दुपारची शाळा सुटल्यावर शमी उत्साहातच घराकडे निघाली. वाटेत मैत्रिणींसोबत घरी येताना आज नेहमीपेक्षा तिचीच बडबड जास्त होती. बोलण्याचा विषयसुद्धा तिचा एकच, तो म्हणजे वर्गावर आलेल्या नवीन चित्रकलेच्या बाई-मुळेबाई. त्यांची आणि वर्गातल्या मुलांची आज पहिलीच भेट झाली. बहुतेक त्या शाळेत नव्यानेच रुजू झाल्यात, असं मुलांना वाटलं. सुरुवातीला  मुलांची त्यांनी ओळख करून घेतली, मग थोड्या गप्पा मारल्या. मुलांची कळी हळूहळू खुलली. थोड्याच वेळात काही मुलं तर चुरूचुरू बाईंशी बोलायलाही लागली. गप्पा झाल्यावर बाईंनी मग फळा भरून एक निसर्ग चित्र काढलं. रंगीत खडूंनी त्या चित्रात मस्त रंग भरले. हिरवीगार डोलणारी झाडं, आकाशात उंच भरारी घेणारे पक्षी, हिरवी शाल पांघरून बसलेले डोंगर, डोंगरांवरून दुथडी भरून वळणावळणाने वाहणारी नदी आणि नदीकाठच्या गवतावर चरणारी गुरं-वासरं. निसर्गाचा अप्रतिम देखावा रेखाटला होता फळ्यावर. शमीला त्या चित्राने मोहिनीच घातली जणू. ते चित्र तिला सजीव वाटलं. जणू ते तिच्याशी बोलतंय, तिला काही सांगू पाहतंय, असा तिला भास झाला. या निसर्गचित्राच्या आधारेच मग मुळेबाईंनी निसर्गाचे महत्त्वसुद्धा वर्गाला पटवून दिलं. मुलांना हे सारंच भारी वाटलं. शमीला तर नवीन बाई खूप म्हणजे खूप आवडल्या. घरी येताना वाटेत शमी मैत्रिणींना म्हणालीसुद्धा, ‘‘बाई कित्ती छान आहेत, हो की नाही? चित्रं तर कित्ती सुंदर काढतात, हो की नाही? समजावूनसुद्धा कित्ती छान सांगतात, हो की नाही? आणि आपलं चुकलं तर रागवतसुद्धा नाही.’’ आता मैत्रिणी हसून तिच्या री ला री ओढत पटकन म्हणाल्या, ‘‘हो की नाही...’’ मग वातावरणात एकच हशा पिकला. तेवढ्यात रेवती म्हणाली, ‘‘काय गं शमे, आज सारखं आपलं, हो की नाही, हो की नाहीचं पालुपद सुरू केलंयस ते.’’ शमीला आपल्या लकबीचं हसूच आलं. मधुरा म्हणाली, ‘‘आम्हीसुद्धा सार्याजणी मुळेबाईंवर बेहद्द खूश आहोत. एका दिवसात त्यांनी आपल्याला किती आपलंसं केलंय.’’ यावर सर्वांचंच एकमत झालं. आता पावलं घराकडे भरभर वळली.

शमीने घरात पाऊल टाकताच आईला मोठ्ठ्याने हाक मारली. मुळेबाईंबद्दल, त्यांच्या चित्रकलेबद्दल, त्यांनी सांगितलेल्या निसर्गाबद्दल कधी आईला सारं सांगेन असं तिला झालं होतं. आई तिचा उत्साही चेहरा पाहून म्हणालीच,  ‘‘काय गं शमू, आज खूप खूश दिसतेस. शाळेत काही विशेष घडलं वाटतं?’’ ‘‘छे बाई... तुला माझ्या मनातलं चटकन कळतं सारं. काहीच गुपित राहत नाही. अगं खरंच, विशेषच घडलं आज शाळेत.’’ असं म्हणून शमीने चित्रकलेच्या नवीन मुळेबाईंबद्दल आईला सारं सांगितलं. आई म्हणाली, ‘‘शमू, तुला चित्रकला आवडते. तू चित्रही छान काढतेस. पण मला वाटतं तुझ्या मुळेबाईंच्या मार्गदर्शनामुळे आता तू त्याहून आणखी छान चित्र काढशील. पण, शमू तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का, तुझ्या मुळेबाईंनी चित्रकलेच्या माध्यमातून निसर्ग, पर्यावरण यांची छान, उपयुक्त माहितीही तुम्हांला सांगितली, म्हणजेच त्यांनी चित्रकला विषयाला सहजपणे भूगोल, विज्ञानाची जोड दिली. शमू, हे विषय असतात ना, ते एकटे एकटे येतच नाहीत मुळी! ते नेहमी हातात हात घालूनच येतात. म्हणूनच, एका विषयाचा आपण केलेला अभ्यास दुसर्या विषयाची तयारी करताना उपयोगी पडतो. बाईंनी निसर्गाबद्दल तर खूपच छान माहिती सांगितली तुम्हांला. खरोखरच, निसर्ग हा आपला जिवाभावाचा मित्रच. त्याच्या सहवासात आपलं मन प्रसन्न होतं. झाडांतून-माडांतून, वनांतून-बनांतून, पानांतून-फुलांतून, झर्यातून-वार्यातून, डोंगर-दरीतून तो आपल्याला साद घालत असतो. पर्यावरणाचा समतोल तो साधत असतो. झाडं तर आपले सखेसोबती होऊन नेहमीच आपल्याला भरभरून देत असतात. शमू, हे झाड जेव्हा छोटं रोपटं असतं ना, तेव्हा ते वाटे जणू छोटे बाळच. थरथरते, बावरते पायात त्याच्या जणू चाळच. जेव्हा रोपट्याहून ते थोडं मोठं होतं, तेव्हा ते वाटे जणू छोटा किशोरच. धडपडतो, बागडतो अवखळ जसा पोरच. जेव्हा झाड त्याहून थोडं मोठं होतं, तेव्हा ते वाटे जणू एक कुमारच. कळते, सवरते नेमकेपणाने वागे फारच. जेव्हा झाड होते भले मोठ्ठे, तेव्हा वाटे जणू एक तरुण. फुलतो, डवरतो जणू पाही डोळे भरून. जेव्हा झाड होतं जुनं, तेव्हा वाटे जणू एक म्हातारा. थकलेला, वाकलेला शुभ चिंतणारा. शमू, झाड फार गुणी असतं. ते भरभरून देतं. मायेने सार्यांना सावलीत घेतं. शमी लगेच म्हणाली, ‘‘म्हणजे आई, ही झाडं आपल्यासारखीच असतात. हळूहळू मोठी होतात. फक्त त्यांना बोलता येत नाही आणि आपण मात्र दुखलं-खुपलं, काही हवं नको, की लगेच बोलून सांगतो.’’ आई म्हणाली, ‘‘खरंय तुझं बाळा. बरं चल आटप, भूक लागली असेल ना तुला? शाळेचे कपडे बदल. हात पाय स्वच्छ धुऊन ये. गरमा-गरम साजूक तुपातला शिरा करते. आवडतो ना तुला?’’ ‘‘अरे व्वा मस्त..! आले हा लगेच’’, असं म्हणून शमी पटकन हात-पाय धुवायला गेली.

