इंग्रजीचा तास

दिंनाक: 13 Feb 2017 18:47:26
इंग्लिश सोपे करताना

देवेश पहिलीत होता. अभ्यासात तो खूप हुशार होता. पण भाषा विषय शिकवायला घेतला की, मात्र त्याला खूप झोप यायची. इंग्रजीमधील b,d,j,l हे सगळं त्याला डोळ्यांसमोर फिरतंय असं वाटायचं. सगळ्यात गोंधळ उडायला लागला. देवेशची आई त्याला खूप ओरडायची. त्यामुळे तर देवेश शाळेत जायचा कंटाळा करायला लागला. असं ओरडून काही उपयोग होणार नाही हे आईला मग लक्षात आलं. आई शाळेत त्याच्या स्नेहल टीचरना भेटायला गेली.

स्नेहल टीचरने देवेशच्या आईची त्याच्याविषयीची तक्रार ऐकून घेतली आणि त्या म्हणाल्या, ‘देवेशसारखाच दोन-चार मुलांचा तोच प्रश्‍न आहे. मला ते कळलं आहे. त्याविषयी मी तुमच्याशी बोलणारच होते. यावर मी एक प्रयोग करूपाहण्याचं ठरलेलं आहे. तुमची हरकत नसेल तर या रविवारी मी या मुलांना फिरायला जवळच्या टेकडीवर घेऊन जाणार आहे. चालेल का?’

देवेशला टेकडीवर नेऊन त्याचा भाषा आणि लेटर्सच्या बाबतीतला गोंधळ कसा कमी होणार, ते कसं काय सुधारणार, हे आईला नीटसं कळलं नाही. पण तरीही काहीही न विचारता त्यांच्यावर विश्‍वास ठेवून आई म्हणाली, ‘ठिक आहे, न्या. माझी काहीच हरकत नाही.

देवेशला हे कळल्यावर त्याला मजाच वाटली, पण टीचर, ओरडणार तर नाहीयेत ना?’, असं वाटूनही गेलं.

ठरल्याप्रमाणे रविवारी स्नेहल टीचर आणि देवेश,  प्रिया, अथर्व आणि इरा सकाळी टेकडीवर फिरायला गेले. सगळ्यांना तिथलं वातावरण खूपच आवडलं. गवतावर, झाडांच्या पानांवर छानपडलेलं होतं. पक्ष्यांच्या मंजूळ आवाजानं रस्त्यावरून चालताना कसं संगीत ऐकल्यासारखं वाटत होतं. मधूनच एखादा सूर्यपक्षी पानांवरील दव टिपून जात होता. एखादी खारूताई कुणीतरी घातलेले तांदळाचे दाणे टिपत बसलेली होती. देवेशला तर रोज इथं टीचरबरोबर फिरायला यावं असं वाटून गेलं. 

स्नेहल टीचर सगळ्या मुलांना म्हणाल्या, ‘आज, आपण एक खेळ खेळणार आहोत. अरे वा, सगळे खूश झाले. टेकडीवर येऊन खेळ. मस्तच. चारही जणांना त्यांनी एका झाडापाशी उभं केलं. दुसर्‍या बाजूला बसायला एक छान दगड होता. त्यावर त्या बसल्या. झाडाच्या पलीकडच्या बाजूला एक छोटं पाण्याचं तळं होतं. त्या म्हणाल्या, मी जेव्हा म्हणेन स्मॉल bतेव्हा सगळ्यांनी माझ्याकडे म्हणजे तुमच्या उजव्या हाताला धावत यायचं. मी स्मॉल d  म्हटलं की, तुम्ही तुमच्या डाव्या हाताला त्या तळ्याकडे पळत जायचं. किती सोप्पं आहे, असं सगळ्यांना वाटलं. प्रथम थोडासा सगळ्यांचा गोंधळ उडाला. पण हळूहळू त्यांना स्मॉल bम्हणजे उजवा हात आणि स्मॉल d  म्हणजे डावा हात हे डोक्यात पक्क बसलं. त्यांना या खेळात मजा यायला लागली. मग हळूहळू स्मॉल j,l असं घेऊन त्यांनी खेळ घेतला. त्यांच्याच समोरील झाडावर दोन चिमण्या बसल्या होत्या. त्या एकमेकांकडे चोच करून खात होत्या. पटकन देवेश म्हणाला, डावीकडची चिमणी स्मॉल bकडे पाहते आहे. उजवीकडची चिमणी स्मॉल dकडे बघते आहे. स्नेहल टीचर फक्त समाधानाने हसल्या. थोडा वेळ वेगळाच खेळ खेळून पाचही जणं घरी जायला निघाले.

चार-पाच दिवसांनी शाळेत इंग्रजीची डिक्टेशन टेस्ट होती. आईला नेहमीप्रमाणे टेन्शन आलं. देवेशला घेऊन आईनं लगेच स्पेलिंग शिकवायला सुरुवात केली. Cub, Tube, Curd अशी दोन-तीन स्पेलिंग्ज आईनं देवेशला लिहायला सांगितली. काय आश्‍चर्य, देवेश Cuनंतर काही सेकंदच थांबला आणि म्हणाला, ‘स्मॉल bम्हणजे उजव्या हाताला मी टीचरकडे पळत होतो. मग b काढताना स्टँडींग लाईन काढून उजवीकडे गोल काढून टाकावा. तसं काढल्यानंतर आईनं एकदम असंच केलं. तसंच त्यानं Curdचं पण स्पेलिंग बरोबर लिहिलं. याच्यामध्ये एवढा कसा फरक पडला हे आईला काही कळेना. टीचरबरोबर त्यादिवशी टेकडीवर जाऊन तुम्ही काय केलं? असं विचारल्यावर देवेश फक्त म्हणाला होता, ‘आम्ही खूप मजा केली, खूप खेळलो.  पण त्या दिवशीचा खेळ वेगळा होता हे देवेशच्या आईला समजलं. स्नेहल टीचरना कधी भेटते असं आईला झालं होतं.