मोराची तक्रार

दिंनाक: 21 Dec 2017 14:39:27

इयत्ता ७वीत शिकणाऱ्या राधा मुंढे हिने लिहिलेली ही पावसाची आणि मोराची तक्रार विचार करायला लावणारी आहे. सगळीकडे पर्यावरणीय ऱ्हास होत असताना मोराची ही तक्रार फार फार महत्त्वाची ठरते.

 

देवाकडे आला एकदा मोर,

म्हणाला, पकडून दे, आम्हाला पावसाचा जोर.

देव म्हणाला, मानवांनी चूक केली घोर

कापून टाकली निसर्गाची दोर.

 

मोर म्हणाला पुढे,

“मानवांना देऊ आम्ही धडे.

चूक करणार नाही अशी गडे,

पृथ्वीवर थेंब टाक ना थोडे”.

 

“मोरांचा मी एजंट,

गढूळ पाण्यामुळे लावला मी केंट.

पिवळसर शेतांना दे ना हिरवा पेंट,

छान ओलसर मातीचा घेऊ देना सेंट.”

 

सांगता सांगता मोराचे डोळेच भरले,

हुंदके आवारात स्वतःला आवरले.

देवाने पाऊस पाडायचे ठरवले

मोराने मनोमनी पावसाचे स्वप्न गिरवले.

 

कवितेच्या शेवटी मोराचे पावसाला आळवणे आणि त्या आळवण्याने पावसाने जमिनीवर पडणे, हा तरतमभाव नेमकेपणाने पकडला आहे. मानवाला नसली तरी पक्ष्यांना, प्राण्यांना पावसाची गरज आहे, याची जाणीव करून देणारी ही कविता फारच मौलिक आहे.

- राधा सुनील मुंढे