बायजाबाईच्या दाराची कडी वाजली - टक टक टक! पण कडी वाजवणारं कोणीच नव्हतं. कोणीच...

पण जशी वाजली, तशी ती बंदही झाली. भुताटकीच की!

रात्रीची वेळ होती. धरणगावातली एक गल्ली. खांबावरचा लाईटचा दिवाही गेलेला. अंधार आणि सामसूम. घरंही मोठी-जुनी. एकमेकांपासून लांब. दिवाळी संपल्याने आता आकशकंदीलही नव्हते.

जुन्या लाकडी दारावरची, तीन कड्या असलेली ती लोखंडी कडी पुन्हा टकटकली.

आत बसलेल्या, पोथी वाचणार्‍या बायजाबाईला आता ती ऐकू आली. ‘कोण आलंय ह्या पारी?’ म्हणत तिने दार उघडलं. बाहेर कोणी नव्हतं. गार वारा तेवढा अंगावर आला. ती शहारली. समोरचा पिंपळ सळसळला.

बायजाबाई पुन्हा आत गेली. पुन्हा कडी वाजली... कोणाचे अदृश्य हात कडी वाजवत असावेत?

पुन्हा कडी वाजली. अन् काय गंमत? तिने आत जाऊन आरतीचं ताट आणलं. बिच्चारी! खूप साधी आणि देवभोळीबाई ती! तिच्या डोक्यात भूत-बित कुठनं यायला?

तिने दार उघडलं व म्हणाली, ‘देवा! तू वाजवतोयंस माझी कडी?’

मग तिने हवेत हळद-कुंकू उधळलं. अक्षताही टाकल्या. मग दिव्याचं ताट ती अशीच हवेतच ओवाळू लागली. मग आरती? पण आरती म्हणायची कुठली? तिला कळेना. देव आलाय तरी कुठला? मारुती देव कडी वाजवतोय? की शंकर-तिसरा डोळा उघडून कडी हलवतोय? या विचारात ती असताना पुन्हा कडी वाजली - टक्..

मग ना, मोठा टिंग लावलेल्या, जाडजूड बायजाबाईने तिला येत असलेल्या सगळ्या आरत्या म्हणण्याचा सपाटाच लावला.

मग तर खाशी गंमत झाली. तिच्या आरत्यांना घंटी ऐवजी ती कडी साथ देऊ लागली. कडी आरतीच्या तालात वाजू लागली. कधी टुंग टांग तर कधी टुंग टुंग टुंगुक!

मग तिने हवेतच नमस्कार केला व गेली आत.

पुन्हा ती बाहेरची कडी वाजली. तिने दार उघडलं तर वरून हळद-कुंकवाचा वर्षाव झाला. बायजाबाईने लाल-पिवळा मळवटचं भरला जणू!

‘बाई गं। देवा, धन्य झाले!’ डोळे मिटून ती बडबडू लागली. खाली एक कुत्रं खाण्याच्या आशेने त्या हळद-कुंकवात घुटमळून गेलं. तिने डोळे उघडून खाली पाहिलं, तर त्यामध्ये ठसे-पावलांचे!

‘देवा तू प्रत्यक्ष माझ्या दारी आलास? माझ्यासाठी?

पलीकडे लांबवर खसखस पिकली.

इकडे घरातून तिचा नवरा, बाबूराव बाहेर आला.

‘काय तरी याडपना करती. अगं, कुत्र्याच्या पावलाने देव?’

‘आँ? म्हणजे दत्तमहाराज आले असणार...’ झाली सुरू.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।’

बाबूरावाने तिला आत नेले, तर पुन्हा कडी वाजली. आता त्याने दार उघडलं. तर वरून दह्या-दुधाचा वर्षाव झाला.

एक पिवळं भूत, तर एक पांढरं भूत झालं! ते दोघे.

तर बायजाबाई? ‘कान्हा माझ्या कान्हा, तू आला व्हयं कृष्णा?’

तसा अंधारातून एक पोरगं पुढे झालं. कृष्णा त्याचं नाव.

‘कावं रातीच्या टायमाला बोलवताय?’

‘ए शहाण्या, मी कुटं तुला बोलवतीया? मी तर माझ्या कृष्णाला बोलवतीया.’

त्यावर कृष्णा हसतच सुटला. मग बाबूरावाला भानगड उलगडली.

त्याने अंधारात कडी नीट पाहिली. तिला एक बारीक काळा धागा बांधला होता. कडी ओढायला, ती वाजवायला आणि त्याचं दुसरं टोक होतं- पिंपळावरून पार पलीकडे. वात्रट यशच्या हातात. पण बायजाकाकू आरती करतील असं त्यांना वाटलं नव्हतं.

मग अंधारात लपलेली ती सारी पोरं बाहेर आली व हसू लागली. यश, अभी, पज्या, समर्थ, सार्थक.

मग बाबूरावही हसत सुटले. ते चांगले होते व त्यांना पोरं आवडायची. अन्, ही अनपेक्षितच गंमत झाली होती.

‘अगं येडे, पोरांनी तुला येडं बनवलं! त्यांना तरास देते ना तू. खेळू देत न्हाई ना, वरडतेस ते. आणि देवावर श्रद्धा ठेव पण अशी अंधःश्रद्धा नको ठेवूस!’

मग ते पोरांकडे वळले, ‘पोरांनो, परत आसं करू नका.’

‘नाही करणार काका. पण आम्हाला खेळताना ओरडायचं नाही.’

काका त्यांना म्हणाले, ‘न्हाई वरडणार!’ मग ते बायकोकडे वळून म्हणाले, ‘बायजे, अगं पोरांच्या रूपातबी देव असतो.’

बायजाबाई कुठली ऐकायला? म्हणाली, ‘छट्! देव कधी किरकेट खेळतो व्हय? आरडाओरडा करतो व्हय?’

बायजाबाईने बदलायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?

आणि पोरं? ती तर हसत-खिदळत, टाळ्या पिटत अंधारात गायब झाली. तर बायजाबाई हळद-कुंकू पुसू लागली आणि बाबूराव मिशीवरच्या दह्याची चव बघू लागले.

- ईशान पुणेकर

[email protected]