मित्र-मैत्रिणींनो, शब्दांच्या प्रवासातील चौथ्या आणि पाचव्या टप्प्यावर, आपण डोळे, कान, नाक, तोंड, हात, पाय, दात, या अवयवांवर आधारित वाक्प्रचार, रागावणे, खाणे, विविध रंग, यांवर आधारित वाक्प्रचार, तसंच अतिशयोक्तीचे,ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ असलेले आणि विविध व्यवसायातून आलेले वाक्प्रचार पाहिले. अनागोंदी कारभार, अटकेवर झेंडा लावणे, कडेलोट होणे, कंबर कसणे, राम नसणे, रामबाण, भगीरथ प्रयत्न, या वाकप्रचारांमागील गोष्टीही पाहिल्या. काही वाकप्रचारांमध्ये सामाजिक परिस्थितीचंही दर्शन होतं. उदा., पूर्वी जेव्हा खूप स्वस्ताई होती, तेव्हा दुष्काळी दिवसांत मात्र महागाई होऊन, रुपयाला पाच शेर धान्य मिळत असे. साहजिकच लोक हवालदिल होत. त्यावरून वाक्प्रचार रूढ झाला, पाचावर धारण बसणे. वाक्प्रचार ज्याप्रमाणे आपल्या भाषेचं वैभव आहेत, त्याप्रमाणे म्हणीसुद्धा आपल्या भाषेचं धन आहे. म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणीच आहेत. 'A  proverb is a short sentence drawn from long experience.'  अर्थात दीर्घ अनुभवाचे लघु बोल म्हणजे म्हणी. म्हण ही सुईसारखी असते. short , sharp and shining.

अन्नपदार्थांवर आधारित म्हणी पाहायच्या झाल्या तर, शितावरून भाताची परीक्षा, कोल्ह्याला द्राक्षं आंबट, नावडतीचे मीठ अळणी, साखरेचे खाणार त्याला देव देणार, गाढवाला गुळाची चव काय, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले, सुंठीवाचून खोकला गेला , इत्यादी. तुम्ही सुद्धा अशा म्हणी आठवा आणि मला नक्की सांगा. तसंच या म्हणींच्या अर्थाचाही विचार करा बरं.

आता अंकदर्शक म्हणी बघू या. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ, आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन, एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारू नये, पहिले पाढे पंचावन्न इत्यादी. अंकदर्शक म्हणींची पण यादी करा.

बाराखडीपासून तयार होणाऱ्या काही म्हणी आता पाहू या. असतील शिते तर जमतील भुते, अति तिथे माती, अडला हरी गाढवाचे पाय धरी, आवळा देऊन कोहळा काढणे, आपलेच दात आणि आपलेच ओठ, उथळ पाण्याला खळखळाट फार, ऐकावे जनाचे करावे मनाचे, करावे तसे भरावे, खाई त्याला खवखवे, गुळाची गोडी साखरेला कशी येणार?, घरोघरी मातीच्या चुली, चोराच्या उलट्या बोंबा, जुने ते सोने, झालं गेलं गंगेला मिळालं, पी हळद हो गोरी, बडा घर पोकळ वासा, माय मरो मावशी जगो, ये रे माझ्या मागल्या, रात्रं थोडी सोंगे फार, लांडगा आला रे आला, वड्याचं तेल वांग्यावर काढणे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, सुतावरून स्वर्ग गाठणे, हाजीर तो वजीर, इत्यादी. तर बाराखडीनुसार म्हणींची यादी नक्की करा.

घरातील सर्वांचं साहाय्य घ्या. बघा सर्वांना नक्की मजा येईल. भोजनाला जसं मीठ, तशी भाषेला म्हण. मिठाशिवाय जेवण अळणी, तशी म्हणीशिवाय भाषा अळणी. म्हणी म्हणजे भाषेची लेणी आहेत. म्हणी म्हणजे समाजमनाचा आरसाच खरं तर. त्यामुळे म्हणींमध्ये अनेक विषय आले आहेत. शब्दांच्या या प्रवासातील पुढच्या स्थानकावर भेटू या, काही म्हणींचे अर्थ आणि म्हणींच्या गोष्टींसह.

ऐतिहासिक, पौराणिक गोष्टी आणि त्यावर आधारित वाक्प्रचार वाचा खालील लिंकवर 

शब्दांच्या गावा जावे लेख क्र.5

-दीपाली केळकर

[email protected]