लग्न, मुंजी, पाहुणे-रावळे किंवा दसरा-दिवाळीसारख्या सण-उत्सवांच्या निमित्ताने वरचेवर सजणार्‍या-धजणार्‍या, नटणार्‍या-फुलणार्‍या माझ्या आजूबाजूच्या इमारती बघते तेव्हा मला हेवा वाटतो त्यांचा! मग डोक्यात विचारचक्र सुरू होतं.. मन भूतकाळात जातं.. वर्षभरातल्या माझ्याच विविध रूपांचा पट डोळ्यांसमोरून झरझरून सरकतो.. अशा वेळी एक अगदी नेमकेपणाने जाणवतं की ‘शाळा’ म्हणून माझी वेगळी ओळख असली, तरी माझा चेहरा म्हणजे माझ्यात सामावलेल्या या ‘विद्यार्थी’ नामक बाळगोपाळांचाच चेहरा आहे. त्यांच्या मूड्सप्रमाणे माझाही चेहरा बदलतो.

अभ्यासाच्या वेळी नेहमी मागच्या बेंचवर बसणारी, माझ्यावर काहीशी नाखूश असणारी मुलंसुद्धा माझ्या आवारात जेव्हा फुलपाखरासारखी बागडायला लागतात ना, तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा होतो! ‘स्नेहसंमेलन’ नावाचा माझा वार्षिकोत्सव हा असा आनंद मिळवून देतो मला. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार्‍या ‘विविध गुणदर्शना’चा कार्यक्रम म्हणजे अभ्यास सोडून बिनदिक्कतपणे मजा-मस्ती करण्यासाठी या मुलांना मिळालेलं लायसेन्सच..! म्हणूनच, स्नेहसंमेलनाची चाहुल लागताच मुलांच्या चेहर्‍यांवरचे रंगच पालटतात आणि सुरू होते फुल टू धमाल!

अगदी दुसर्‍या-तिसर्‍या वर्षापासून ते सोळाव्या वर्षांपर्यंतच्या वयोगटातली मुलं जितक्या आतुरतेने वर्षभर या विशेष दिवसाची वाट बघत असतात, तितकीच आतुरता मलाही असते.. पण त्या दिवसाइतकेच मला भरभरून आनंद देणारे दिवस असतात ते स्नेहसंमेलनाच्या तयारीचे म्हणजेच तालमीचे!

हुकमी सादरीकरण करायचं तर तयारीही तशीच हवी!  स्नेहसंमेलनातलं सादरीकरण आणि त्याची महिना-दीड महिना चालणारी तयारी, तालीम खूपच आनंददायी असते. तालमीच्या दरम्यानचा या मुलांचा उत्साही, तजेलदार वावर मलाही वर्षभरासाठी लागणारा भरभरून उत्साह बहाल करतो. माझ्यातच सामावलेल्या या सगळ्यांचं या दिवशी मला वेगळंच आणि आश्‍वासक दर्शन घडतं. विविध गुणसंपन्न अशा बालगोपाळांना आपल्यात सामावून घेतल्याचं सार्थक होणार आहे, याची खात्री पटते मला या काळात!

याच काळात शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये होणारी मैत्रीपूर्ण संभाषणंही मला खूपच महत्त्वाची वाटतात आणि आनंद देतात. मग मलाही अभ्यासाचा, परीक्षांचा विसर पडतो.

प्रत्यक्ष स्नेहसंमेलनाच्या दिवशी तर पालक-शिक्षक-विद्यार्थी यांचा मेळाच भरतो माझ्यात. उत्साहपूर्ण वातावरण विविधरंगाने भारून जातं. सजलेला रंगमंच त्या दोन तासांत मला संपूर्ण मानवी आयुष्यात अनुभवास येणार्‍या सार्‍या चांगल्या-वाईट गोष्टींचा जणू एकत्रित अनुभव देतो. अशा वेळी अनेक रंगांनी नटलेल्या मानवी आयुष्याच्या निरागस, भाबड्या वयाचे आपण दर वर्षी साक्षीदार होत असतो, याचा अभिमान वाटतो. वयाच्या जबाबदारीच्या टप्प्यांवरदेखील ही निरागसता, हे बागडणं टिकवून ठेवण्याचे धडे देण्यात आपलाही वाटा महत्त्वाचा आहे, ही गोष्ट खूप समाधान देऊन जाते. कुठल्यातरी क्षेत्रात मोठं नाव कमावणारा माझाच विद्यार्थी, जेव्हा अशा स्नेसंमेलनाचा प्रमुख पाहुणा म्हणून मानाने येतो, तेव्हा माझीही मान उंचावते. वेगळंच सौंदर्य प्राप्त होतं मला. आणि मग मी ‘शाळा’ आहे, असं अभिमानाने सांगते आजूबाजूच्या इमारतींना!

