अंतरंगातील मी

दिंनाक: 01 Feb 2017 14:08:26
 
Antarangatil mi
 

बालपणापासूनच मुलांना एक प्रश्‍न सातत्याने विचारला जातो. तो म्हणजे, ‘तुम्ही मोठेपणी कोण होणार?’ हा. मुलेही लहानपणापासून, स्वत:ला काहीही कळत नसताना, आपल्या आई-वडिलांना आपण जे व्हावेसे वाटते, तेच होणार असे ठामपणे सांगत असतात. मी डॉक्टर होणार, मी शिक्षक होणार, मी इंजिनिअर होणार, मी चित्रकार होणार अशी उत्तरे मुलांकडून मिळत असतात. पण, अशी उत्तरे देणारी मुले आपल्या भविष्यकाळात आपण दिलेल्या उत्तराला सुसंगत असणारे शिक्षण घेतात का? त्यासाठी पालकांकडून किती आणि कसे प्रयत्न केले जातात? ते प्रयत्न कोणत्या स्वरूपाचे असतात? त्यातून त्यांनी ठरवलेल्या गोष्टी साध्य होतात का? या प्रश्‍नांवर विचार होणे फार महत्त्वाचे ठरते. तसेच, काळाच्या ओघात बदलत जाणार्‍या अनेक ट्रेंड्समध्ये ठरवलेल्या गोष्टी टिकणार्‍या असतात का? याचाही विचार होणे अगत्याचे आहे. आपल्याकडच्या एकूणच सर्व होतकरू मुलांचा कल हा ग्लॅमरस फिल्डकडे असतो. त्यांना डॉक्टर, इंजिनिअर, आय.टी. इंडस्ट्रीमध्ये काम करायचे असते आणि भरपूर पैसे कमवून आरामदायी आयुष्य जगायचे असते. कारण आपल्या आजूबाजूला त्यांनी तेच चित्र पाहिलेले असते. पण, त्यातून एक सामाजिक धोका निर्माण झालेला आहे, तो म्हणजे एक पिढी गिनीपिग होण्याचा. तो जर यापुढच्या काळात टाळायचा असेल, तर मुलांनी काय केले पाहिजे आणि पालकांनी आपल्या मुलांना काय दिले पाहिजे, याचा आढावा घेण्यासाठी हा एक प्रयत्न.

 

आपले करिअर घडवताना महाविद्यालयात घ्यावयाच्या विषयांची निवड ठाम असली पाहिजे. विषय निवडताना पुढे त्यासाठी लागणार्‍या कष्टांचा, खर्चाचा आणि त्याही पुढे जाऊन आपल्याला त्यातून मिळणार्‍या आनंदाचा विचार व्हायला हवा. यात आणखी एक विचार अंतर्भूत आहे, तो कौशल्यांचा. ती सवयीने आत्मसात करता येतात; पण त्यासाठी लागणारा कल, अ‍ॅप्टिट्यूड आपल्यात आहे का? हेही पाहिले पाहिजे. यातही आणखी एक गोष्ट निदर्शनास आणून द्यावीशी वाटते, ती म्हणजे आवड आणि कल यांत फरक असतो. आवड तुम्ही विकसित करता, ती तुमच्या हातातली; तुम्हाला स्वत: करता येणारी गोष्ट आहे. पण कल (अ‍ॅप्टिट्यूड) हा जन्मजात ठरून गेलेला असतो. तो आपल्यात आहे का? हे पडताळून पाहण्यासाठी आज पालक आणि विद्यार्थी यांना ‘कल चाचणी’चा पर्याय उपलब्ध आहे. 

कल चाचणी म्हणजे अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट. विद्यार्थ्यांना कोणत्या विषयात गती आहे, त्यांना कोणत्या विषयाची उपजत आवड आहे, तो विषय किंवा ते क्षेत्र त्यांनी निवडल्यास त्यात ते नक्की यशस्वी होतील की नाही, याची कल्पना आपल्याला कल चाचणीतून येते. पण, या चाचणीकडे पालक आणि विद्यार्थी यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे. ही चाचणी म्हणजे करिअरचे अंतिम टोक असे मानता कामा नये. त्यातही वैयक्तिक पातळीवर अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी करता येत असतात. त्या समुपदेशकाकडून खासगी मुलाखतीदरम्यान कळत असतात. आजच्या काळात करिअर घडवताना योग्य ते निर्णय घेण्याचे वय अलीकडे आलेले असल्यामुळे तो निर्णय अधिक योग्य ठरावा; म्हणून अनेक पर्यायही आलेले आहेत.

