शब्दांचा डोंगर 

दिंनाक: 15 Feb 2017 11:32:00
 
गमतीतून भाषाज्ञान
 
अक्षर - अक्षरांच्या जोड्या लावणे. उदा.  म  - म , स  - स    याप्रमाणे . . .  
अक्षर  - शब्द    उदा. :  द - दसरा , दणकट , दरवाजा   
ग - गवत , गजरा , गणपती    
अक्षर - शब्द - वाक्य  उदा. : फ - फळ - फळ खातात - मला फळे आवडतात.   
                          (दोन, तीन शब्दांची वाक्ये) याप्रमाणे शब्दांची वाढ करत वाक्ये तयार करणे. 
 
क 
कपाट 
कपाट आहे. 
ते कपाट आहे. 
ते कपाट मोठे आहे. 
कपाटाचा रंग हिरवा आहे. 
त्या कपाटात पैसे ठेवले आहेत. 
कपाटात पैसे, कपडे व दागिने असतात. 
कपाटात सर्व वस्तू सुरक्षित राहण्यास मदत होते. 
 
 
 
नदी 
नदी वाहते. 
ती नदी आहे. 
ती नदी वाहत आहे. 
त्या नदीचे नाव नीरा आहे. 
नीरा नदीचे पात्र खूप मोठे आहे. 
नदीतून होडीने इकडून तिकडे जाता येते. 
नीरा नदीमुळे आसपासचा भाग सुपीक झाला आहे. 
नीरा नदीत मासे, खेकडे व इतर जलचर प्राणी आहेत. 
नदीच्या पाण्याचा उपयोग लोक पिण्यासाठी व शेतीसाठी करतात. 
या नदीचे पाणी कधीच आटत नसल्यामुळे लोकांना वर्षभर पाणी मिळते.  
 
बाग 
बाग बघ. 
बागेत फुले आहेत. 
बाग फुलांनी बहरली आहे. 
बागेतील फुले देवाला वाहतात. 
बागेत अनेक फुलांची झाडे आहेत. 
बागेतील फुलांचा गजरा, हार तयार करतात. 
बागेतील फुलझाडांना माळीबाबा पाणी व खत घालतात. 
बागेत फुलांवर रंगीबेरंगी सुंदर फुलपाखरे भिरभिरत असतात. 
बागेत गुलाब, जाई, जुई, जास्वंद, मोगरा व इतर फुलझाडे आहेत. 
 
अशाप्रकारे अक्षरावरुन शब्द, शब्दावरुन दोन शब्दांचे वाक्य, तीन शब्दांचे वाक्य, चार, पाच, सहा याप्रमाणे 
शब्द संख्या वाढवत - वाढवत विद्यार्थी वाक्ये तयार करु शकतात. यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढेल तसेच नाम, 
सर्वनाम, विशेषण, क्रियापद, वचन, लिंग यांचीही माहिती मुलांना नकळत समजेल. 
 
या खेळामुळे विद्यार्थी विचार करुन शब्दसंख्या वाढवतात व वाक्ये तयार करतात. बुद्धीला चालना देण्यासाठी 
या उपक्रमाचा उपयोग होतो. याप्रमाणे परिचित शब्द घेऊन अशाप्रकारचा शब्दांचा डोंगर करण्यास विद्यार्थी प्रवृत्त होतील 
व त्यांच्या शब्दसंपत्तीत भर पडेल. 
 
- कल्पना उत्तम आगवणे 
 (कल्पना आगवणे या साताऱ्याच्या नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.  )