पॉपकॉर्न योग

दिंनाक: 15 Feb 2017 12:22:14
अंगुलीशक्ती विकसक
ताणतणाव म्हटलं की, ती फक्त मोठ्यांचीच मक्तेदारी असा एक छान गैरसमज आपण करून घेतलेला आहे. पण अनेक शास्त्रीय संशोधनातून असं लक्षात आलंय की, अगदी छोट्या छोट्या मुलांनाही खूप प्रकारचे ताण असतात. अगदी रोजचं उदाहरण म्हणजे सकाळच्या वेळी मारुती व्हॅनवाले काका शाळेत घेऊन जायला येतात. ते वेळेवर येतील का? ही चिंता आईवडिलांइतकीच मुलांनाही असते . पुढे अभ्यास, परीक्षा, स्पर्धा याचे ताण तर त्यांना असतातातच. त्यावर अगदी छोट्या छोट्या मजेशीर योगक्रियांमधून पालक मुलांना अगदी घरबसल्यादेखील ताणमुक्त करू शकतील आणि अर्थातच मुलांना हे शिकवताना पालकांना स्वतःलाही खूप मजा वाटेल.
मला लहानपणापासून लाह्या फुटून पॉपकॉर्न तयार होताना बघणं खूप आवडायचं. फट फट आवाज करत, भांड्यातून टणाटण उड्या मारत बाहेर पडणाऱ्या लाह्या पाहताना मला खूप आनंद व्हायचा. मोठेपणी, मनात आनंदाच्या उकळ्या अश्याच फुटत असतील का? अशी गमतीदार कल्पनाही माझ्या मनात यायची.  आणि याच कल्पनेतून, मोठ्यांसाठी घेतले जाणारे सूक्ष्म व्यायाम, शक्ती विकसक मुलांनाही हसत-खेळत शिकवता येतील, असं वाटलं. बघू या बरं प्रयत्न करून .......
 
पॉपकॉर्न योग
 
सुरुवातीला मुलांना सांगावे “मित्रांनो, तुम्हाला पॉपकॉर्न आवडतात का? मग आज आपण खूप सारे पॉपकॉर्न  बनवणार आहोत, बरं का; पण मध्येमध्ये कुणी खायचे नाहीत... शेवटी सगळे मिळून आपण ते खाऊ या!"
पॉप....पॉप.... असा आवाज करत, जमिनीवर बसून खालील सर्व क्रिया स्वतः करत मुलांनाही करायला सांगाव्यात. 
१ ) पायाच्या बोटांची उघडझाप करणे
२ ) चवडे खाली वर करणे
३ ) गुडघे एकाआड एक खाली वर करणे
४ ) दोन्ही गुडघे एकत्र खाली वर करणे
५ ) हात बाजूला टेकवून सीट खाली वर करणे
६ ) दोन्ही खांदे एकत्र खाली वर करणे ( मोठ्यांसाठी याला स्कंधशक्ती विकसक म्हणतात)
७ ) एक एक खांदा आलटून पालटून खाली-वर करणे
८ ) हाताच्या बोटांची उघडझाप करणे ( मोठ्यांसाठी अंगुलीशक्ती विकसक )
९ ) मनगटे खाली वर करणे ( मोठ्यांसाठी मणिबंधशक्ती विकसक )
१० ) कोपर खाली वर करणे ( मोठ्यांसाठी कोह्नी किंवा कफोनीशक्ती विकसक )
११ ) बॉक्सिंग केल्याप्रमाणे एक एक हात जोरात पुढे नेणे आणि मागे आणणे ( मोठ्यांसाठी भूजबंधशक्ती विकसक )
१२ ) डोळे घट्ट मिटणे व मोठे उघडणे
१३ ) हनुवटी वर खाली करणे
१४ ) डोके वर खाली करणे
सर्व क्रिया करून झाल्यावर मुलांना सांगावे, “आपण आता हे पॉपकॉर्न सगळे मिळून खाणार आहोत बरं का! मोठ्या कागदावर आपण भेळ कालवतो तशी कृती सर्वांनी पॉप....पॉप.... असा आवाज करत करावी. नंतर पॉप....पॉप.... असा आवाज करत आपण बकाणे भरतो तशी कृती एका एका हाताने आलटून पालटून करावी .
या व्यायामातून, सर्व प्रकारचे छोटे आणि मोठे  सांधे मोकळे करणे, मान/डोळे यांचा ताण कमी होणे, विरुद्ध प्रकारच्या हालचालीतून सूक्ष्म स्नायूंना व्यायाम, मान/डोके हलवताना होणारी hypothalamus या मेंदूच्या भागाची हालचाल अशा क्रिया घडतात.
योग या शब्दाचा बाऊ न करता, कमी वेळात, हसत-खेळत आपल्याला मुलांच्या मनामध्ये योगाचे बीज पेरता येईल .
 
मनोज पटवर्धन