आपले जग, इथले निर्जीव पदार्थ आणि सजीव प्राणिमात्र यांचे गुणधर्म यांचा पद्धतशीर अभ्यास करणे आणि निसर्गाचे नियम समजून घेणे म्हणजे विज्ञान (सायन्स). भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि त्यांच्या उपशाखांचा समावेश विज्ञानात केला जातो. यात मांडलेले सिद्धांत प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करून दाखवले जातात.
 
प्राचीन काळातले ऋषीमुनि आणि विद्वानांनी अनेक शास्त्रांचा विकास केला होता. मंत्रतंत्र, स्तोत्रे, कथा, पुराणे, वगैरें धर्मशास्त्रे पिढी दर पिढी पुढे दिली गेली. योगविद्या, आयुर्वेद, ज्योतिष वगैरे काही शास्त्रेही टिकून राहिली. पण विज्ञानाशी संबंधित शास्त्रांना बहुधा प्राधान्य दिले जात नसावे. आर्यभट, वराहमिहिर आदि विद्वानांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, गणित वगैरे विषयांवर मोलाचे काम केले होते, पण त्यांच्यामागे शास्त्रज्ञांची मालिका तयार झाली नाही. त्यांचे सिद्धांत आणि सूत्रे यांचा प्रसार मधल्या काळात थांबला. मध्ययुगाच्या काळात त्यांच्या संस्कृत ग्रंथांवर मराठी किंवा हिंदीसारख्या भाषेतही भाष्य किंवा लेखन झालेले दिसत नाही. 
 
युरोपमध्ये पूर्वीच्या काळात ज्ञानाचा प्रसार करण्याचे काम मुख्यतः धर्मगुरूंकडेच होते. तेव्हा विज्ञानाचा समावेश तत्त्वज्ञानात केला जात होता. तिकडल्या काही ठिकाणी विद्यापीठांची स्थापना झाली होती आणि तिथे विविध विषयांवरील पुरातन ग्रंथांचा आणि इतर शास्त्रांसोबत खगोलशास्त्र व गणितासारख्या विषयांचासुद्धा अभ्यास केला जात असे. अॅरिस्टॉटल, टॉलेमी, युक्लिड, पायथॉगोरस, आर्किमिडीस आदि प्राचीन काळातल्या विद्वानांनी सांगितलेली प्रमेये, सिद्धांत, नियम वगैरे त्यांच्या नावानिशी जतन करून ठेवले गेले होते आणि त्यामध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांना ते शिकणे शक्य होते. 
 
गॅलिलीओ गॅलीली या इटालियन शास्त्रज्ञाने विज्ञानामधल्या निरनिराळ्या विषयांवर संशोधन केले, त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग आणि प्रात्यक्षिके केली, निरीक्षणे आणि गणित यांची सांगड घालून त्यामधून तर्कशुद्ध निष्कर्ष काढले आणि ते सुसंगतपणे जगापुढे मांडले. यालाच शास्त्रीय पद्धत (सायंटिफिक मेथड) असे म्हणतात आणि पुढील काळातले संशोधन कार्य त्या पद्धतीने होऊ लागले. म्हणून गॅलिलीओला आधुनिक विज्ञानाचा जनक समजले जाते. 
 
गॅलिलीओचा जन्म १५६४ साली इटलीमधल्या सुप्रसिद्ध पिसा या गावात झाला. त्याचे वडील एक संगीतज्ञ होते. कुशाग्र गॅलिलीओने लहानपणी संगीत आणि त्यातले गणित आत्मसात केले. त्या काळातही डॉक्टरांची कमाई चांगली होत असे म्हणून त्याला वैद्यकीय शास्त्राच्या शिक्षणासाठी विद्यापीठात पाठवले होते. पण त्याचा ओढा विज्ञानाकडे असल्यामुळे त्याने औषधोपचाराऐवजी गणित आणि नैसर्गिक तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळवले. 
 
शिक्षण सुरू असतानाच गॅलिलीओचे लक्ष चर्चमध्ये टांगलेल्या झुंबरांकडे गेले. ती झुंबरे वाऱ्याने कमी जास्त झुलत होती, पण हवेने त्यांना जोरात ढकलले किंवा हळूच लहानसा झोका दिला तरी त्यांची लहान किंवा मोठी आंदोलने सारख्याच वेळात होतात असे त्याला वाटले आणि त्याने आपल्या नाडीच्या ठोक्यांच्या आधारे ते झोके मोजले. त्याने घरी येऊन दोन एकसारखे लंबक तयार करून टांगले. त्यातल्या एकाला जास्त आणि दुसऱ्याला कमी खेचून सोडले तरी दोन्ही लंबक एकाच लयीमध्ये झुलत राहिले. लंबकांची लांबी समान नसली तर मात्र त्यांच्या आंदोलनांचा वेळ कमी जास्त झाला. गॅलिलीओने त्यावर संशोधन करून त्याचे सूत्र तयार केले.
 
भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयांमध्ये गॅलिलीओने मोलाची भर घातली. उंचावरून खाली पडत असलेल्या वस्तूंच्या किंवा उतारावरून घरंगळत खाली येणाऱ्या चक्रांच्या गतीच्यासंबंधी त्याने केलेल्या निरीक्षणांचा आणि मांडलेल्या विचारांचा पुढे न्यूटनला उपयोग झाला. गॅलिलीओने ध्वनींची कंपनसंख्या आणि प्रकाशाचा वेग मोजण्याचे प्रयत्न केले. त्याने तपमान मोजणे, वजन करणे वगैरे कामे करणारी नवी उपकरणे बनवली, लश्कराला लागणाऱ्या कंपॉसपासून ते दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक यंत्रापर्यंत अनेक प्रकारची उपकरणे गॅलिलीओने तयार केली, बाजारात विकली आणि संशोधनासाठी स्वतः वापरली. 
 
गॅलिलीओने तयार केलेल्या शक्तीशाली  दुर्बिणींमधून आकाशाचे खूप बारकाईने निरीक्षण केले. चंद्राला असतात तशाच शुक्रालासुद्धा कला असतात हे त्याने पाहिले तसेच शनी ग्रहाच्या सभोवती असलेली कडी पाहिली. त्याने शनी ग्रहाच्या पलीकडे असलेल्या नेपच्यूनलाही पाहिले, पण तो सूर्याभोवती फारच मंद गतीने फिरणारा ग्रह न वाटता एकादा अंधुक तारा आहे असे त्याला वाटले. गुरू या ग्रहाला प्रदक्षिणा घालणारे चार लहानसे ठिपके पाहून त्याने ते गुरूचे उपग्रह असल्याचे अनुमान केले. त्यापूर्वीच्या शास्त्रज्ञांना आकाशात दिसणारे फक्त तारे आणि ग्रह माहीत होते, उपग्रह ही संकल्पनाच नव्हती. पृथ्वीलाच ग्रह मानले जात नसताना चंद्र हा फक्त चंद्रच होता. गॅलिलीओने सूर्यावरचे डाग आणि चंद्रावरचे डोंगर व खळगे पाहिले. धूसर दिसणारी आकाशगंगा असंख्य ताऱ्यांनी भरलेली आहे असे सांगितले. ग्रह आणि तारे यांचे ढोबळपणे आकार मोजण्याचाही प्रयत्न केला. आकाशातले सगळे तारे एकाच प्रचंड गोलाला चिकटले आहेत असे अॅरिस्टॉटलने वर्तवले होते आणि मानले जात होते. ते निरनिराळ्या अंतरावर असल्याचे गॅलिलीओने निरीक्षणांवरून सिद्ध करून दाखवले. 
 
गॅलिलीओला खगोलशास्त्राची खूप आवड होती आणि त्याने गणितातही प्राविण्य मिळवले होते. त्याने कोपरनिकस आणि केपलर यांनी केलेल्या संशोधनाचा आणि किचकट आकडेमोडीचा अभ्यास केला. त्यांनी मांडलेली सूर्यमालिकेची कल्पना गॅलीलिओला पटली आणि त्याने ती उचलून धरली. सूर्य एका जागी स्थिर असून पृथ्वी त्याच्याभोवती फिरते हे मत बायबलमधल्या काही ओळींच्या विरोधात जात होते. धर्मगुरूंनी ते खपवून घेतले नाही आणि गॅलिलीओने या विषयावरचे काम ताबडतोब थांबवावे असा आदेश दिला. त्याने तो आदेश पाळला आणि आपले मत बदलले नसले तरी ते उघडपणे मांडणे टाळले. तरीही सोळा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच्यावर खटला भरून त्याला नास्तिकपणाच्या विचारांचा प्रसार करण्याच्या गुन्ह्यासाठी आजन्म स्थानबद्धतेची शिक्षा फर्मावली गेली.
 
गॅलिलीओने केलेली मोलाची गोष्ट म्हणजे त्याने जगाला एक वैज्ञानिक दृष्टी आणि शास्त्रीय पद्धत (सायंटिफिक मेथड) दिली. संशोधनामधून निघालेले विचार रूढ समजुतींना किंवा जुन्या विद्वानांनी सांगितलेल्या सिद्धांतांना धक्का देणारे असले तरीही ते सुसंगतपणे आणि प्रामाणिकपणे मांडणे याची वैज्ञानिक चौकट घालून दिली. त्यापुढे आजतागायत होत असलेले संशोधन साधारणपणे अशा पद्धतीने केले जात आहे. म्हणून गॅलिलीओला आधुनिक विज्ञानाचा जनक हे सार्थ नाव दिले गेले. 
 
सूर्यमालिकेतील ग्रह आणि ताऱ्यांच्या भ्रमणासंबंधी कोपरनिकसने लावलेले शोध वाचा खालील लिंकवर 

- आनंद घारे