दिवाळी, पाहुण्यांची सरबराई व सोहमच्या लुडबुडीमुळे मधुराची चांगलीच दमछाक झाली होती. मात्र, सोहमची शाळा सुरू झाल्यामुळे आणि आज कामे उरकल्यामुळे ती निवांतपणे टी.व्ही. बघत बसली होती. चॅनेल बदलताना, शास्त्रज्ञ डॉक्टर करंदीकरांची मुलाखत सुरू असलेली तिने बघितली.

‘शास्त्रज्ञ म्हणजे जगावेगळी व्यक्ती नसते हो. प्रत्येक मूल या जगात काहीतरी नवीन शोध घेण्याची उर्मी घेऊनच जन्माला येते. त्यासाठी निसर्गाने प्रत्येकाला नवनिर्मितीसाठी आवश्यक असलेले कुतूहल व सर्जनशीलता या दोन गुणांची देणगी दिलेली असते. ज्या मुलांमधील कुतूहल जिवंत राहते, ती मुले सतत नावीन्याचा शोध घेण्यासाठी धडपडत असतात आणि त्यातूनच त्यांच्या हातून मोठेपणी जगावेगळे काम होते, तुम्ही त्यांना शास्त्रज्ञ म्हणता’, डॉक्टर करंदीकर त्यांचे म्हणणे मांडत होते.

‘म्हणजे डॉक्टर, मुलांना शास्त्रज्ञ करायचे असेल, तर पालकांनी मुलांचे कुतूहल जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, बरोबर ना?’

‘नाही, मुलांना केवळ शास्त्रज्ञ बनवण्यासाठी नाही, तर एक आनंदी व्यक्ती बनवण्यासाठी मुलांचे कुतूहल व सर्जनशीलता, म्हणजेच क्रिएटिव्हिटी जिवंत ठेवली पाहिजे व त्याची सुरुवात लहान वयातच झाली पाहिजे’, डॉक्टरांनी त्यांची भूमिका अधिक स्पष्ट केली.

मुलाखत संपूनही मधुराच्या मनातून डॉक्टरांचे विचार जात नव्हते, मन सुन्न झाले होते.

सोहम शाळेतून आला आणि एखाद्या वादळासारखा घरात शिरला.

‘‘सोहम, तुला किती वेळा सांगायचे, पळत जाऊ नकोस म्हणून. आणि हे काय, वॉटर बॅग कुठे आहे? आलास पुन्हा वेंधळ्यासारखा विसरून? अरे, कपडे इथे टाकू नकोस. आणि चल, जरा खाऊन घे आणि थोडा वेळ झोप.’’

मधुराने सोहमवर एकामागून एक प्रश्नांचा व सूचनांचा मारा सुरू केला. सोहमला या सगळ्याची सवय झाल्यामुळे आईकडे दुर्लक्ष करून, त्याला हव्या त्या क्रमाने त्याला हवी ती कामे तो करत राहिला!

अभिजित म्हणजे सोहमचे बाबा, ऑफिसच्या कामासाठी सहा महिने बाहेर गेल्यामुळे, सगळे निर्णय घेण्याची जबाबदारी मधुरावरच होती. करंदीकरांची मुलाखत आणि सोहमच्या भविष्याचा सुरू असलेला विचार याच्या मिश्रणातून सोहमची सर्जनशीलता, अर्थात क्रिएटिव्हिटी जिवंत राहावी, समृद्ध करावी, म्हणून आपण आतापासून प्रयत्न सुरू करायचे तिने ठरवले.  गुगलवर क्रिएटिव्ह ड्रॉईंग, क्रिएटिव्ह रायटिंग, ड्रामा वगैरे क्लासेस शोधून, यातील किमान दोनतरी क्लास सोहमला सुरू करायचा तिने निर्णय घेतला.

दुसर्‍या दिवशी, नेहमीप्रमाणे सोहमवर अनंत सूचनांचा मारा करत व वॉटर बॅग शोधण्याची ताकीद देऊन त्याला शाळेकडे रवाना केले. सोहम गेल्यानंतर तिने क्रिएटिव्हिटी क्लासेसची, एकामागून एक फोन करत भेटायची वेळ घेतली. सोहम शाळेतून येताच त्याला भराभर तयार करून ती क्लासेस बघायला निघाली.

चित्रकला, भाषा, गणित, विज्ञान शिकवणारे क्रिएटिव्ह क्लासेस बघून मधुराचे समाधान झाले नव्हते, शेवटी ती नाट्य प्रशिक्षण देणार्‍या क्लासमध्ये आली. क्लासची माहिती ऐकतानाही तिचे लक्ष सतत सोहमकडेच होते.

‘सोहम, नीट बस, टेबलवर हात ठेवू नकोस. अशा सूचना ऐकून ऐकून सोहमला तहान लागली. मधुराने लगेच पाण्याचा ग्लास सोहमच्या तोंडापाशी धरला.

‘‘अच्छा ताई, सोहमसाठी क्लास सुरू करायचा आहे तुम्हाला?’’ 

‘‘हो, मुलांची क्रिएटिव्हिटी लहानपणापासून टिकून राहिली पाहिजे, हे डॉक्टर करंदीकरांनी मांडलेले विचार ऐकून, मी त्याला क्लास लावण्याचा निर्णय घेतला आहे.’’

‘‘ताई, तुम्ही आल्यापासून सोहमला सतत सूचना देताना मी बघितले. तुम्ही त्याला पाणीसुद्धा त्याच्या हाताने पिऊ दिले नाहीत, हेही माझ्या लक्षात आले! तुमच्या अशा वागण्यामुळे, सोहमच्या आत्मविश्वासावर काय परिणाम होईल, असे तुम्हाला वाटते?’’

‘‘आत्मविश्वासाचा क्रिएटिव्हिटीशी काय संबंध?’’

तो तर क्रिएटिव्हिटीचा पाया आहे. इतरांपेक्षा वेगळा विचार करून जर कोणतेही क्रिएटिव्ह काम करायचे असेल, तर त्या व्यक्तीमध्ये, निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते आणि आत्मविश्वास नसलेली कोणतीही व्यक्ती, स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही. मग अशा व्यक्ती इतरांचे बघून वागायला शिकतात व स्वत:चे वेगळे स्थान; मग ते कोणत्याही क्षेत्रात का असेना निर्माण करू शकत नाहीत व खर्‍या अर्थाने समाधानी होऊ शकत नाहीत.

एवढ्या लहान वयात सोहमला क्लासेसची नाही, तर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करू शकेल अशा वातावरणाची गरज आहे. त्याला सतत सूचनांची नाही, तर आपल्या हातून चूक झाली म्हणून हताश न होता, त्या चुकांमधून शिकून स्वतःहून पुढे जाण्याची सवय त्याला लागली की, तो आपोपाच क्रिएटिव्हिटीची कास धरेल, मग त्याला मदत करायला आपण सगळे आहोतच!’’

या सखोल चर्चेतून, मधुराला क्रिएटिव्हिटीचा प्रवास नक्कीच उमगला.

‘चल, उठ सोहम, निघायचे आपल्याला’, अशी तोंडापर्यंत आलेली सूचना टाळून ‘‘सोहम, आपण निघू या का आता?’’ असे विचारून, सोहमला निर्णयाची एक संधी देत आत्मविश्वासातून क्रिएटिव्हिटीकडे जाण्याच्या प्रवासाला तिने सुरुवात केली!

आजच्या काळात मुले आणि आई वडील यांच्यात होणारा संवाद कसा असावा?वाचा खालील लिंकवर 

गरज सुसंवादाची

-चेतन एरंडे 

[email protected]