छायाकल्प चंद्रग्रहण 

चांदोबा चांदोबा रुसलास का? माझ्याशी कट्टी फू केलीस का? किंवा चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी? ही आणि अशी अनेक गाणी आपण बालवाडीत असल्यापासून शिकतोय, गातोय. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चंद्राचं आणि आपलं वेगळंच नातं तयार होत असतं. मे महिन्यात खेळता खेळता उन्हाच्या कडाक्याने घामाघूम झाल्यानंतर, रात्री अंगणात चंद्राचं टिपूर पडलेलं चांदणं पाहात आजोबांच्या कुशीत झोपणं म्हणजे अहाहा.... हो की नाही?

चंद्राचं अंधार पडल्यावरही दिसणं, दर पौर्णिमा-अमावास्येला त्याचं त्याचं बदलत जाणारं रूप, त्याचं झाडामागे दडून बसणं, आपण गाडीतून जात असताना त्याचं दूरवर आपल्याला सोबत करणं या सगळयाचं आपल्याला अप्रूप असतं. पण या चंद्रालाही ग्रहण लागतं. काही ठराविक दिवशी, ठराविक काळात चंद्राचं रूपडं बदलत आणि तो काळवंडतो. हे काळवंडणं कधी पूर्णपणे असतं तर कधी अर्धं तर कधी अगदी थोडया स्वरुपात.

तुम्हाला माहिती असेलच की सूर्य ग्रहमालेच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या भोवती मंगळ, बुध, पृथ्वी, गुरू, शनी असे ग्रह फिरत असतात. आणि त्या त्या ग्रहाचे उपग्रहही त्यांच्याभोवती फिरतात. चंद्र हा परप्रकाशित ग्रह आहे पृथ्वीचा उपग्रह. पृथ्वी सूर्याभोवती आणि चंद्र तिच्या भोवती फिरताना काही वेळा एखाद्या पौर्णिमेला हे तीनही गोल सूर्य-पृथ्वी-चंद्र या क्रमाने एका रेषेत येतात. त्यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राला ग्रहण लागतं. ग्रहणं लागतं म्हणजे पृथ्वीने चंद्राचा जेवढा भाग आच्छादलेला असतो तो काळा दिसू लागतो.

आपण सूर्यप्रकाशात उभे राहिलो तर विरूध्द बाजूला आपल्याला सावली दिसते. पृथ्वीच्या दोन छाया अर्थात सावल्या पडतात. ज्या भागात सूर्यकिरण अजिबात येत नाहीत ती घनछाया(Umbra) आणि घनछायेच्या वरच्या आणि खालच्या बाजूस विशिष्ट प्रकारच्या कोनात असते ती उपछाया(Penumbra). या उपछायेत काही सूर्यकिरण पोचत असल्यामुळे ही छाया थोडी विरळ असते. पूर्ण चंद्रबिंब उपछायेतून पुढे जेव्हा घनछायेत येते तेव्हा होतं ते खग्रास चंद्रग्रहण. तेव्हा चंद्र काळसर दिसू लागतो. चंद्राने घनछायेत काही प्रमाणात प्रवेश केला असेल तर तेवढयाच भागावर पृथ्वीची सावली पडते आणि खंडग्रास ग्रहण होतं.

काही वेळा मात्र चंद्रबिंब पृथ्वीच्या उपछायेच्या कोनात येतं आणि पुढे घनछायेत न येता पुढे सरकून पृथ्वीच्या छायेतून बाहेरही पडतं, तेव्हा जे ग्रहण लागत त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. छायाकल्प चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र हा लालसर चांबूस दिसू लागतो. कारण सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे चंद्र हा पृथ्वीच्या उपछायेत येत असल्यामुळे त्या भागात सूर्यकिरण पोहोचत असल्यामुळे छाया विरळ असते. या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण(Penumbral Eclipse) म्हणतात.

मित्रांनो, तुम्हाला आज हे सगळं मुद्दाम सांगतेय कारण दि. १० फेब्रुवारी 2017च्या रात्री पौर्णिमा आहे व त्या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 11 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजून चार मिनिटांपासून सुरू होईल व 8 वाजून 23 मिनिटांनी संपेल. ६ वाजून 13 निमिटांनी हे ग्रहण स्पष्टपणे दिसेल.

आपल्या आजुबाजूला निसर्गात अनेक घडामोडी रोज दिसत असतात. त्यातल्या काही दिसून येतात तर काही नाही. त्यातल्या अनेकांना आपण धार्मिक तर्क जोडले आहेत. पूर्वीच्या काळी आजच्या इतकं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं. त्या त्या परिस्थितीनुसार घटनांचं विश्लेषण करून त्याला काही समजुती जोडल्या गेल्या. या घटनांमागील खगोलशास्त्रीय कारण आपल्याला माहीत नव्हतं. पण आता तसं नाही. या सगळया समजांपलिकडे जाऊन या नैसर्गिक बदलांचा उघडया डोळयांनी आपण आनंद घ्यायला हवा. ती संधी चालून येतेय शनिवारी पहाटे. फक्त त्यासाठी साखरझोपेतून बाहेर या आणि निसर्गाच्या या चमत्काराचा मुक्तपणे आनंद घ्या.

- मृदुला राजवाडे

[email protected]