कशी काढू चित्रं?

दिंनाक: 09 Dec 2017 17:53:24


दहाव्या वर्षाच्या आसपास तुम्हा मुलांना चित्रांमध्ये खूप नवनवीन प्रयोग करायचे असतात, हो ना? आणि मग ते प्रयोग मोठं होताना अजून बदलू लागतात. काही जणांना हुबेहूब चित्र काढणं जमतं, तर काही जणांना वेगवेगळे अमूर्त आकार वापरून चित्र काढणं आवडतं. काहींना भौमितिक आकार वापरून फक्त रंगभरण करायला आवडतं. वर्तमानपत्रं, मासिकं, पुस्तकं यांच्यातली चित्रं तशीच्या तशी कॉपी करायलाही काहींना आवडतं, तर काहींना छापील चित्रांना दाढी, मिशा, कुंकू, दागिने काढून चित्र बदलून टाकायला आवडतं. चित्र खराब करणं असं मी मुद्दाम म्हणत नाहिये, कारण त्यातही काहीतरी विचार असतो, प्रयोग असतो आणि फक्त छापलेलं चित्र घाण करून टाकणं एवढाच हेतू नसतो. आपल्या चित्रामुळे इतर मित्र-मैत्रिणी दुखावले तर जात नाहीत ना, एवढी मात्र काळजी घ्यायला हवी. म्हणजे, मैत्रिणीने काढलेल्या एखाद्या चित्राला तिच्या परवानगीशिवाय बदलून टाकणं, तिच्या चित्राला नावं ठेवणं, हसणं; हे कधीच करायचं नाही. कारण काही वेळा ती मैत्रीण वाईट वाटून चित्रच काढेनाशी होऊ शकते. घ्याल ना तेवढी काळजी?

आपल्या स्वतःच्या हाताने, स्वतः विचार करून काढलेलं तर चित्र असतंच. तसंच, कसं चित्र व्हावं, याचा आधीपासून काहीही विचार न करता, न ठरवता, केवळ चित्र उमटण्याच्या आनंदासाठी काढलेल्या रेघोट्या म्हणजेही चित्रंच असतात. छोटी मुलं कशी रेघोट्यांना नावं देतात आणि त्यांना त्यात छान चित्र दिसतात, ते पाहिलंय तुम्ही कधी? जॅक्सन पोलॉक नावाचा एक चित्रकार अमेरिकेत होऊन गेला. त्याला चित्र तयार होण्याची प्रक्रिया; म्हणजेच चित्र तयार करतानाचा अनुभव हाच खूप कलात्मक वाटे. मग त्यात रंगांचा वापर करताना शरीर कसं वापरलं; किती मोठा पृष्ठभाग रंगवला; रंगवताना कुठल्या रंगात काय मिसळल्याने वेगळा रंग तयार झाला; काही ठिकाणी रंग ओघळला का आणि कसंकसं चित्र तयार होत गेलं; हे सर्व अनुभवणं म्हणजे प्रक्रिया अनुभवणं. चित्र पूर्ण झाल्यावर त्यातून ती प्रक्रिया कळेलच असं नाही, पण पोलॉकने अशी काही स्वतःची शैली शोधून काढली होती की, त्याला त्यातून खूप आनंद मिळे. त्याची चित्रं जगप्रसिद्ध आहेत आणि अतिशय सुंदर आहेत. चित्रकलेविषयी अपुरी माहिती असणार्‍या माणसाला कदाचित ही चित्रं म्हणजे केवळ रेघोट्या किंवा रंगांचे फटकारे वाटतील. पण; मोठा ब्रश, पातळ रंगात बुडवून त्याचे शिंतोडे मोठ्या कॅनव्हासवर टाकून, त्यातून आपोआप तयार होणार्‍या रचनांतून चित्र तयार करणं, ही कल्पनाच अनोखी वाटते का तुम्हाला? जॅक्सन पोलॉक म्हणायचे, चित्रकला म्हणजे स्वतःचा शोध आहे. प्रत्येक चांगला चित्रकार स्वतः जे असतो तेच चित्रात उमटतं. हात धुतल्यावर हातावरचं जास्तीचं पाणी पुसून न टाकता एखाद्या कोरड्या पृष्ठभागावर शिंपडून तयार झालेलं चित्र पाहिलं आहे ना तुम्ही? ते चित्र अगदी काही क्षणांसाठी बघणं, ते करतानाचा आनंद याही गोष्टी चित्रकलेत महत्त्वाच्या आहेत.

