शिक्षणविवेक आयोजित ‘हितगूज पक्ष्यांशी’ हा कार्यक्रम शनिवार दि. ११ फेब्रुवारी, २०१७ रोजी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड व न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल या दोन शाळांमध्ये  घेण्यात आला. या कार्यक्रमात पक्षीनिरीक्षक अमित पावशे यांनी विविध पक्ष्यांच्या १५७ स्लाईड्स  दाखवत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वतः काढलेली छायाचित्रे, ती काढतानाचे अनुभव, पक्ष्यांच्या हालचाली, त्यांचे जीवनमान, स्थलांतर या विषयाची सखोल माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. फुलपाखरं, पक्षी, जंगली व पाळीव प्राणी यांच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी  विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाल्या. ‘माळरान म्हणजे केवळ पडीक जमीन नसून ती अनेक प्राण्याच्या, पक्ष्यांच्या अधिवासासाठी महत्तवपूर्ण असतो’; हा ‘माळरान’ या संकल्पनेचा वेगळा अर्थ या वेळी विद्यार्थ्यांना कळला. मातीसारखा रंग असल्यामुळे सहजासहजी न ओळखता येणारी पक्ष्यांची घरटी पाहताना विद्यार्थ्यांची अचूक निरीक्षण शक्ती लक्षात येत होती. भांगपाडी मैना, गुलाबी मैना, तित्तर, खाटिक, कोतवाल, टिटवी, वटवट्या, हमिंग बर्ड, सूर्यपक्षी, लाल मुनिया, भारद्वाज, घुबड अशा अनेक पक्ष्यांची माहिती या वेळी विद्यार्थ्यांना मिळाली. प्रत्येक पक्ष्याचे वैशिष्ट्यपूर्ण नाव सांगताना, ‘ते नाव का पडले असावे’ याचाही तार्किक संबंध अमित पावशे यांच्या बोलण्यात येत होता. पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून दाखवताना ‘हे पक्षी आणि अमित पावशे गप्पा मारत असावेत,’ असा भास होत होता. पक्ष्यांचे जग, त्यांचे जीवन पाहता पाहता माणसाने केलेला निसर्गाचा विध्वंस देखील अमित पावशे यांनी कॅमेरात टिपला होता. जाळलेली माळराने, झाडे तोडून बांधलेली घरे यांमुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत, त्यामुळे हे पक्षी माणसांच्या घरांवर घरटी करतात, असे ही ते म्हणाले.   पक्ष्यांसाठी स्वतः तयार केलेले घरटे दाखवून ‘आपण पक्ष्यांसाठी घरटी बांधली, तर त्यात पक्षी येऊन राहू शकतात’, हेही त्यांनी सांगितले. दिव्याच्या खांबांवर राहिल्यामुळे, रस्त्याने चालताना वाहनाची टक्कर झाल्याने होणारे अपघात आणि त्यामुळे दुर्मीळ प्राणी-पक्ष्यांचे जाणारे जीव यांविषयी ऐकताना विद्यार्थ्यानाही वाईट वाटत होते. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी साध्या साध्या कृती आपल्याला रोजच्या व्यवहारात करता येण्यासारख्या असतात, त्या कृती या वेळी अमित पावशे यांनी  सांगितल्या.

न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या शाळेतील इ. ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमादरम्यान अनेक शंका विचारल्या. अनेक पक्ष्यांचे खाद्य, त्यांच्या घरट्यांची रचना यांविषयी प्रश्न विचारताना विद्यार्थ्यांची  उत्सुकता लक्षात येत होती. काही पक्ष्यांचे फोटो पाहून विद्यार्थ्यांनीच नावे सांगितली. सोसायटीच्या आसपास बघितले जाणारे काही पक्षी विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची त्यांच्याबद्दलची निरीक्षणे अचूक होती. मुख्याध्यापक नागेश मोने, शिक्षणविवेक प्रतिनिधी विकास पढेर, पर्यावरण विभाग प्रमुख शैलजा कोम्पेल्ली यांनीहीसक्रिय सहभाग घेतला.

न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इ. १ ली ते इ. ७ वीच्या विद्यार्थांनाही परिसरातील अनेक पक्षी ओळखता आले. सिंहगडाजवळ पाहिलेल्या पक्ष्यांविषयी त्यांनी अमित पावशेंशी चर्चा केली. प्रत्येक फोटो पाहताना ‘ओ...’ असा आश्चर्यकारक भाव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्राणी व पक्ष्यांच्या जगात जणू हे विद्यार्थी आणि शिक्षक हरवले होते. पक्ष्यांची वैशिष्ट्ये समजून घेताना शिक्षणविवेक प्रतिनिधी ज्योती पवार व सर्व शिक्षकांनी पक्षी वाचवण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. कार्यक्रमानंतरही विद्यार्थ्यांनी अमित सरांकडून अनेक शंकांचे निरसन करून घेतले.

पक्ष्याशी हितगुज  साधण्यात रमलेली मुले पाहण्यात आणि त्यांच्या अनेक शंकांमध्येच भावी पक्षी निरीक्षक दडले असल्याचे पाहणे अभूतपूर्व होते.

-रुपाली सुरनिस

[email protected]