टॉप टॅटू मीटर

दिंनाक: 07 Dec 2017 15:43:27


मीटर : एऽऽऽ रिक्षे, अगं इकडे बघ ना.. लक्ष कुठाय तुझं? ‘हल्ली खूप दिवसांत ते रस्ता रोको’ झालंच नाही का गं? किती स्वत:चा अभिमान वाटतो तेव्हा! सो नाईस अँड कूऽऽल.

रिक्षा : शीऽऽऽऽ! अरे मीटरा, तुला लाज नाही वाटत असला प्रश्न विचारायला? त्या रस्ता रोकोच्या वेळी लोकांचे किती हाल होतात हे माहित्यै का तुला? यात कुठला आलाय ‘स्वत:चा’ अभिमान? आणि म्हणे नाईस अँड कूल! ‘रस्ता रोको’ म्हणजे काय तुला जत्रा वाटली काय?

मीटर : ऽऽऽ उगाच ‘आयत्या पेट्रोलवर फुकटचा धूर सोडू नकोस.’ आम्ही मान मोडून काम करतो, म्हणून ठामपणे बोलतो. तुझ्यासारखी नुसती ‘धुरकट फुरफूर’ करत नाही समझे..?

रिक्षा : बरं बाई.. झाली घाई. प्रिय मीटर्‍या, मला सांग त्या रस्ता रोकोमुळे तुला ‘स्वत:चा अभिमान’ का वाटतो? आणि ते ‘नाईस अँड कूल’ म्हणजे काय तेही सांग. आणि मला जरा समजेल असं सांग बरं.

मीटर : वॉव! सही गियर टाकलास तू!! अगं तुझ्यात म्हणजे या रिक्षात, माणसं मागे बसली रे बसली की हे काका मागे न बघताच एका झटक्यात माझी मान गर्रकन फिरवतात. सणकून खाली चेपतात, तर कधी पोटाला करकचून कराकरा चावी मारतात. हेही एकवेळ मी सहन करीन तुझ्यासाठी. पण.. सगळा प्रवास, ‘खोल खाली मुंडी आणि रिक्षाचा तळ धुंडी’ अशा अवस्थेत करणं केवळ अशक्य! म्हणून..

रिक्षा : अहो मीटरू मीटरे, पण अजून मला त्या तुमच्या ‘रस्ता रोको’विषयी काहीही कळलं नाही. जरा या तीन चाकांच्या रिक्षेला समजेल असं बोला बुवा.

मीटर : मला वाटलं तुला ‘प वरून पेट्रोल’ कळलं असेल.

पण.. ‘तुझी टाकी फूल असेल स्पार्क प्लगच नसेल’ तर तू तरी काय करणार म्हणा..?

रिक्षा : म्हणजे..? अहो, यातलं ते तुमचं रस्ता रोको कुठलं? मला नाही समजलं..?

मीटर : ओके. मला समजलं. अगं जेव्हा रस्ता रोको असतं, तेव्हा काका तुला बाहेरच काढत नाहीत. त्यामुळे मागे कुणी माणसंच बसत नाहीत. मग काका माझी मानही मुरगळत नाहीत. तो दिवस मी ‘ताठ मानेने’ जगतो. म्हणजेच..

रिक्षा : आलं लक्षात. ‘त्या दिवशी’ तू ‘ताठ मानेने’ म्हणजेच स्वाभिमानाने जगतोस. म्हणून तो नाईस अँड कूल डे! हो ना..?

मीटर : व्वा! स्पार्क पडला वाटतं? खरं सांगू का, मागे बसणार्‍या माणसांकडूनच मी असले शब्द शिकलो. एक गंमत सांगायची राहिलीच की..

रिक्षा : आँ.. कोणती रे?

मीटर : कालचीच गोष्ट. एक शँपल बाई मागे बसली होती. डोक्यावर केसांचं घरटं केलेलं. कानात लंबेलांब लोंबणारं काहीतरी. हातभर रंगीबेरंगी बांगड्या. विचित्र मेकप आणि चित्रविचित्र कपडे. ही बाई बसल्याबरोबर नेलकटरने नखं घासत होती.

रिक्षा : नखं घासली तर काय झालं..? काका माझा स्पार्क प्लगपण घासतात.

मीटर : अगं रिक्षे, जरा ऐकशील की नाही? की.. ‘गियर टाकायच्या आधीच उसळतेस?’ ती बया नखं घासत असतानाच, अचानक काकांनी ब्रेक लावला. त्या बाईचं टाळकं माझ्यावर आपटलं. मला काहीच झालं नाही. पण ती वैतागून माझ्याकडे पाहात, डोळे चोळत इंग्लिशमधून काहीतरी मूर्खासारखं बडबडली. आणि तिने रागारागाने माझ्या नाकावर, गालावर त्या नेलकटरने घसाघसा घासलं, ओरखडलं. मी रंगबंबाळ झालो गं रिक्षे! फार-फार त्रास झाला मला.

रिक्षा : अगं बाई! म.. तुम्ही काही तेल वगैरे लावलंत का?

मीटर : कुणाला? त्या शँपल बाईला? शीऽऽऽ!

रिक्षा : नव्हे नव्हे! तुम्हाला हो. तुमच्या जखमांना?

मीटर : हंऽऽऽ. ऊंऽऽऽ. काकांचा छोटा मुलगा खूप चांगला आहे. त्याचं आपल्या दोघांवर प्रेम आहे. खरंच. तो कधीकधी सकाळी लवकर उठतो. मग तो तुझ्यात बसून, हातात पुस्तक घेऊन वेगवगेळ्या भाषेतल्या कविता म्हणत असतो. तू दिवसभर वणवण फिरल्याने खूप वेळा थकलेली असतेस. तो येतो, तेव्हा तू गाढ झोपलेली असतेस. कविता म्हणताना तो मध्येच मला थोपटतो, तर कधी दोन बोटांनी माझ्यावर ताल धरतो.

खरं सांगतो, पाठ झालेली कविता तो सर्वप्रथम मला ऐकवतो. काल संध्याकाळी त्याने माझ्यावर पडलेले ओरखडे पाहिले. त्याला खूप वाईट वाटलं. त्याने धावतच घरात जाऊन एक डबा व मऊ फडकं आणलं. हळुवारपणे माझ्या जखमांवरून हात फिरवला. मला फडक्याने स्वच्छं पुसलं. मला छान चमकदार काळ्या रंगात रंगवलं.

आणि.. त्यावर एक सुंदर चित्रपण काढलं.

रिक्षा : पण हे चित्राचं तुला कसं कळलं? कारण.. तुझी मान तर तेव्हा ताठच असणार ना? काऽऽय?

मीटर : अगं आत्ताच उतरून गेलेला तो छोटा मुलगा आपल्या आईला सांगत होता, या मीटरवरचा टॅटू एकदम सही आहे गं!

रिक्षा : आमच्या टॉप गियरसारखा आता तू ‘टॉप टॅटू मीटर’ आहेस बरं!!

 

 लँडलाइन आणि मोबाईल फोन या निर्जीव वस्तूंचा संवाद वाचा खालील लिंकवर 

काका आणि पुतण्या

 -राजीव तांबे

[email protected]