भारतीय नौसेना

दिंनाक: 04 Dec 2017 15:58:40


1947 साली जरी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तरी कॉमनवेल्थचे सभासदत्व स्वीकारल्यामुळे व 26 जानेवारी 1950 पर्यंत गव्हर्नर जनरल हाच सरकारचा प्रमुख असल्यामुळे ‘प्रजासत्ताक भारत’ जाहीर झाल्यावरच भारतीय  आरमाराच्या नावातून ‘रॉयल’ हा शब्द वगळून ‘भारतीय नौसेना’ इंडियन नेव्ही या नावे भारतीय नौदल ओळखले जाऊ लागले व युद्धनौकांवर तिरंगा फडकू लागला. भारत सरकारच्या विनंतीवरुन अॅडमिरल सर एडवर्ड पॅरी ह्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले सेनापतिपद सांभाळले. 22 एप्रिल 1958 ह्या दिवशी व्हाइस अॅडमिरल स्टिफन टोप कार्लाइल ह्यांच्याकडून व्हाइस अॅडमिरल रामदास कटारी ह्या भारतीय नौसेना अधिकार्‍याने सेनापतीपदाची सूत्रे हाती घेतली व खऱ्या अर्थाने भारतीय आरमारची धुरा भारतीयांकडे आली. त्यानंतरचे नौसेना बेडा, मुख्यालय मुंबई व पूर्व नौसेना बेडा, मुख्यालय विशाखापट्टणम अशा दोन स्वतंत्र कमांड सुरु झाल्या.

१९८५ साली अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथे तीनही सशस्त्र सेनादलांची एकत्रित कमांड (इंटिग्रेटेड कंबाइंड कमांड) सुरु करण्यात आली आहे. ह्या कमांडच्या आधिपत्याखाली बंगालच्या उपसागरातील परिसर व त्यालगतच्या समुद्रातील कमोर्टा , कदमत, कच्छल, कवरत्ती, रोझ, अॅन्द्रोन्थ इत्यादी १०० पेक्षा जास्त बेटे आहेत. ह्या भारतीय सागराच्या परिसरातील सर्व शेजारी राष्ट्रांच्या हालचालींवर देखरेख ठेवणे हि जबाबदारी ह्या कमांडवर आहे. पोर्टब्लेअरपासून बांगला देश ४०० मैलांवर, म्यानमार ४० मैलांवर, मलेशिया/थायलंड १५० मैलांवर असून भारताचा किनारा भारताचा किनारा पोर्टब्लेअरपासून १६५० मैल इतक्या दूर अंतरावर आहे. या द्वीपसमूहाचे विशिष्ट असे सागरामधील सामरी डावपेचात्मक स्थान ( स्ट्रॅटेजिक पोझिशन) महत्वाचे असून युद्धजन्य परिस्थितीमध्ये निर्णायक ठरू शकते. चीनसारख्या विस्तारवादी राष्ट्रांचा डोळा ह्या द्विपसमुहावर आहे. म्हणून भूसेना-नौसेना-वायुसेना ह्या तिन्ही भारतीय सशस्त्र सेनादलांची हि सामाईक कमांड असून तिची धुरा व्हाईस अॅडमिरल हुद्याच्या अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. बेटांचे संरक्षण हि महत्वपूर्ण जबाबदारी ह्या कमांडवर आहे.

१६४ लहान-मोठी बंदरे असणारया सागरकिनारयाचे संरक्षण व निगराणी करीत, व्यापारी जहाजांना व मच्छीमारांना अडचणीत मदत करत, त्यांचे व्यवहार व्यवस्थित अडथळ्याशिवाय सुरळीतपणे चालू राहण्यास सहाय्यभूत होणे, भारताच्या सागरी संपत्तीचे संरक्षण व देखभाल करणे, सागरी संपत्तीच्या विकासास व संशोधनास मदत करणे, राष्ट्रीय आपत्तीच्या काळात उदा. महापूर, भूकंप, त्सुनामी इ. प्रसंगी मुलकी अधिकाऱ्यांना सरकारच्या आदेशाप्रमाणे मदत करणे, सरकारच्या राष्ट्रीय ध्येय, धोरणांचा पाठपुरावा करणे, मित्राराष्ट्रांसोबत संबंध दृढ करणे, परदेशातील भारतीयांना भावनिक आधार देत जगामध्ये भारतीय शक्तीचे मिळेल ती संधी साधून प्रत्ययकारी प्रदर्शन घडवणे, भारताच्या आर्थिक महसुलात भर घालत राहणे इत्यादी महत्वाची कर्तव्ये भारतीय नौसेनेला पार पाडावी लागत आहेत.