एखादं दृश्य जसं दिसतं, तसं काढून समाधान होत नाही. त्यात तुमच्या कल्पनेची भर घालावीशी वाटते. कल्पनेची भर कुठकुठल्या प्रकारे घालता येते, यावर कधी विचार केला आहे तुम्ही? तुमचं आवडतं माणूस आणि तुमचं आवडतं गोष्टीतील व्यक्तिमत्त्व यांची कधी सांगड घालून पाहिली आहे? आपल्याला जे जे आवडतं, ते सगळं नेहमी बोलून दाखवता येतं असं नाही. आणि जे जे आवडत नाही, तेसुद्धा बोलता येतंच असं नाही. मग ते व्यक्त करण्यासाठी चित्रकलेचा वापर करता येईल का? मला वाटतं की नक्कीच येईल. यातूनच तुम्ही स्वतः कसे आहात हेही शोधता येईल. एक करून पाहा - तुम्हाला स्वतःला आवडणार्‍या दोन गोष्टी कुठल्या आहेत, याचा विचार करा आणि त्यांना योग्य असे दोनच शब्द सांगा. आता हे दोन शब्द चित्रातून कसे व्यक्त करू शकाल, याचा विचार करा. आता स्वतःच्या चेहेर्‍याचं चित्र मोठ्या कागदावर काढा. त्या चेहेर्‍यावर तुम्ही निवडलेले दोन्ही शब्द व्यक्त होतील अशा पद्धतीने रंगवा. रंग तुमच्या आवडीचे वापरा, कारण रंगांतूनही अनेक गोष्टी व्यक्त होऊ शकतात.

रंगांच्या बाबतीत कधी असा विचार करू नये की, हा रंग चांगला, तो वाईट. एखाद्या रंगातून अशीअशीच भावना व्यक्त होते वगैरे. कारण रंग पाहून प्रत्येकाला जे वाटतं ते वेगवेगळं असतं. एखाद्याला काळा रंग भीतीचा वाटतो, तर एखाद्याला खूप डौलदार आणि स्मार्ट वाटतो. एखाद्याला लाल रंग रक्ताचा वाटतो, तर एखाद्याला गुलाबाचा. एखाद्याला आकाशी रंग खुल्या आकाशाचा स्वच्छंदी वाटतो, तर एखाद्याला खोल समुद्राच्या तळाचा भीतीदायक वाटू शकतो. त्यामुळे रंगांच्या भावना या आपल्या मनावर अवलंबून असतात, हे कायम लक्षात ठेवा.

