मुलांनो, मी जर तुम्हाला विचारलं की पाण्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान काय? तर तुम्ही मला काय उत्तर द्याल? अनन्यसाधारण. पाणी म्हणजे जीवन, पाणी नसेल तर ही जीवसृष्टीच राहणार नाही वगैरे वगैरे. अशी अनेक उत्तरं तुमच्याकडून येतील. खरंच पाण्याशिवाय आपण आपल्या जगण्याचा विचारच करू शकत नाही. हो ना?

तुम्ही म्हणाल, आज रश्मीताईने हे काय सुरू केलंय? अभ्यासकौशल्यांवरून ही एकदम पाण्याचं महत्त्व काय पटवून द्यायला लागली आम्हाला? नाही रे मुलांनो! मी अभ्यासकौशल्यांबद्दलच बोलणार आहे तुमच्याशी. आजचं कौशल्य हे अभ्यासातलं सर्वांत महत्त्वाचं कौशल्य आहे. ते म्हणजे ‘वाचनकौशल्य’. जगण्यासाठी जितकं पाणी आवश्यक तितकं अभ्यासासाठी वाचन आवश्यक.

वाचनाशिवाय आपण अभ्यासाचा विचारच करू शकत नाही. वाचन ही अभ्यासातली सगळ्यात पहिली पायरी आहे. अभ्यासातल्या बर्‍याचशा तक्रारींच्या मुळाशी चुकीच्या वाचन सवयी असतात, असं लक्षात आलंय. तुम्हा मुलांकडून शुद्धलेखनाच्या चुका होतात. छान, न अडखळता वाचता येत नाही, या सगळ्याच्या मागे वाचन पुरेसं न करणं हे एक महत्त्वाचं कारण दिसून आलंय.

वाचन करताना दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे, तुम्ही किती भरभर वाचताय; म्हणजेच तुमचा वाचनाचा वेग किती आहे? आणि दुसरं म्हणजे, तुम्ही जे वाचलंय ते तुम्हाला किती समजलंय? काही मुलं खूप हळू वाचतात, वाचनाचा कंटाळा करतात, वाचता वाचता त्यांचं मन दुसर्‍याच विचारात भरकटतं आणि मग अभ्यास रेंगाळतो. म्हणून खूप सावकाश वाचणे ही सवय चांगली नाहीच! काही मुलं एकदा वाचायला घेतलं की आपली गाडी थांबतच नाहीत. खरं तर भरभर वाचण्यात हरकत काहीच नाही; पण वाचून झाल्यावर किंवा वाचत असताना आपल्याला ते किती समजतंय, वाचल्यानंतर शंकानिरसन होतंय का? हे मात्र या भरभर वाचणार्‍या मुलांनी पाहणं आवश्यक आहे. म्हणजेच जे वाचलंय त्याचं आकलन जर चांगलं झालं, तर ते तुमच्या चांगलं लक्षात राहणार आहे.

तुमच्या वाचन सवयी सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगते. त्यानुसार जर वाचनपद्धतीत बदल केला, तर त्याचा तुम्हाला जरूर फायदा होईल.

1) हेतूपूर्वक वाचा, जेणेकरून आकलन वाढवण्यास मदत होईल.

2) मोठ्याने वाचणं, पुटपुटत वाचणं, वाचताना मानेच्या हालचाली करणं, मधूनच मागच्या ओळीवर परत येणं या सवयींमुळे एकाग्रता कमी होते. त्यामुळे या सवयींवर मात करा.

3) वाचताना अवघड शब्दांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांचा अर्थ शोधून काढा.

4) शब्दकोश जवळ ठेवा. (विशेषत: इंग्रजीचं वाचन करताना.)

5) वेळ लावून वाचन करा. त्यामुळे इतर व्यत्ययांकडे आपोआप दुर्लक्ष होतं.

6) दिवसातून किमान 20 मिनिटं वेळ हा वाचनासाठी द्याच. 15 मिनिट वाचन व 5 मिनिट काय वाचलंय ते आठवून बघण्यासाठी, अशी त्याची विभागणी करा.

7) वाचनाचा वेग व आकलन हे दोन्ही परस्परसंबंधी मुद्दे आहेत.

8) वाचन हे अभ्यास विषयांचेच असलं पाहिजे, असं अजिबात नाही बरं का! एखादी पेपरमधली बातमी, लेख ग्रंथालयातील पुस्तकं, कथासंग्रह, मासिक इ. काहीही असू शकतं.

9) वाचन सवयीत सुधारणा करण्यासाठी त्याचा सातत्याने सराव करणं खूप आवश्यक आहे.

थोडक्यात काय मुलांनो, तुम्हाला फक्त मार्क्स मिळवण्यासाठी वाचायचं नाहिये. तर तुम्ही वाचन करणं, त्यावर स्वत:चा विचार करणं, त्यानुसार स्वत:ची मतं तुम्हाला मांडता येणं, तुम्हाला भरपूर प्रश्‍न पडणं, त्या प्रश्‍नांची उत्तरं तुम्ही शोधणं, यातूनच तुमचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आकाराला येणं ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासात खूप महत्त्वाची आहे. तुमची प्रगती साधायची असेल, तर ‘दिसामाजी वाचत जावे’ हेच खरं आहे. वाचनाला पर्याय नाही. तेव्हा उत्तम वाचा, उत्तम प्रगती करा.

 आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या 24 तासांचं नियोजन कसं करावं वाचा रश्मी पटवर्धन यांच्या खालील लेखात 

चोवीस तासांचं गणित

-रश्मी पटवर्धन 

[email protected]