रविवार

दिंनाक: 10 Dec 2017 15:06:23


गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ही अजून एक सुंदर, बाल-मनात डोकावणारी कविता. 

लहान मुलांनाच काय पण मोठ्यांनाही रविवार हवाहवासा वाटतो. हा छोटा मुलगा किती आतुरतेने रविवारची वाट पाहत असतो. रविवार म्हणजे जणू त्याचा दोस्तच. पण सोम, मंगळ, बुध ही मुले रोज लवकर येऊन ठाण मांडून बसतात, भांडतात, लवकर परत जात नाहीत इ.इ. तक्रारी तो छोटा करतो. आणि रविवार उशिरा येतो, पट्कन निघून जातो याचं त्याला खूपच खूप वाईट वाटतं. 
अजून एक, छोटा आईला विचारतो, रविवार हा गरीबाघरचा  पोर आहे का तुझ्यासारखा ? म्हणजे त्याची आई गरीब घरातील मुलगी आहे, हे यातून सूचित होते. 
नक्की आवडेल ही कविता छोट्यांबरोबर मोठ्यांनाही !!

सोम, मंगळ, बुध, सारे
पहाटेच येतात दारी ।
त्यांच्याकडे आहे वाटते
मस्त हवेची गाडी ?

          रविवार मात्र का गं आई,
          अस्सा उशिरा येई ?
          हळूहळू चालतो आणि
          जायची करतो घाई ।।
आकाशापल्याड घर त्याचे
आहे का फार दूर ?
तुझ्याप्रमाणे तोही आहे का
गरीबाघरचा पोर ?

सोम, मंगळ, बुधाच्या मनात
थांबायचेच असते ।
घरी परत जायच्या वाटेला
मुळीच मन नसते ।।
           रविवार मात्र अस्सा कस्सा
           विचित्र त्याची बात ।
           कित्तीतरी तास माझे
           संपवी अर्ध्या तासात ।।
क्षितिजापल्याड त्याचे घर,
कामं त्याला लहानथोर ।
तुझ्याप्रमाणे तोही आहे का 
गरीबाघरचा पोर ?
           सोम, मंगळ, बुधाचं तोंड
           मातीचेच  जणू   भांडे ।
           आमच्याबरोबर त्यांचे रोज
           होतात शंभर झगडे ।।
परंतु शनीच्या उत्तररात्री
जेव्हा मला जाग येते ।
रविवारचे दर्शन होता
हसूच हसू फुटते ।।
           जसा वेळ जाऊ लागतो
           रडतो दोघे, लागतो घोर ।
           खरंच का गं रविवार आहे
           गरीबाघरचा पोर ??

-स्वाती दाढे 

[email protected]


मूळ बंगाली कविता - रवींद्रनाथ.