मुलांंच्या स्नेहसंमेलनांतल्या सहभागाच्या विविध आठवणीही नेहमीच सुखावतात. वयोगटाप्रमाणे स्नेहसंमेलनात सहभागी मुलांची सहभागातील उत्सुकताही बदललेली असते, हे अशा आठवणींत रमलेली असताना लक्षात येतं. नुकतीच माझ्यात येऊन सामावलेली मुलं आणि त्यांची सादरीकरणं हा तर माझ्यासाठी अतीव औत्सुक्याचा विषय असतो. आपल्याला मध्ये उभं ठेवून आपल्याकडे पाहाणारा जमाव बघून बावरलेली असतात काही मुलं.. तर काही जणं जे सादर करायचं ठरलेलं असतं, ते सोडून धीटाईने आपल्या वेगळ्याच कल्पना उत्स्फूर्ततेने मांडणारीही असातात! काही रडतात.. काही ओरडतात.. काही जणं तर आपल्या नावीन्यपूर्ण पेहरावातच रमलेली असतात.. काही नुसतंच पाहात राहातात.. कोवळ्या वयातल्या माणसाच्या स्वभावातदेखील किती वैविध्य असतं ना.. कौतुक वाटतं मला या मुलांकडे पाहताना!

मोठ्या वयोगटातली मुलं मात्र थोडी जाणकार असतात! आधीच्या वर्षांतल्या अनुभवांतून आलेलं शहाणपण त्यांच्या हालचालींमधूनच जाणवत असतं. पण मुलंच ती.. शहाणपण आलं, तरी अल्लडपणा जातोच असं नाही.. पण त्यातच तर खरी गंमत असते..

मागच्या वर्षीच्या स्नेहसंमेलनातली गट्टूच्या ग्रूपची झालेली फजिती आठवली की आजही खळखळून हसते मी..

त्याचं झालं असं.. विनू, तनवी, राघव, सोहम, रमा यांच्या ग्रूपचं एक नाटक बसवलेलं त्यांच्या वर्गशिक्षकांनी.. ठरल्याप्रमाणे नियमित तालीमही केली बरं का सगळ्यांनी.. वेषभूषा, रंगभूषा आणि नाटकासाठी आवश्यक असणार्‍या इतर गोष्टी यांची जमवाजमवही या मुलांनी पालकांच्या मदतीने अगदी व्यवस्थितपणे केली. रंगीत तालीम पार पडल्यानंतर थोडीशी भीती आणि अधिकचा उत्साह घेऊन ही मुलं थेट उपस्थित राहिली ती त्याच दिवशी, त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी! अशातच सोहमने आपण बरेचसे डायलॉग विसरत असल्याची भीतभीतच कबुली दिली. झालं..! ‘आता ऐन वेळी काय?’ हा त्यांचा प्रश्‍न सोडवायला नेहमीप्रमाणे धावून आला तो गट्टू..! गट्टू म्हणजे शाळेचा सुपरस्टार.. अभ्यासात मागे असला, तरी मुलांपासून शिक्षकांपर्यंत सगळ्यांचाच तो दोस्त असल्यासारखा! अडल्या-नडल्याला सगळ्यांनाच मदत करणारा.. शूरवीर, खुशालचेंडूसुद्धा!

