नमस्कार मित्रहो, मागील लेखात आपण पाहिलं की आकाशाचं आणि आपलं नक्की काय नातं आहे. मला खात्री आहे की आपल्या रोजच्या जीवनात, लेखात दिल्या व्यतिरिक्त आकाश आणि आपलं नातं अजून कोणत्याप्रकारे आहे हे आपण नक्की शोधलं असेलंच. आता प्रस्तुत लेखामध्ये आपण याच्याच पुढील भाग म्हणजे आपले सण आणि आकाश याचं कसं नातं आहे ते पाहू.

आपल्या सर्व सणांमध्ये कॅलेंडरमध्ये सर्वांत प्रथम येणारा सण म्हणजे “मकर संक्रांत”. भारतीय संस्कृतीत बहुतेक हाच एकमेव सण हा सूर्यावर आधारित आहे. आता शब्दांची थोडी फोड करता लक्षात येईल की “संक्रमण” या शब्दाचा अर्थ म्हणजे “जाणे” असा होतो. सूर्य कॅलेंडरच्या ज्या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यास आपण मकर संक्रांत (१४ किंवा १५ जानेवारी) असं म्हणतो. परंतु एवढंच या सणाचं महत्त्व नाहीये. फक्त मकर राशीप्रवेशच का साजरा करायचा असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडू शकेल. त्यासाठीच आपण या सणाबद्दल अधिक जाणून घेऊ यात.

पृथ्वीला वेगवेगळ्या अशा सुमारे सहा गती आहेत त्यापैकीच एक म्हणजे ‘परांचन गती’. परांचन गती म्हणजे आपण लहानपणी भोवरा फिरवताना तो थांबत आला की त्याची गती हळू हळू डुलत डुलत कमी होते आणि तो पूर्णपणे थांबतो. त्याचप्रमाणे पृथ्वीची ही गती सुद्धा काम करते. आता ह्या गतीमुळे पृथ्वीला (wobble ची) एक प्रदक्षिणा पूर्ण करायला २६,५०० वर्षे लागतात. त्यामुळे आपला ध्रुव तारा सुद्धा काही हजार वर्षाने बदलतो. परंतु हा कालावधी फार जास्त मोठा असल्याने आपल्यासाठी तो नगण्य आहे. ह्या परांचन गती मुळे ३६० अंश पूर्ण करायला सुमारे २६,५०० वर्षे लागतात, तर एका अंशासाठी गणित मांडले तर आपल्या लक्षात येईल की एक अंश ध्रुव ताऱ्यापासून सरकायला साधारण २६,५००/३६० = ७३.६ वर्षे लागतात म्हणजेच ह्यावरून असे लक्षात येईल की २२ डिसेंबरला सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश सुमारे १६१९ वर्षांपूर्वी होत असेल. ह्याचं सोप्प गणित पुढील प्रमाणे - (७३.६ वर्ष एक अंश (साधारण एक दिवस) * २२ दिवस (२२ डिसेंबर ते १३ जानेवारी मधील दिवस) = १६१९.२ वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन = २०१७ – १६१९ = इसवी सन ३९७ च्या सुमाराला. म्हणजेच इसवी सन ३९७ च्या सुमाराला २२ डिसेंबर ला सूर्य मकर राशीत प्रवेश करत असावा. आता पुन्हा मूळ प्रश्नाकडे वळू. तर २२ डिसेंबर ला उत्तरायण सुद्धा सुरु होतं. आणि उत्तरायणामुळे आपल्या उत्तर गोलार्धात दिवसाची लांबी वाढत जाते आणि दिवस मोठा होतो. त्यामुळे कदाचित पूर्वीच्या लोकांनी हा दिवस साजरा करण्यासाठी त्या वेळच्या मकर संक्रमणाची मदत घेऊन हा पायंडा पाडला असण्याची शक्यता आहे. तसच ह्या सणाच्या वेळी उष्ण पदार्थ जसे की तिळगुळ खाण्याची सुद्धा रीत ही त्या वेळी (२२ डिसेंबर च्या वेळी) असणाऱ्या थंडीमुळेच पडली असावी. आता ही मकर संक्रांत सरकून १४ किंवा १५ जानेवारीला येते. काही काळानी ती अजून उशिराने म्हणजे फेब्रुवारी मध्ये सुधा यायला लागेल. त्यामुळे आपले सण आणि आकाश ह्याचं गणित लक्षात घेऊन सण साजरे करणे हे महत्वाचे ठरते. त्याचमुळे आता उत्तरायण दिवस (२२ डिसेंबर) साजरा करावा की मकर संक्रांत ह्याचा विचार करायला हवा.

भारतीय संस्कृती मधील इतर जवळ जवळ सर्वच सण हे चंद्रावर (चंद्रतिथीवर) अवलंबून असतात. जसे की राम ‘नवमी’, श्रीकृष्णजन्म ‘अष्टमी’,  होळी ‘पौर्णिमा’ इत्यादी. आता अजून एका स्थिती बद्दल जाणून घेऊ. आपण सगळ्यांनी ‘गुरुपुष्यामृत’ योग असं कॅलेंडर मध्ये लिहिलेलं नेहमी वाचलं असेलंच. आता ह्याचा सुद्धा खगोलाशी जवळचा संबंध आहे. ‘गुरुपुष्यामृत’ ह्या शब्दाची फोड केली असता आपल्याला लक्षात येईल की ह्याचा पुष्य नक्षत्राशी काहीतरी संबंध आहे. तो असा की कॅलेंडर मध्ये जर गुरुवारी चंद्र हा पुष्य नक्षत्रात असेल तर त्या स्थिती ला गुरु-पुष्य योग असे म्हणतात.

आता हे झाले हिंदू सणांचं. ह्याचप्रमाणे मुस्लिम सण हे सुद्धा आकाशीय स्थिती वरच अवलंबून असतात. जसं की मुस्लिम कालगणनेनुसार , शव्वाल नावाच्या महिन्याचा प्रथम दिवस हा “रमझान ईद” म्हणून साजरा केला जातो. तसच ख्रिस्ती सणांमध्ये प्रामुख्याने येणारे ‘गुड फ्रायडे’ आणि ‘इस्टर संडे’ हे सुद्धा कालगणनेवर म्हणजेच परिणामी आकाशीय स्थितींवर अवलंबून आहेत.

चला तर मग, आता कॅलेंडर हातात घ्या आणि शोध घ्या , सणांचे आणि ह्या कॅलेंडर आणि आकाशाचे नक्की काय नातं आहे ते !!! भेटू पुढील लेखात.

आपल्या रोजच्या जीवनात आकाशाचं काय महत्त्व आहे ते जाणून घ्या खालील लिंकवर  

रोजच्या जीवनात आकाशाचे महत्त्व 

-अक्षय भिडे

[email protected]