पणजीची गोधडी

दिंनाक: 16 Dec 2017 15:20:59


दर महिन्याला एक फेरी स्थानिक मॉलमध्ये होते. वाणसामानाबरोबरच इतरही नवीन गोष्टी तिथे बघायला मिळतात. दर वेळी मुलीची पावलं क्विल्टच्या विभागात जरा जास्तच रेंगाळतात. त्यांचा मऊ, मुलायम, गुबगुबीत स्पर्श, दिसायला देखणी क्विल्ट कोणीही प्रेमात पडावं अशीच असतात. सुरुवातीला मुलीसाठी एखादं क्विल्ट घेऊ म्हणून मी तिच्या मागे लागायचे. पण तिची कायम नकारघंटाच असायची. ती किमतीकडे बघून नाही म्हणते अशी मला शंका यायची. एकदा मात्र 'माझ्या गोधडीसारखी ही क्विल्ट नाही' असं ठामपणे सांगून तिच्या नकाराचं कारण तिने स्पष्ट केलं आणि मी थक्कच झाले.

माझ्या मुलीच्या जन्मानंतर माझ्या आजीने पणतीसाठी खास तिच्या जुन्या सुती साड्यांपासून केलेली गोधडी पाठवली होती. तोपर्यंत आजीच्या साड्यांच्या गोधड्या आमच्याकडे कायम वापरल्या जायच्या. या गोधड्या आजीसारख्याच मऊसूत, सायीसारख्या नाजूक आणि अविरत माया करणाऱ्या वाटायच्या. मूळ स्वच्छ पांढऱ्या रंगावर फुलं आणि तलम स्पर्श... कापसासारखा. अशी गोधडी पांघरून झोपण्यात काय सुख असतं! मात्र मी आईच्या भूमिकेत शिरले आणि गोधडीचं हे सुख माझ्या मुलीने अनुभवायला सुरूवात केली.
 
गोधडीच्या या साड्या बहुतेक सुती आणि नऊवारी. शिवाय रोजच्या वापराने, धुतल्याने त्यांचा स्पर्श आणखीनच तलम, मुलायम झालेला. उन्हाळ्याच्या दिवसात तर मायेच्या कापडापासून तयार झालेली ही गोधडीच बरी वाटते. लहानपणी थंडीच्या दिवसात अंगावर घ्यायला ब्लॅंकेट काढलं तरी आतून गोधडी लावून दे असा हट्ट मुलगी कायम करायची. त्या वेळी त्यामागची भावना तिला फारशी व्यक्त करता आली नव्हती. पण क्विल्ट खरेदीच्या वेळी मात्र तिने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
 
मुलीला पणजीची साडी ही आपल्यावर माया करणारी गोष्ट वाटते. त्या सुती साडीच्या स्पर्शातून पणजीचे प्रेम आपल्या अंगावर झिरपत असल्याचं तिला वाटतं. भले त्यावरचे टाके मोठमोठे असतील, पण ते कधी उसवल्याचे, तुटल्याचे तिने बघितले नाहीत. कारण मुलीच्या मते ते टाके पणजीच्या मायेच्या धाग्यात गुरफटलेले आहेत. हा एकमेकांना धरून ठेवण्याचा संस्कार कळत नकळत मुलीपर्यंत पोहोचला आहे. आज माझी आजी या जगात नाही. गेली काही वर्षे नऊवारी साडी नेसून, तिचे वजन पेलण्याची ताकद आजीमध्ये नव्हती. त्यामुळे तिच्या जुन्या साड्या गोधडी म्हणून वापरण्याची संधीही हळूहळू कमी होत नंतर थांबली. 
 
त्याच वेळी माझ्या आईची आत्या आमच्याकडे राहायला आली होती. ही पणजीही नऊवारी साडी नेसते हे मुलीने बघितलं. परत जाताना या पणजीने खाऊसाठी हातात पैसे ठेवले तेव्हा, "पणजी, पैसे नकोत. तुझी जुनी कॉटनची साडी मला पाठव. मी गोधडी म्हणून वापरीन." असं सांगून मुलीने खाऊचे पैसे घ्यायचे नाकारले. गमतीची गोष्ट म्हणजे हे ऐकून ही पणजी एवढी खूश झाली की आता वर्षातून दोन सुती साड्या गोधडीसाठी या पणतीला पाठवायला लागली आहे. अशा या गोधडीत गुरगुटून, गुरफटून झोपलेल्या मुलीकडे बघून डोळे नकळत पाणावतात आणि आपल्या पणजी, आजीचे संस्कार, माया, प्रेम आपल्यात झिरपायला केवळ त्यांच्या साड्यांची गोधडीही पुरेशी आहे ही जाणीव अधिक तीव्र होते. 
 
- आराधना जोशी