जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘तोत्तोचान’चा मनाला भावेल असा सुंदर करणाऱ्या अनुवादक चेतना गोसावी यांनी ‘लेखक आपल्या भेटीला’ या ‘शिक्षणविवेक’ आयोजित मुलाखतीतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘तोत्तोचान’ हे पुस्तक वाचल्याचे या वेळी लक्षात येत होते. बुधवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ११.३० ते १२.३० या वेळात विद्यार्थ्यांनी चेतना गोसावी यांची प्रकट मुलाखत घेतली. इयत्ता ५ वी ते ९ वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. तोत्तोचानच्या लेखनापासून ‘ज्योतिर्मय’ या त्यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेविषयीचे प्रश्न विद्यार्थ्यांनी चेतना गोसावी यांना विचारले. या वेळेस चेतना गोसावी यांनी मुलांच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. मुलांना समजेल, त्यांना आकलन होईल अशी भाषा हे या मुलाखतीचे वैशिष्ट्य होते.

स्वतः एल.एल.बी.चे शिक्षण घेतले असूनही ‘तोमाई’ या तोत्तोचानच्या शाळेपासून प्रेरणा घेऊन ‘ज्योतिर्मय’ शाळा सुरू झाली, हे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. अनुवाद म्हणजे काय? या प्रश्नापासून सुरुवात झालेल्या मुलाखतीत विद्यार्थ्यांना जपानी संस्कृतीदेखील जाणून घेण्याची इच्छा होती. चेतना गोसावी यांना जपानी भाषेचे उत्तम ज्ञान आहे. त्यांच्या शिक्षकांकडून त्यांना जपानी पुस्तकाचा अनुवाद करण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी तोत्तोचान या जपानी पुस्तकाचा अनुवाद केला, तो त्यातील तोत्तोचानची आई व तिचे मुख्याध्यापक या व्यक्तिरेखा आवडल्यामुळे.

चेतना गोसावी यांना अनुवाद करताना विशेष भावलेला अनुभव म्हणजे जपानी हायकू (जपानी कवितेचा प्रकार). त्याची ठेवण न बदलता सात अक्षर, पाच  अक्षर, सात अक्षर अशा तीन ओळींची कविता त्यांनी मराठीत अनुवादित केली. ‘तोमाई शाळेसारखे कोणते उपक्रम आपल्या शाळेत राबवू शकतो?’ या उस्फुर्तपणे विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शाळेतील विद्यार्थी संख्या आणि भौतिक सुविधा याची अडचण लक्षात घेऊन ‘तोमाई शाळेतील लोकांसारखे विचार जरी आपण आत्मसात केले, तरी आपली शाळा आणखी छान होईल’; असे चेतना गोसावी यांनी सांगितले. जगातील जवळजवळ सर्व भाषांमध्ये अनुवादित झालेल्या ‘तोत्तोचान’ या पुस्तकातील मुख्याध्यापकांसारखे अनेक मुख्याध्यापक आहेत. त्यांना भेटून स्वतःकडे, समाजाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, हेही त्यांनी आवर्जून सांगितले. विद्यार्थ्यांना संदेश देताना चेतना गोसावी म्हणाल्या की, माणूस म्हणून मोठ्ठ होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आपोआप आपण प्रगती करू शकतो.

शिक्षिका ऋचा कुलकर्णी यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी अनेक छान प्रश्न विचारले. या प्रश्नात कोठेही कृत्रिमता नव्हती. अगदी सर्व मुलांना पडतील असेच प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपात विचारले गेले. मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी व शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. शिक्षणविवेक प्रतिनिधी चारुता प्रभुदेसाई व सुहास कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची तयारी उत्तम केली होती. मुलाखत कशी घ्यावी याचे प्रशिक्षण या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले.

मुलांना साहित्यिकाची ओळख व्हावी, त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वात बहुश्रुतता यावी, त्यांना जगण्याचे संवेदनशील भान यावे यासाठी हा उपक्रम शिक्षणविवेक शाळांसोबत करत आहे.

- रुपाली सुरनिस

[email protected]