गेलं वर्षभर आपण “विद्यार्थ्यांसाठी योगशिक्षण” या लेखमालेतून, मुलांना सोप्या प्रकारे योगाभ्यास कसा शिकवता येईल याविषयी बरीच चर्चा केली. अर्थात योगशास्त्रात प्रत्यक्ष अनुभूतीला खूप महत्त्व असल्यामुळे, फक्त चर्चा न करता, आसने, ध्यान, योगनिद्रा या व इतर अनेक योगप्रक्रिया मुलांना सुलभतेने कशा शिकवायच्या हेही पाहिलं. हे सगळं करताना, “ह्या सगळ्याचा मुलांवर चांगला परिणाम होतो याला पुरावा काय?” असा प्रश्न नक्कीच आपल्या सर्वांच्या मनामध्ये आला असेल. अनेक योगसंस्थांनी आत्तापर्यंत “विद्यार्थ्यांवर योगाच्या वेगवेगळ्या प्रक्रियांचा काय परिणाम होतो” या विषयावर भरपूर संशोधन केलं आहे. या वेगवेगळ्या संशोधनांची माहिती आपण या भागात घेऊ या !

“बुद्धिमत्ता संवर्धन प्रकल्प” –

नाशिकच्या योग विद्या गुरुकुल संस्थेने, काही शाळांमधे प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांचे गट तयार केले. प्रत्यक्ष प्रकल्प सुरू करण्यापूर्वी या विद्यार्थ्यांच्या शास्त्रोक्त पद्धतीने “बुद्धिमत्ता चाचण्या” घेण्यात आल्या. त्यानंतर त्यांना तीन महिने योगाभ्यास शिकवण्यात आला. तीन महिन्यांच्या या योगप्रशिक्षणानंतर परत प्रकल्पोत्तर चाचण्या घेतल्या. या चाचण्यांवरून, “योगाभ्यासामुळे बुद्धिमत्ता वाढते” असा निष्कर्ष काढण्यात आला.

“प्रणवजपानुभव प्रकल्प”–

ओमकार (प्रणव) म्हटल्यामुळे मुलांमध्ये काही बदल घडतात का? हे पाहाण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हातात घेतला गेला. यामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना दररोज नियमितपणे अर्धा तास याप्रमाणे एक महिनाभर शास्त्रशुद्धरीत्या ओमकारजप करायला लावला. एक महिन्यानंतर विद्यार्थ्यांची “एकाग्रता, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती” या तीन गोष्टी तपासण्यात आल्या. या तीनही गोष्टींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसलं. या संशोधनातून प्रेरणा घेऊन “योगविद्याधाम” या संस्थेने अडीचशे ते तीनशे शाळांमध्ये (विशेषतः अंबरनाथमध्ये) सामुहिक ओमकारजप शिकविण्याचं कार्य हाती घेतलं.

योगातल्या अनेक प्रक्रियांमुळे मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमता वाढतात असा अनुभव वेळोवेळी आला आहे. पण हा अनुभव म्हणजे कदाचित योगावरच्या श्रद्धेचाच भाग आहे का? अशी शंका काही तज्ज्ञांच्या मनात असते. पण आधुनिक विज्ञानाच्या, प्रामुख्याने मानसशास्त्राच्या कसोट्या लावून, या क्षमतांचं मोजमाप करून, या क्षमता निश्चितपणे वाढतात हे सिद्ध झालं आहे.

शाळेतल्या मुलांना एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या विषयांचे तास असतात. अशा वेळी एका विषयातून दुसऱ्या विषयात मनाला सहजतेनं नेणं हे बऱ्याच मुलांना अवघड होतं. या समस्येतून बाहेर पडण्यासाठीही एक संशोधन झालं आहे.

प्रत्येक तास सुरू होण्यापूर्वी दहा वेळा ओमकार आणि दोन मिनिटांचं शरीराचं शिथिलीकरण करायला मुलांना सांगण्यात आलं. यामुळे नंतरचं ज्ञानग्रहण अधिक परिणामकारक झालं असं आढळलं.

अभ्यासात एकाग्रता न होणं, लक्षात न राहणं, परीक्षेची भीती वाटणं, लक्षात असलेल्या गोष्टी ऐन परीक्षेच्या वेळी नीट लिहिता न येणं अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांना नेहमीच येतात. योगानिद्रेच्या नियमित अभ्यासामुळे या समस्या सुटल्या असं लक्षात आलं आहे.

कौशल्यसंवर्धन –

केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणं हा शिक्षणातला एक पैलू आहे. पण परिपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी कला आणि क्रीडा क्षेत्रातलं प्राविण्यही तितकंच महत्त्वाचं मानलं जातं. यासाठी स्नायुसंस्था आणि मज्जासंस्था यातलं संतुलन (Neuro-Muscular Coordination) गरजेचं आहे. खेळताना हालचालींची गती आणि आणि अचूकता ही या संतुलनामुळे मिळते. कलेच्या प्रांतात पुढे यायचं तर प्रतिभा ही आवश्यक असतेच. पण ती नुसती अंगात असणं पुरेसं नसतं. या प्रतिभेचं शरीराच्या माध्यमातून होणारं प्रकटीकरण हे या संतुलनामुळेच शक्य होतं. हे संतुलन नियमित योगाभ्यासामुळे सुधारतं हे अनेक संशोधनातून पुढे आलेलं आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक व जेष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ सुधारण्यासाठी त्यांना योगाचं प्रशिक्षण दिलं आहे. भारतरत्न सचिन तेंडूलकर हा गरजेनुसार पुण्यातील विश्वविख्यात योगाचार्य अय्यंगार गुरुजींकडे योगाचे धडे गिरवायला येत असे.

मेधा संस्कार संशोधन –

ठाण्याच्या घंटाळी मित्रमंडळाने इयत्ता ९वीच्या ४५ विद्यार्थ्यांना योगनिद्रा, प्राणायाम, ओमकार अशा योग प्रक्रियांचं चार महिने प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षणाच्या सुरुवातीला, दोन महिन्यानंतर आणि संपण्यापूर्वी अशा तीन वेळा त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून त्यांचं केंद्रीकरण, ज्ञानग्रहण, आकलन, स्मरण, बुद्धी, स्मृती या सर्वांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

“हातच्या कांकणाला आरसा कशाला” ही म्हण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे होणारे अनेक फायदे वरील संशोधनातून अगदी ठळकपणे पुढे आलेले आहेत. त्यामुळे सगळ्या शाळांमधून योगाचं प्रशिक्षण हे सातत्यानं, नियमितपणे दिलं जायला हवं. हीच आजच्या उमलत्या पिढीची गरज आहे.  

छोट्या छोट्या सोप्या तंत्रांतून निसर्गाच्या माध्यमातून मुलांना प्रत्यक्ष ध्यान कसं शिकवता येईल?वाचा खालील लिंकवर 

विद्यार्थ्यांसाठी ध्यान – भाग २

- मनोज पटवर्धन

[email protected]