 संध्याकाळी शमी, बाळू अभ्यासाला बसले. बाळू त्याचा गृहपाठ करत होता, तर शमीने चित्रकलेच्या वहीत पाना-फुला-फळांनी डवरलेलं एक सुंदर डेरेदार झाड काढलं. झाडावर सुगरणीचं लोबकळणारं घरटं, पक्ष्यांची रांगसुद्धा काढली. रंगीत खडूने ते चित्र रंगवलं. चित्र पूर्ण रंगवून झाल्यावर बाळूला म्हणाली बाळूदा, ‘‘कसं वाटतंय माझं चित्र?’’ बाळू डोळे मोठे करून म्हणाला, ‘‘व्वा... तुझ्या  शाळेच्या काचफलकात लावतील हे चित्र. खूपच सुंदर काढलंस तू. तुझ्या हातात जादू आहे.’’

शमी आनंदाचं बहरलेलं झाड झाली जणू. झाडांचं महत्त्व मुळेबाईंनी आणि आईने तिला सांगितलं होतं, त्यामुळेच शमीला झाडाचं चित्र काढावंसं वाटलं. पण, आता चित्र काढून झाल्यावर काय करावं, याचा विचार करत असताना तिला चटकन एक गोष्ट आठवली. तिथून ती उठली. वही आणि पेन घेऊन खिडकीपाशी गेली. तिच्या खिडकीतून रस्त्यावरचं एक भलं मोठ्ठं थोरलं झाड दिसतं. ती त्या झाडाचं आज मुद्दामहूनच बारकाईने निरीक्षण करत राहिली. तिच्या लक्षात आलं की, झाडावर नाना तर्हेचे पक्षी येतात. चोचीतलं गाणं गाऊन जातात. शमीला काहीतरी सुचलं. ती वहीत भरभर लिहायला लागली...

वार्यावरी डोलतात, पानांफुलांतून बोलतात

एक एक मिळून, निसर्ग सारा फुलवतात

 

अन्न, वस्त्र, निवार्याची, गरजही भागवतात

प्राणवायू भरभरून, वाटून सार्यांना देतात

 

स्वतः उन्हाच्या झळा, झेलत उभी राहतात

भेदभाव न करता, सावलीत सार्यांना घेतात

 

मातीत मुळं घट्ट रोवून, मातीलाही सांभाळतात

प्रदूषणाला आळा घालून, पर्यावरणही राखतात

 

उंच उंच वाढत जाऊन, पावसाला बोलवतात

अंगाखांद्यावर पाखरांना, आनंदाने जोजवतात

 

कुणी म्हणे झाड त्यांना, कुणी म्हणे वृक्ष

वृक्ष नसेल धरतीवर, तर जगणे होईल रुक्ष

 

देणे त्यांना ठाऊक फक्त, नाही कसली खंत

वृक्ष हे वाटतात मला, जणू परोपकारी संत.

 

कविता लिहिण्याचा वसा तिने बाळूकडूनच घेतला होता. आता कामाहून बाबा घरी आल्यावर सर्वांना ही कविता एकाच वेळी ऐकवायची, असं तिनं मनाशी पक्कं ठरवलं. कवितेची वही मिटली आणि तिनं पुन्हा एकवार त्या झाडाकडे पाहिलं. आता तिला ते झाड जणू एखाद्या ऋषीमुनीसारखं दिसायला लागले. तिने पटकन आईला, बाळूला हाक मारली. झाडाच्या रूपाने ध्यानस्थ बसलेल्या ऋषीमुनींचं दर्शन घेण्यासाठी!

-एकनाथ आव्हाड

[email protected]