‘माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीव्र शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे. हे शब्द स्वातंत्र्य, समता व बंधुभाव. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत. राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध. त्यांच्या शिकवणीपासून ते मी काढले आहेत. माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य नि समता यांचे उल्लंघन होऊ नये (ती योग्य मर्यादेबाहेर जाऊ नयेत.) म्हणून केवळ संरक्षक म्हणून निर्बंधाला (कायद्याला) स्थान आहे. परंतु निर्बंध हा स्वातंत्र्य नि विश्‍वास नाही म्हणून माझ्या तत्त्वज्ञानात बंधुतेस फार स्थान आहे. स्वातंत्र्य नि समता यांच्या अनिर्बंध वापराविरुद्ध संरक्षण फक्त बंधुभावाचेच आहे. त्यांचेच दुसरे नाव मानवता. आणि मानवता हेच धर्माचे दुसरे नाव.’ हे उद्गार आहेत; महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. त्यांनी सामाजिक चळवळ चालवली. अस्पृश्यता, जातिभेद, अंधरूढी यांच्याविरुद्ध आवाज उठवला. स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचे कामही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कृतिशील समाजसुधारक होते. जे बोलत होते; तेच कृतीतून साकार होते, असे डॉ. बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येते. स्वातंत्र्य म्हणजे काय? तर कोणत्याही स्वरूपाचे बंधन नसणे. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक या क्षेत्रांत पिळवणूक नसणे; समान व्यवहाराची संधी असणे अशा शब्दांत आपण स्वातंत्र्याची व्याख्या करू शकतो. हे स्वातंत्र्य मिळावे अशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. ते म्हणत, सर्व माणसे जन्मतःच समान आहेत. निसर्गनिर्मित भेदांपलीकडे कोणतेही भेद माणसामाणसांत करता कामा नयेत. माणूस म्हणून जगण्याचे त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे; यासाठीच त्यांनी लढा दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव’ ही तत्त्वत्रयी आपल्या जीवनात कशी अंगीकारली होती? या प्रश्‍नाचे उत्तर म्हणून आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील तीन प्रसंग पाहू. पहिला प्रसंग आहे, औरंगाबादचा. तेव्हा बाबासाहेब मिलिंद महाविद्यालयात होते. लॉनमध्ये ते आपल्या सहकार्‍यांशी गप्पा मारत बसले होते. तोच बाहेरून आवाज आला. कोणीतरी बाहेर गाणे म्हणत नाचत होता. त्याच्या गळ्यात विविध देवदेवतांचे फोटो होते. अंग भंडार्‍याने माखले होते. बाबासाहेब बाहेर आले आणि त्याला विचारले, ‘कोण रे तू?’ ‘मी मरिबा. मरिआईचा भक्त, तुम्ही इथे आलाय कळले; म्हणून तुम्हाला कला दाखवायला आलो देवा.’ मरिबाचे हे उत्तर ऐकून बाबासाहेब संतापले आणि म्हणाले, ‘असे गळ्यात देवाचे फोटो अडकवून भीक मागण्यापेक्षा काहीतरी काम कर.’ यावर मरिबा म्हणाला, ‘मी देवाचा माणूस, देवाची सेवा कशी सोडू?’ बाबासाहेब अधिकच चिडले आणि म्हणाले, ‘दोन दिवस घराबाहेर पडला नाहीस, तर तुझा देव तुला अन्न देणार नाही, म्हणून ही अंधश्रद्धा सोड. माणूस बन.’ या प्रसंगातून बाबासाहेबांनी मरिबाला अधंश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होण्याचा स्वतंत्र संदेश दिला आहे.