 

बुद्धिमत्तेला असलेले अनेकविध कंगोरेही आजच्या काळात लक्षात घ्यावे लागतात. त्यातूनच बहुविध बुद्धिमत्ता (Multiple Intelligence) ही संकल्पना अस्तित्वात आली. त्यामुळेच कल चाचणी, अ‍ॅप्टिट्यूड टेस्टलाही अनन्य महत्त्व प्राप्त झाले आहे. बहुविध बुद्धिमत्ता आणि करिअरचे पर्याय यांतील समीकरणही दृढ होत चालले आहे. 

 

बहुविध बुद्धिमत्तेत भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक आणि गणितीय बुद्धिमत्ता, सांगितिक बुद्धिमत्ता, दृक अवकाशीय बुद्धिमत्ता,  शारीरिक बुद्धिमत्ता, व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता, आंतर-व्यक्ती बुद्धिमत्ता, निसर्गविषयक, आध्यात्मिक बुद्धिमत्ता असे प्रकार आहेत. 

 

बुद्धिमत्तेच्या विविध प्रकारांनुसार आपल्या मुलाचा कल आपल्याला ओळखता येऊ शकतो. शिक्षक वर्गातील सर्व मुलांना समान विषय शिकवत असतात. परंतु, प्रत्येक मुलाला तो विषय वेगवेगळ्या पद्धतीने समजतो, भावतो आणि तो ते त्या त्या पद्धतीने लक्षात ठेवतात. काही जण चित्रकलेत पुढे जातात, काही जण खेळात, काही जण नाचात, काही जण संगीतात, काही जण लेखन करतात. हा असा फरक का होतो? तर त्यामागे असतो तो जन्मजात कल, अ‍ॅप्टिट्यूड. आपण त्याला दैवी देणगी वगैरे शब्द वापरत असतो. एका व्यक्तीकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक बुद्धिमत्ता असू शकतात आणि यातही आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ‘कल’वारी लावता येऊन अधिक सुयोग्य असे करिअर निवडता येऊ शकेल.

 

विद्यार्थ्यांनी आपल्याला हवे असणारे करिअर डोळसपणे शोधायला हवे. अर्थात, हा प्रवास मग केवळ विद्यार्थ्यांचा राहत नसून, त्यांच्या पालकांचाही ठरतो. अनेकदा असे होते की, आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर, आर्थिक सुबत्ता येऊ लागली की, माणसांना आपल्याला कामातून समाधान मिळत नसल्याचा फील येतो आणि नोकरी बदलण्याची वेळ येते. आपले मन या कामात रमत नसल्याचेही त्यांच्या लक्षात येऊ लागते. त्या वेळी परत कल चाचणी करून आपल्याला आवडीचे क्षेत्र निवडण्याची प्रक्रिया पहिल्यापासून सुरू होते आणि उलट्या दिशेच्या प्रवासाला आणि त्यातून येणार्‍या नैराश्याला, मानसिक अस्वास्थ्याला सुरुवात होते आणि व्यवस्थित बसलेली घडी विस्कटून जाते.

 

नोकरी किंवा व्यवसाय करताना पैसा, आदर, समाधान या मोबदल्याची अपेक्षा असते, पण या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तरी आपण निराश होऊ शकतो. त्यामुळेच कल असणार्‍या क्षेत्रात काम केले, तर सेल्फ अ‍ॅक्च्युलाझेशनकडे आपला प्रवास सुरू होतो.

 

हल्ली पालकांकडून असेही ऐकायला मिळते की, ‘मी माझ्या मुलाला करिअर निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्याला हव्या त्या क्षेत्रात काम करू द्यायचे, असे ठरवले आहे.’ पण खरी मेख येथेच आहे. आपल्या मुलाने क्षेत्र निवडताना वास्तवाचा विचार केला आहे की नाही, हे बघणे पालकांचे काम आहे. पालकांनी आपल्या पाल्याला वास्तवाचे भान देणे, ही येणार्‍या काळाची गरज आहे. त्यामुळे करिअर निवडीतला डोळसपणा हा पालक आणि पाल्य या दोघांकडेही असला पाहिजे.

 

- मानसी भागवत (समुपदेशक)

[email protected]