संगीतातला आनंद

 

 

 

 

डॉ. पुरंदऱ्याचं ‘शल्य – कौशल्य’ पुस्तक वाचत होते. डॉ. पुरंदरे रक्त विरहीत (bloodless surgery)करण्यातले मान्यवर. म्हणजे ते इतक्या हलक्या हाताने आणि कौशल्याने शस्त्रक्रिया करत की, कमीतकमी रक्तस्त्राव होई. रुग्णला खूप कमी त्रास होई आणि फार रक्त देण्याची गरज पडत नसे. कुणीतरी एका मुलाखतीत त्यांना विचारलं, ‘’तुमाचा हात इतका हालका कसा?” एका क्षणात त्यांनी उत्तर दिलं, ‘’मी हार्मोनियम वाजतो त्यामुळे..’’ हार्मोनियम वाजवताना योग्य आवाजाच्या स्वरनिर्मितीसाठी बोटांचा वापर फार योग्य रीतीने व्हावा लागतो आणि भात्यांवरचा दाब पण म्हणजे दोन्ही हाताचा योग्य समन्वय असला तरच मधुर आवाज येतो. डॉक्टर म्हणाले, ‘’तसाच हातांचा वापर हलकेपणाने शस्त्रक्रियेच्या वेळी मी करतो.’’

काय कमाल आहे ना! कुठल्या कौशल्याचा कुठे उपयोग होईल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. डॉ.पुरंदरे तर महान होतेच... पण प्रत्येकानं कलांचा असा अर्थ जाणला तर? कित्येक प्रश्नांतून, अडचणीतून आपली सोडवणूक होऊ शकेल,तशी प्रत्येक व्यक्ती आपल्या परीनं ग्रेटच असते. कुणाला लहानपणापासून गाण्याचा गोड गळा, कुणाच्या हातात चित्र,रंगाची करामत,लहानशी थिरकणारी पावलं,नाटुकल्यात टाळी घेणारं काम,कुणाला गोष्ट रंगवण्याचं कसब,कुणाची खेळातली चपळता,स्टॅमिना...सगळंच हवहवसं.... कौतुकाचं.......असे गुण असणारे सगळेच कलाकार होतील,यशस्वी होतीलच असं आपण म्हणू शकत नाही.. एक मात्र खरं की, या  कला जशी लोकप्रियता मिळवून देतात, त्यापेक्षाही जगण्यातला आनंद देतात.... इतकाच नाही तर अभ्यासातही प्रगती घडवतात.

अमीर खानच्या ‘’तारे जमीन पर’ या सिनेमात चित्रात रमणारा मुलगा न्यूनगंडावर मात करताना पहिला आपण.

अगदी लहान वयापासून शिक्षक, पालक सगळ्यांनी लक्ष मात्र द्यायला पाहिजे. नक्की फायदा होतो...

माझ्या शाळेत एक मुलगी होती. ती खूप गेंगाणं आणि तोतरं बोले. मुली तिची टिंगल करत. ती सारखी माझ्या मागे लागे की मला गाण्यात घ्या. शाळेतल्या कार्यक्रमात,स्पर्धेत खूप मुली असत. एकदा वाटलं घ्यावं तिला, तिच्या आसपास माईक नसला म्हणजे झालं.... ती भयंकर खूश झाली. ती हुशार असल्याने तिचं गाणं पाठ असेच. इतर मुलींनीही चेष्टा करू नये म्हणून एकदा ती एकटी असताना तिला गाणं म्हणायला सांगितलं.....आणि मलाआश्चर्याचा सुखद धक्काच बसला...तिनं अत्यंत सुरेल, बिनचूक आणि महत्वाचं म्हणजे  नाकात किंवा तोतरे उच्चार न करता गाणं म्हटलं. गाणं म्हणताना तिचे दोषच नाहीसे होत... तिच्या आवडीच्या गोष्टीनं तिच्या दोषांवर मात केली.

इतका परिणाम होत असेल तर कलांना अनन्यसाधारण महत्त्व द्यायला हवेच ना!

मी दिलेली उदाहरणं जरी एकेका व्यक्तीची असली तरी स्वर,रंग,शब्द,अभिनय,खेळ साऱ्यांचे आहेत. मनाला आनंद देणाऱ्या या गोष्टी साऱ्यांच्या आहेत. ‘’मन आनंदी तर जीवन आनंदी’’

हा आनंद फक्त जगायलाच नाही, तर आरोग्य,आभ्यास,निरोगी समाज,यश या साऱ्यासाठीच उपयोगी असतो.

पालक,शिक्षक यांनी लहानपणापासून आपल्या मुलांमधले गुण ओळखून,फक्त अभ्यासाच ओझ न लादता काही नियम पाळत त्यांना मुक्त जगू दिलं पाहिजे.

अभ्यास,शिक्षणाचं महत्त्व आहेच... ते  प्रसन्न मनाने,आनंदाने करायचं असेल तर कलांचा हात सोडता काम नये, असं मला वाटतं.

  • -डॉ. माधुरी जोशी.
  • -[email protected]

    (लेखिका संगीत शिक्षण क्षेत्रात गेली ३५ हून अधिक वर्ष कार्यरत आहेत. संगीत शिक्षणात मुलांबरोबर त्यांनी विविध प्रयोग केले आहेत.)