तर.. गट्टूने स्क्रिप्ट घेऊन टेबलखाली लपायचं आणि सोहमला प्रॉम्टिंग करायचं असं ठरलं.. यांचं नाटक आठव्या क्रमांकावर होतं.. त्यामुळे आधीच्या मित्रमंडळाची सादरीकरणं बघणं यांना शक्यच नव्हतं.. का म्हणजे..? बघणार कसं? पहिली सात सादरीकरणं होईपर्यंत यांची चिंता काही यांचं डोकं सोडेना! शेवटी व्हायचं तेच झालं.. आठव्या क्रामांकाच्या सादरीकरणाची घोषणा झाली आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली जागा घेतली.. आता गट्टूवरच सगळ्यांची भिस्त होती.. सोहम जिथे विसरेल तिथे त्याला शब्द सांगायचे हे खूपच जबाबदारीचं काम होतं त्याच्याकडे.. अर्धअधिक नाटक पार पडलं अगदी सहजतेने.. तोपर्यंत टेबलखाली निवांत बसलेला गट्टू निश्‍चिंत होऊन झोपी गेला.. आधीच घाबरलेला सोहम आपले पुढील डायलॉग विसलाच.. भेदरलेल्या नजरेने प्रेक्षकांकडे पाहात राहिला आणि काही क्षणांत विंगेतून पळून गेला.. प्रेक्षकांत एकच हशा पिकला..

हे आठवून आता हसू येतंय मला; पण त्या वेळी गट्टू, सोहम आणि गँगबरोबरच मलाही खूप वाईट वाटलं होतं.

अशी फजिती होणं, सहभागच घेता न येणं, टिंगल-टवाळ्या, हास्यास्पद सादरीकरण अशा मनाला सहसा न आवडणार्‍या गोष्टीही घडतात या मुलांबरोबर.. अशा गोष्टींमुळे ही मुलं काही काळ का होईना; पण खट्टू होतातच.. याचा त्रास होतोच नं मला..! पण या सगळ्यातून बाहेर पडून, पुन्हा आनंदाच्या; नावीन्याच्या शोधार्थ धडपडणारी यांची मनं बघितली की, ही मनं उद्याच्या अफाट पसरलेल्या जगातील अशा सगळ्या त्रासाला निपटवून टाकण्यास समर्थ होत आहेत, या जाणीवेने माझंही मन उभारी घेतं..

शाबासकी, कौतुक, टाळ्या, शिट्ट्या, दाद, लोकप्रियता हेही सारं मिळतं इथे.. ते मिळवल्यानंतर माझ्या बछड्यांच्या चेहर्‍यांवरून आनंद ओसंडून वाहू लागतो.. मग मलाही खूप छान वाटतं.. हे सगळं मीच मिळवल्यासारखं..!

समूहभावना, व्यवस्थापनकौशल्य, जिद्द, आत्मविश्‍वास यांची शिकवण देणार्‍या स्नेहसंमेलनाची वाट बघण्याचा छंद या मुलांबरोबरच मीही अगदी आवडीने जोपासते. स्नेहसंमेलनांचा काळ हा माझ्या बहराचा काळ वाटतो मला! वर्षातून एकदाच; पण हमखास येणारा हा काळ माझ्यासाठी टॉनिकच ठरतो. ते एकदा मिळालं की पुन्हा अभ्यासासाठी, परीक्षांसाठी, मार्कांच्या जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुलांबरोबरच मीही तयार होते! स्नेहसंमेलनांच्या निमित्ताने या बाळगोपाळांत होणारे बदल अनुभवत मीही हसते, बागडते, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना मनोमन शुभेच्छा देते!

जगणं समृद्ध करण्याची कोवळ्या वयातली तालीम म्हणजे ही स्नेहसंमेलनं.. अशी ही संमेलनं विद्यार्थी-पालक-शिक्षकांबरोबरच मलाही अनुभवता येतात आणि विद्यार्थ्यांबरोबरच मीही दर वर्षी अधिकाधिक समृद्ध होत जाते आणि ‘ही आवडते मज मनापासूनी शाळा!’ असं म्हणणार्‍या माझ्या बाळगोपाळांच्या प्रेमास पात्र होते!

-चित्रा नातू-वझे

 

[email protected]