माझ्या छोट्या दोस्तांनो,

माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू । जिंकू किंवा मरू ।।

शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती ।

सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे ।

अशी देशभक्तीपर गीतं तुम्ही ऐकली असतील, समरगीतं ऐकली असतील. २६ जानेवारी, १५ आॅगस्टला समूहाने गाईलीही असतील. त्यातील वर्णनं ऐकून आपल्या देशांतील विविधतेची आणि विविधतेतील एकतेची ओळखही झाली असेल. ती जोशपूर्ण गाणी ऐकताना, म्हणताना, आपण आपल्या भारतमातेचे पुत्र असल्याचा अभिमान वाटला असेल. मागच्याच लेखात मी एक नवीन देशभक्तीपर गीत दिलं होतं.

"भारतमाता जगविख्याता, तुझपर हम बलहारी माॅं । 

हम तेरे प्रिय पुत्र है जननी । 

तूं हम सबकी प्यारी माॅं ।"

आता आज मी तुम्हाला एका वेगळ्या गीतप्रकाराची ओळख करून देणार आहे. आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी, ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी लढलेल्या सैनिकांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे पोवाडे तुम्ही कधी ऐकले आहेत का ? 

पोवाडा म्हणजे एखाद्या प्रसंगांचं वर्णन करणारं गाणं. मग तो कधी एखाद्या लढाईत पराक्रम गाजवणाऱ्या योद्धयाबद्दल असतो, कधी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल असतो, तर कधी अगदी अलीकडच्या काळात लोकांसाठी समाजकार्य करणाऱ्या सुधारकांबद्दल असतो.

शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पोवाडा, संभाजीराजांचा पोवाडा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, भगतसिंगाचा पोवाडा, लोकमान्य टिळकांचा पोवाडा, बाबा आमट्यांचा पोवाडा.

अशा काही निरनिराळ्या व्यक्तींबद्दलचे पोवाडे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातील वर्णनं ऐकून तुम्हालाही त्या शूरवीरांबद्दल अभिमान वाटेल. हे जोशपूर्ण पोवाडे गाऊन पाहावेसे वाटतील. तुम्हालाही देशासाठी काहीतरी चांगलं काम करण्याचं स्फुरण येईल.

हा पहिला आहे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा. 

पन्हाळगडावर असलेल्या शिवाजी महाराजांना आदिलशहाच्या सैन्याने अडकवून ठेवलं. पन्हाळगडच्या त्या वेढ्यातून मोठ्या चतुराईने निसटून, महाराज रात्रीच्या अंधारात विशाळगडाकडे जाऊ लागले. सोबत बाजीप्रभू देशपांडे होते. काही वेळानं, आदिलशहाचं सैन्य त्यांचा पाठलाग करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना पुढे जाऊन सुखरूप विशाळगडावर पोचायला सांगितलं आणि स्वत: काही निवडक मावळ्यांसह मागे राहून, आदिलशहाच्या सैन्याला वाटेतच रोखून धरण्याचं ठरविलं. मोठ्या धीरानं आणि शौर्यानं लढून, महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत शत्रूच्या सैन्याला अडवून धरलं. स्वत: जखमी होऊन सुद्धा शेवटपर्यंत खिंड लढवली. स्वत:च्या जीवावर उदार होऊन महाराजांचं रक्षण करणारे बाजीप्रभू शूरवीर ठरले आणि त्यांनी पराक्रम गाजवला ती खिंड 'पावन खिंड' झाली. 

अशा या गाजीच्या.... म्हणजेच शूर योद्धयाच्या पराक्रमाचं वर्णन करणारा हा पोवाडा. पारंपरिक पोवाड्यापेक्षा याची चाल थोडी वेगळी आहे. कीर्तनात ही गोष्ट रंगवून सांगणाऱ्या या गीताला 'कटाव' असंही म्हणतात. तुमच्यासारख्याच एका छोट्यानं हे गीत गाईलं आहे.

आॅडिओ १ - कटाव - गर्जना करीतचि जेव्हा..... गायक - ईशान कुळकर्णी.

' हर हर महादेव .... हर हर महादेव ....'

गर्जना करीतचि जेव्हा, खिंडीत पायदळ शिरले ।

तो जयजयकार करोनी, मावळे तुटोनि पडले ।

समशेरीला समशेर, भाल्याला भिडला भाला ।

शिरतोड कमरकस्तीचे, घाव ते कटाछानीचे ।

चालले अहा बाजीचे, रक्ताच्या नटल्या साजी । पावन खिंडीचा गाजी ।।

ती खिंड नव्हे, मृत्यूचे विक्राळ वदनचि होते । 

मृत्यू - स्वरलोकामधले ते भुयार भीषण होते ।

मारणे, स्वत: वा मरणे... हटणे परि ठाऊक नव्हते ।

आधीच शिलामय घाट, त्यांतही शैलवन दाट ।

अडवितो शवांनी वाट, थांबवी न कत्तलबाजी । पावन खिंडीचा गाजी ।।

दो प्रहर झुंज जाहाली, प्रखर त्या थोरवीराची ।

रेटून सारिली मागे, सेना आदिलशाहीची ।

बाजीप्रभू वीरा ! झाली धन्य कूस तव जननीची ।

महाराज गाठिले गड, तोफांची ती धडधड ।

ऐकून सोडिले प्राण, प्राणांची लावी बाजी । पावन खिंडीचा गाजी ।।

 

मित्रांनो.... हा पोवाडा ऐकताना, हे शब्द समोर ठेऊन ऐका...अन् बघा तो लढाईचा प्रसंग कसा तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहतो ते. आवडला कां...? मला जरूर सांगा. म्हणजे पुढच्या वेळी आणखी नवीन पोवाडे......

बालवयाला शोभणारी गाणी - भाग ५

- मधुवंती पेठे 

[email protected]