दुसरा प्रसंग आहे, 1925 सालचा. मे महिन्यात बाबासाहेब कोल्हापुरात होते. कोल्हापूर संस्थानाचे दिवाणपद डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारावे, असे दरबारी मंडळींना वाटत होते. पण बाबासाहेबांनी त्याला नकार दिला. कारण दिवाणपद स्वीकारले की, बाबासाहेब कोल्हापूर संस्थानापुरते अडकून पडणार होते आणि त्यांना तेच नको होते. खूप मोठी चळवळ त्यांना करायची होती. बाबासाहेब कोल्हापुरातून परत निघाले. त्यांच्याबरोबर दत्तोबा पवार आणि गणाचार्य हे दोन कार्यकर्ते होते. दत्तोबा चांभार समाजाचे, तर गणाचार्य मांग समाजाचे. मिरज स्टेशनवर उभ्या असणार्‍या बाबासाहेब, पवार आणि गणाचार्य गप्पा मारत बसले होते. काही वेळाने काही महार बांधव आपल्या घरून जेवण घेऊन आले. आपल्या बांधवांचे हे प्रेम पाहून बाबासाहेबांचे डोळे पाणवले. तिघांनींही थट्टा-मस्करी करत ते जेवण संपवले. खरे तर त्या वेळी दलित समाजातही उच्च-नीचता पाळली जात होती. महार समाजापेक्षा चांभार व मांग स्वत:ला उच्च समजत असत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना महाराघरचे भोजन खायला घालून सहभोजनाचा आनंद घेतला. आपल्या कार्यकर्त्यांच्या मनातील जातीपातीची भावना पूर्णपणे कशी घालवता येईल, यासाठी डॉ.बाबासाहेब छोटे-छोटे प्रयोग करत असत. लहान लहान प्रसंगांतून ते समतेची रुजवणूक करत असत. जातीधर्मापेक्षाही ‘माणूस’ महत्त्वाचा आहे. ‘जो पंक्तीला तोच संगतीला’ ही उक्ती बाबासाहेबांनी कृतीतून साकार केली. समतेची अनुभूतीही छोट्या छोट्या प्रसंगांतून ते देत असत.

तिसरा प्रसंग आहे, 1927 सालचा. महाडच्या चवदार तळ्यातील पाणी पिऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपला सत्याग्रह करणार होते. या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी विविध संघटना आणि व्यक्ती पुढे येत होत्या. त्यामध्ये केशवराव जेधे यांचाही समावेश होता. त्यांनी आपला पाठिंबा देताना म्हटले की, ‘जर आपल्या चळवळीतून ब्राह्मणांना वगळले, तर आम्ही सर्व ब्राह्मणेतर आपल्या लढ्यात सहभागी होऊ.’ डॉ.बाबासाहेबांनी जेधे-जवळकरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले, ‘माझी चळवळ ब्राह्मणांच्या विरुद्ध नाही, तर ब्राह्मण विरोधी आहे’. बाबासाहेबांनी जेधे-जवळकरांची सूचना झिडकारली. आपल्या समाजात एक प्रकारची सांस्कृतिक भव्यात्मता तर खोलवर रुजली आहे आणि त्याचा प्रत्यय सामाजिक पातळीवर बंधुतेतच येऊ शकतो, असा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विश्‍वास होता आणि म्हणूनच ते चळवळ चालवताना ब्राह्मणांच्या विरोधी नव्हते; तर ब्राह्मण्य जपणार्‍या प्रवृत्ती विरुद्ध होते, हे बाबासाहेबांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या तिन्ही गोष्टी खरे तर जगण्याच्या आहेत. त्या आपल्या सर्वांच्या व्यवहारांशी जोडणीच्या आहेत. आपण व्यवहारात आपल्या व्यक्तिगत पातळीवर स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचा अंगीकार केला; तरच स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यांचा प्रत्यय येईल. कारण आपला व्यवहार कसा आहे, त्यावर समोरच्या व्यक्तीचा आपल्याशी असणारा व्यवहार निश्‍चित होणार असतो. म्हणूनच आपण आपल्या जीवनात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा अंगीकार आग्रहाने केला पाहिजे. आपल्यामुळे इतर कुणाच्याही स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संकोच होणार नाही, याची काळजी घेणे आणि तसा व्यवहार करणे हीच खरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली ठरेल.

- रवींद्र गोळे

[email protected]