स्मरणचित्र, रचनाचित्र, स्टिल लाईफ, भूमिती हे जे चित्रकलेच्या परीक्षांचे विषय आहेत, ती केवळ एक संदर्भरेषा आहे. मुलांनी त्यातच अडकून पडता कामा नये. कारण कुठलंही तंत्र अवगत करणं, त्याचा सराव करणं आणि त्यात तरबेज होणं या तुलनेने सोप्या आणि सहज जमणार्‍या गोष्टी असतात. खरी कसोटी असते ती तंत्राच्या पलीकडे जाण्याची. एकदा का तुमच्या हातात चित्र काढण्याचं कौशल्य आलं की, तुम्ही त्यात अडकूनही राहू शकता किंवा भरारीही घेऊ शकता. तुमच्या चित्रकलेचं काय करायचंय हे तुमच्याच हातात आहे. तुम्ही कधी स्वतः रंग तयार करून त्यापासून चित्र काढलंय? कच्च्या मालापासून, खोड-फुला-पानांपासून रंग तयार कसा करतात, हे तुम्हाला माहीत आहे? एखाद्या झाडाखाली पडलेल्या रंगीत फुलांच्या पाकळ्या गोळा करून आणा, त्या सावलीतच थोड्याशा वाळवून पाणी घालून उकळा. पाकळ्यांचा रंग पाण्यात उतरू लागेल. उकळायला ठेवलेलं पाणी निम्मं होईपर्यंत उकळलं की विस्तवावरून उतरवा. आता हे रंगीत पाणी थोडं गार झालं की, एखाद्या सुती रुमालातून गाळा. हा झाला तुमचा नैसर्गिक रंग. त्यातून तुमचं चित्र नक्कीच वेगळं तयार होईल. रंगवताना स्वतःला ब्रश तयार करता येईल का, असाही विचार करा. रंग किती दाट किंवा पातळ झालाय त्याची नोंद घ्या. डोळ्यांना दिसणारा रंग आणि चित्र काढून वाळल्यावर दिसणारा रंग यात काही फरक आहे का? नक्की निरीक्षण करा.

आपल्याला बाजारात जे रंग मिळतात, ते सर्व एकाच पद्धतीचे, एकाच वासाचे, एकाच टेक्श्चरचे असतात ना? त्यात रसायनं मिळवून ते तसे केले जातात. ते टिकाऊही असतात. पण माणसाची क्षमता वैविध्यपूर्ण अनुभव घेण्याची असताना का बरं एकाच प्रकारचे रंग वापरायचे, असा विचार तुमच्या मनात येतो का कधी? तुम्ही कधी माती, धूळ यांपासून चित्र काढून पाहिलंय? आवडेल काढायला? चला तर मग, अजून दोन मस्त चित्र सांगते तुम्हाला आवडतील अशी. तुमचा कागद किंचित पाण्याने ओला करा. पाणी शिंपडूही शकता किंवा नळाखाली 3-4 सेकंद धरूही शकता. तो ओला कागद कुठल्याही धूळ असलेल्या जागी किंवा मैदानावर ठेवा. आता कागद फाटणार नाही याची काळजी घेऊन थोडासा दाब द्या. बघा बरं कागदावर काय चित्र उमटलंय? हा कागद थोडा वेळ वाळू द्या. आता एखाद्या पेनने त्यात दिसणार्‍या आकारांना गिरवा. झालं तुमचं मजेदार चित्र तयार. आहे ना गंमत! असंच तुम्ही थोडीशी माती एका भांड्यात घेऊन, त्यात पाणी घालून तयार होणारा चिखल बोटाने कागदावर लावून चित्र तयार करू शकता. भांड्यात मातीचा गाळ खाली बसू द्यायचा आणि वरवरचा पातळ रंग चित्रासाठी वापरायचा. जेवढ्या वेगवेगळ्या रंगांची माता सापडेल, तेवढे रंग तुमच्या चित्रात येतील. वेगवेगळ्या ठिकाणी मातीचे किती वेगवेगळे रंग असतात पाहिलंय कधी? माती काळी, लाल, तपकिरी, पिवळी, फिक्कट पांढरी, राखाडी, गुलाबी, हिरवट अशी अनेक रंगांची सापडू शकते.

यातून तुम्हाला काही सुचलं, तर तेही मित्र-मैत्रिणींबरोबर करून बघा. चित्रातून व्यक्त होण्यासाठी रंगीत खडू, बाजारातील रंग यांवरच अवलंबून न राहता तुम्ही मुक्तपणे चित्रांचा विचार करू शकता. चित्र काढणं हे फक्त वास्तववादी रेषा, रंग, आकार यांत बांधून न ठेवता मोकळेपणाने, प्रयोग करत अमूर्त चित्रही तयार करून बघा. अमूर्त म्हणजे ज्याला कुठलाही ठरावीक, मूर्त आकार नाही असं. काढणार ना मग वेगवेगळी चित्रं?

 

-आभा भागवत

[email protected]