९५ टक्के जागतिक व्यापारी मालाची ने-आण हि सागरी मार्गानेच होत असून भारताच्या महसुलात ह्या आर्थिल उलाढालींचा वाटा ७५ टक्के आहे.

हि आर्थिक उलाढाल नौसेनेच्या संरक्षणाच्या आधारानेच अबाधितपणे चालू आहे. सागरी तेलावर प्रक्रिया करणारे समुद्रातील ३० तराफे (प्लॅटफॉर्म्स) व सागरातील भारतीय किनारयालगत असणारया १२५ पेक्षा जास्त तेलाच्या विहिरींचे संवर्धन व संरक्षण हि जबाबदारी भारतीय नौसेनेचीच आहे. १९७२ ते १९८० ह्या काळात आय. एन. एस.(इंडियन नेव्हल शिप) दर्शक, सतलज, जमुना, इन्व्हेस्टिगेटर, निर्देशक इत्यादी भारतीय नौसेनेच्या सर्वेक्षक नौकांनी (सर्व्हे शिप्स) सागरी साम्राज्याच्या उभारणीत, सागरी तेल उत्खननाच्या कार्यात महत्वाची कामगीरी बजावली आहे.

देशाच्या फाळणीनंतर भारताच्या वाट्याला ३३ युद्धनौका आल्या, तर पाकिस्तानला १६ युद्धनौका बहाल करण्यात आल्या. ब्रिटीशांच्या तालमीत तयार झालेल्या ह्या भारतीय आरमारासाठी सरकारने ब्रिटनकडून दुसऱ्या महायुद्धात लढलेली कृझर्स, फ्रिगेट्स,  ड्रायझर्स, माईनस्विपर्स इत्यादी प्रकारची जुनी जहाजे, योग्य ती डागडुजी करून घेऊन, विकत घेतली. त्यात आय. एन. एस. दिल्ली, म्हैसूर या कृझर्स; व्यास, बेटवा, ब्रह्मपुत्रा या फ्रिगेट्स; रणजित, राजपूत, राणा या डिस्ट्रॉयर्स; गंगा, गोमती, गोदावरी या हंटक्लास विनाशिका; मगर, धरणी, कारवार, शक्ती, विक्रांत या विमानवाहू नौका इत्यादी युद्धनौका भारताने १९५५ ते १९६२ सालापर्यंत संपादन केल्या. भारताची पहिली ध्वजनौका (फ्लॅग शिप) होण्याचा मान भारतीय नौसेना पोत दिल्लीस मिळाला. ह्याच जहाजावरून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू  ह्यांनी १९५८ साली नौसेनेचा युद्धाभ्यास पाहून पुढील संदेश दिला होता:

“भारत हा समुद्राने अगदी लपेटलेला देश आहे. पूर्वीच्या काळी समुद्राशी आपले निकटचे संबंध होते. परंतु नंतर आपण दुर्बळ झालो. आता आपण स्वतंत्र झालो आहोत. त्यामुळे आपली सागरी शक्ती दुबळी राहून चालणार नाही; कारण ज्याचे सागरावर प्रभुत्व आहे त्यापासून भारताच्या स्वातंत्र्याला धोका आहे हा इतिहासाने दिलेला धडा आहे.” (‘India is in the very lap of an ocean. Earlier, we had intimate connection with the sea. Later on, we became weak. Now that we are free, we cannot afford to be weak at sea history has shown that whichever power controls the seas has India at her mercy and India’s very independence itself’).

भारत हे एक सागरी राष्ट्र आहे. शांततेच्या व युद्धाच्या काळात समुद्री व्यापार आणि सागरी दळणवळणच्या मार्गांचे व सागरी हद्दींचे संरक्षण करणे हि गांभीर्याने लक्ष देण्याची बाब आहे. ‘जमिनीवर सुरक्षित राहण्यासाठी आपण आधी समुद्रावर अधिराज्य गाजवायला हवे,’ अशी एक म्हण आहे. आजच्या काळानुसार ती अधिकच लागू पडते.   

-विनायक अभ्यंकर 

सौजन्य : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश 

 न्यायपालिका,प्रशासन, संरक्षण खंड