चित्रांची भाषा

दिंनाक: 17 Dec 2017 15:12:39


तुम्हाला चित्र काढायला आवडतात? मलाही आवडतात. मला ती नुसती काढायलाच नाही, तर त्यांच्याशी गप्पा मारायलाही आवडतं. होय! चित्र माझ्याशी बोलतात. अगदी भरभरून! त्यांना फक्त थोडं बोलतं करावं लागतं, ती आपणहून नाही येत बोलायला. हे कसं करावं बरं?

उत्तर तसं फारसं अवघड नाही. चित्रांना फक्त प्रश्‍न विचारायचे. त्याची सुरुवात चित्रात प्रथमदर्शनी काय दिसतं? इथपासून करावी. याचं उत्तर मिळालं की, पुढचे प्रश्‍न. जसं की, चित्रातल्या घटकांची संख्या किती? त्यांची स्थिती (झेीळींळेप) कोणती? याचा विचार करावा.

चित्राचा सगळ्यात महत्त्वाचा घटक बहुतांशी वेळेला त्याच्या मध्यभागी चितारलेला असतो. त्याला (सेंट्रल फिगर) असं म्हणतात. त्याच्या आजूबाजूला काय काढलं आहे? ते चित्राला पूरक आहे की विरोधाभासी आहे, हेही विचारावं.

हे प्रश्‍न विचारून झाल्यावर आपल्याला चित्राबद्दलची फक्त ढोबळ माहिती मिळते. आणखी माहिती मिळवण्यासाठी चित्राला जवळून पाहायची गरज असते. नीट पाहिल्यावर त्याला ‘कसं?’ या स्वरूपाचे प्रश्‍न विचारावे. उदा., व्यक्तिचित्रं असल्यास त्यांचा चेहरा कुठल्या बाजूस आहे? चेहर्‍यावर कुठले हावभाव आहेत? फक्त चेहराच दर्शवला आहे की, संपूर्ण शरीर चितारले आहे?

व्यक्तिचित्रं नसल्यास दृश्य गोष्टींचा आकार काय आहे? चित्रामधल्या इतर घटकांच्या पार्श्‍वभूमीवर त्या कुठल्या प्रमाणात आहेत, हे विचारावे व या प्रश्‍नांची उत्तरं मिळवावी.

ही सगळी माहिती गोळा करत असताना चित्रामधल्या प्रकाशाचं (किंवा त्याच्या अभावाचं) चित्रण व सावल्यांना दिलेलं महत्त्व विसरता कामा नये.

प्रकाश व सावल्या यांच्या चित्रण कलाकार फक्त रंगांतूनच आपल्यासमोर आणतो. अशा वेळेला त्याला जादूगार म्हटलं, तर चुकीचं ठरणार नाही.

आतापर्यंत आपण चित्रात जे डोळ्यांना दिसतं, त्याची मनात यादी कशी करायची ते बघितलं. आता वेळ आली आहे, ती डोळ्यांना दिसतं त्या पलीकडे जाऊन बघायची. असं करताना ‘का?’ हा प्रश्‍नवाचक शब्द अतिशय उपयोगी ठरतो.

उदा., चित्राचा आकार असाच का आहे? एखादं चित्र कॅनव्हासच्या कोपर्‍यातच का काढलं आहे? सदर चित्रात हेच रंग वापरण्याचा हेतू कोणता असावा? चित्रातल्या घटकांची संख्या नेमकी एवढीच का असावी?

हे व असे प्रश्‍न चित्रांना समजून घेण्याची नवीन दारं उघडतात. गमतीचा भाग असा की, या प्रश्‍नांना व त्यांच्या उत्तरांना चूक व बरोबरच्या तराजूत तोलता येत नाही. प्रत्येक व्यक्तीला ते चित्र वेगवेगळी उत्तरं देत असतं.

एखाद्या चित्रसंग्रहालयात आपल्याला अनेक जण असे दिसतात की, जे एकाच चित्राकडे तासन्तास बघत बसतात. त्यांचा त्या चित्रांशी संवाद चालू असावा. हा संवाद फक्त चित्रांनी माणसांशी नव्हे; तर चित्रकाराने एका दर्दीशी साधलेला संवाद असतो. चित्र जुनी असली, तर त्या काळाने या काळाशी साधलेला संवाद असतो.

चित्रवाचन हे माध्यम इतकं प्रबल आहे की, मानसशास्त्रातही त्याचा उपयोग केला जातो. चित्राच्या विवेचनानुसार त्या व्यक्तीचा उगम, त्याची जडणघडण इतकंच नव्हे; तर त्याच्या पूर्वानुभवाचाही आढावा घेता येतो.

जशी एखादी कथा अथवा एखादं पुस्तक आपल्या डोक्यात एक चित्र उभं करतं, तसंच चित्रंही त्यांच्या सांकेतिक भाषेतून आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत असतात. त्यांना ‘काय?’, ‘किती?’, ‘कुठे?’, ‘कसं?’, व ‘का?’ हे प्रश्‍न तेवढे विचारा, बघा कशी चटाचटा बोलू लागतात ती. आपले डोळे व मन हीच त्यांची भाषा, अवकाश असतो फक्त ती अवगत करण्याचा.

-नुपूर गानू

 [email protected]