वाचनसंस्कृती

 


अलीकडे एक्टिविटी सेंटर्समध्ये गोष्टी सांगणे, पुस्तक वाचनाचे प्रयोग यासाठीच होत असतात. आपण पूर्वीचं आठवून पाहिलं, तर आपल्या आजीनं पोथीचा सामूहिक पारायण मोठ्यानं वाचून केलेलं असतं. त्याहीआधी विविध पुस्तकांचं, ग्रंथाचं, सामूहिक वाचन हे संस्कृतीच्या विविध टप्प्यात झालेलं  आहे. तो संदर्भ लक्षात घेतला तरी वाचन संस्कृतीचं मूल्य आपल्या आणि पर्यायाने आपल्या मुलांच्या लक्षात येईल. 
 

फेब्रुवारीची १६ म्हणजेच  'वर्ल्ड रीड अलाऊड डे'.  पुस्तके मोठ्याने वाचून दाखवणे हा त्याचा अर्थ. खरं तर आजच्या संदर्भात बघायचं झालं, तर केवळ पुस्तकंच नाही, छापील काहीही वाचून दाखवणे असा अर्थ घ्यायला हवा. कारण आता केवळ पुस्तकं हे वाचनाचं माध्यम राहिलेलं नाही. इंटरनेटवरच्या माहितीपर वेबसाईट असोत, कोणत्याही सोशल नेटवर्किगवरचे लेखन असो, व्हॉट्सअपवरचे लेखन असो किंवा पुस्तकं असोत. वाचन हे वाचन आहे. वाचन आवडणाऱ्या व्यक्तीला वाचायला आवडतं, मग ते कोणत्याही माध्यमातले का असेना? पण  वाचनाची आवड या पातळीवर पोहोचायची असेल, तर ती आवड सुरू  कधी होते? विचार करून पाहिला, तर आपल्याला लागलेल्या इतर सवयी सरावाच्या होतात तेव्हाच, म्हणजेच अगदी लहानपणीच! 

 
लहानपणी याचा अर्थ खरं तर आपण बीजरूपात येतो, तेव्हापासून असाही होऊ शकतो. म्हणजे काही जण मानतात तसं आणि विज्ञानानेही ते सिद्ध केलंय. ( यावर तुमचं काही वेगळं मत असेल, काही अभिप्राय असतील, तर नक्की कळवा.) अगदी गर्भावस्थेपासून जर आईवडिलांना वाचनाची आवड असेल, तर बरेचदा ती आवड मुलांमध्ये येण्याची शक्यता जास्त असते. त्याला कारण केवळ गुणसूत्र नाहीत, तर परिस्थिती, आसपासचे वातावरण हेही आहेच. अलीकडे बऱ्याच गर्भसंस्कार शिबिरामध्येही सांगितले जाते की, तुम्ही बाळाशी बोला. जे आईवडील हे विश्वास ठेवून करतात, त्यांना त्याचे परिणाम दिसतात. त्या गप्पाच्या परिणामी मुले आईवडिलांशी अधिक चांगला संवाद साधतात. तसेच जेव्हा आईवडील मुलांना गोष्टी सांगतात, त्याचाही परिणाम असतो. काही पालक गर्भावस्थेत पुस्तके वाचून दाखवतात. अशा पालकाची मुले ही पुढे वाचनाकडे जाण्याची शक्यता अधिक असते. एकूणच मुलांची ऐकण्याची, लक्षात ठेवण्याची क्षमता, थोडक्यात शिकणं हे गर्भावस्थेतच सुरू होतं. हे झाले गर्भावस्थेतलं ...
 
बाळ प्रत्यक्ष  जन्माला आल्यावर आपण त्याच्याशी मातृभाषेत बोलतो, प्रेमाने जवळ घेतो. त्याच वेळी तो आपले आईबाबा, आजीआजोबा ओळखायला लागतो. त्याचं भाषेची ग्रहणक्षमता, माणसं लक्षात ठेवणं हे  शिकणं सुरू होतं. बाळांना झोपायला अंगाईगीत गाणे किंवा शास्त्रीय संगीत ऐकवणं हेही त्या ऐकण्याच्या, आवडण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. 
मूल जेव्हा डोळे उघडून पाहायला लागतं, तेव्हा  त्याला गडद रंगाच्या वस्तू पाहायला आवडणं सुरू होतं, तेव्हा जर त्याला चित्र असलेली पुस्तकं दाखवायला सुरुवात केली, त्याच्याबरोबर त्या पुस्तकांविषयी बोललं, त्याला ती पुस्तकं वाचून दाखवली, तर त्या मुलांमध्ये वाचनाची आवड विकसित होण्याची शक्यता जास्त असते. 
 
जेव्हा पुस्तक वाचून दाखवलं जातं, तेव्हा वाचताना पालकाने दिलेला वेळ, त्याचं तेवढा वेळ जवळ असणं, तो वेळ फक्त पाल्यासाठी देणं, त्याच्याशी संवाद साधणं, या सर्वांचा सकारात्मक परिणाम पाल्य-पालक संबंधात येतो. पालक पुढे नोकरीनिमित्ताने घराबाहेर जात असले, तरीही जर त्यांनी पाल्याला अशा प्रकारे गुणात्मक वेळ दिलेला असला, तर ते मूल कमी, पण गुणात्मक वेळातून समाधानी होतं आणि पालक-पाल्य संबंधही दृढ राहतात.
 
याशिवाय पुस्तक वाचून दाखवल्याने मुलांना पुस्तकामध्ये रस वाटू लागतो. नवीन काहीतरी जाणून घेण्याची आस वाटू लागते. त्यांना पुस्तक वाचनाची हळूहळू सवय नाही, तर गोडी  लागते. म्हणजेच पालकांनी, शिक्षकांनी  पुस्तक वाचून दाखवण्याचे सकारात्मक, गुणात्मक, विकासात्मक परिणाम दिसतात. 
 
याच वाटेनं आपणही  गेलं, तर वाचन संस्कृती संपत चालली आहे, ही ओरडही निश्चितच थांबवू शकू.  
 
- पल्लवी गाडगीळ.