आकार तयार करणे, पानं घेणे, गादीवर चादर घालणे यांसारख्या कृतीत मुलांना सहभागी करून घेवू या. 
  • ६-८ वर्ष - पोहणे, नाचणे, मैदानी खेळ, साफसफाई, ओरिगामी, भरतकाम, मॉडेल्स बनवणे मुलांमधल्या या छंदांना आवश्यक तेवढे प्रोत्साहन देवूया. 
 
शारीरिक विकास हा एकूणच व्यक्तिमत्त्व विकासातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. त्यादृष्टीने लहानपणापासूनच बाळाच्या या हालचालींकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवून विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास नक्कीच फायद्याचे ठरेल. कदाचित यातूनच मग आपला मुलगा/मुलगी एखादा निष्णात सर्जन, नृत्यकलाकार किंवा प्रसिद्ध खेळाडू बनू शकेल. 
 
 
- रश्मी पटवर्धन