आपल्या मुलांना उज्ज्वल भवितव्यासाठी पालक सतत प्रयत्न करत असतात. सदृढ, प्रसन्न, हसतमुख, सतत नवं शिकण्यासाठी तत्पर असणार, अभ्यासू, ध्येयप्रवण असंच आपल मूल असावे असं प्रत्येक पालकांना मनोमन वाटत असतं. असं संपन्न आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी नाटक मोलाची मदत करते. अर्थात त्यासाठी मुलांना लहानपणापासून काही चांगल्या सवयी लावाव्या लागतात. सुरुवातीला कदाचित मुलांना त्याचा कंटाळा येऊ शकतो, पण त्या गोष्टींचा पुढील जीवनात मुलांना चांगला उपयोग होतो.

पूर्वी मुलांनी सकाळी लवकर उठावे, शौच मुखमार्जन करून देवाला व मोठ्या माणसांना नमस्कार करावा, वक्रतुंड महाकायसारखे श्लोक म्हणावेत, नंतरच दूध/कॉफी/चहा-पान करावं. अंघोळ झाल्यावर किमान १२ सूर्यनमस्कार घालावेत. मुलांनी स्वतःची कामे स्वतःच करावीत वेळच्या वेळी आपला अभ्यास करावा. त्यात टंगळमंगळ करू नये. शाळा, क्लासेस इ.चे वेळापत्रक कसोशीन सांभाळावं. संध्याकाळी थोडा वेळ मैदानी खेळ खेळावे. तिन्ही सांजेला देवासमोर नतमस्तक व्हावे. हात पाय स्वच्छ धुवून शुभंकरोती-पाढे-परवचा इ. म्हणावे. पाटपाणी घेणे इ. मदत करावी छान एकत्र बसून आनंदात सहकुटुंब जेवावे. रात्री आजी आजोबांच्या गोष्टी ऐकत झोपावे. अशाप्रकारचे सर्वसाधारणपणे निर्बंध असत.

आज काळ बदलला. संगणक युग आलंय. जीवन अधिकाधिक गतिमान झालंय. मुलांचे आईवडील दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असतात विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजी-आजोबा घरात नसतात, त्यामुळे त्यांचा सहवास-प्रेम, त्यांचे संस्कार त्यांना मिळणे दुरापास्त झाले आहे. मुलांच्या शाळा, त्यांच्या ट्यूशन्स, त्यांचे छंदवर्ग, प्रोजेक्टस्, स्पर्धा सहभाग या सर्व तारेवरच्या कसरतीत वेळच नसतो. मग त्यांना व्यक्तिमत्वासाठी सुसंस्कार आणायचे तरी कुठून? आणि कसे? हा खरा गहन प्रश्न उरतो.

त्यातच मुलांना आता नकार ऐकायला अजिबात आवडत नाही. आपल्या तोंडून शब्द बाहेर पडला की, तत्क्षणी ती गोष्ट हाती आली पाहिजे असे त्यांना वाटते. आईवडील पण मुलांना आपण वेळ देऊ शकत नाही तर त्यांना जे हवे ते देऊन भरपाई करण्याचा प्रयत्न करतात, खरं तर शॉर्टकट्सच शोधतात. त्यात बहुतांशी घरोघरी एकच मूल त्यामुळे शेअरिंग--- वस्तू वाटून घेणं ही संकल्पनाच मोडीत निघालीय. ‘मी आणि माझं’ अशी स्वार्थी वृत्ती वाढीस लागलीय.

या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आणि मुलांना सुसंस्कारित संपन्न व्यक्तिमत्वाकडे कसं नेता येईल? याचा विचार करायला हवा.

अजूनही मुलांची मन तितकीच कोमल, सुंदर आहेत. त्यांच्या मनाची मशागत नीट केली गेली, तर सुसंस्काराचं बी नीट रुजेल आणि मग ती संपन्न व्यक्तिमत्वाची पहिली पायरी असेल.

आजही मुलांना चांगल्या गोष्टी ऐकायला आवडतात, पाहायला आवडतात, अनुभवायलाही आवडतात. मुलं खूप चांगलं निरीक्षण करत असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट करून बघायला आवडतं त्यांच्या मनातलं कुतुहल जागं ठेवायला हवं त्यांना पडणाऱ्या अनेकविध प्रश्नांची समाधानकारक उत्तर त्यांना मिळायला हवीत, खूप वेळा काय चांगलं? काय वाईट? काय करावं, काय करू नये हे मात्र कळत नाही मनाचा गोंधळ उडतो. अशा वेळी त्यांच्या या गोंधळाचं निराकरण पालकांनी अगदी सहज योग्य पद्धतीने सांगून करावं. पालक, शिक्षक ही गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकतात.

त्यासाठी विविध उपक्रम राबवता येतील. नुकताच असा एक सुंदर प्रेरणादायी उपक्रम समोर आला. अब्दुल कलामांचा जन्मदिन हा वाचनप्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

लहानपणापासून मुलांनी वाचनाकडे वळावं उत्तमोत्तम साहित्याचा त्यांनी आस्वाद घ्यावा, उत्तमोत्तम गोष्टींचं, निसर्गाच वाचन करावं यासाठी मुलांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने हा सुंदर उपक्रम ‘भिलार’ या छोट्याशा पुस्तकांच्या गावात आयोजित करण्यात आला होता.

चिंटूशी मस्ती पुस्तकांशी दोस्ती म्हणत चिंटू रंगरेषांमधून जिवंत करणारे चारुहास पंडित काका, मुलांचा मित्र बनून त्यांना सुंदर कथा सांगणारे राजीव तांबे काका आणि सुंदर अक्षर काढत कॉलिग्राफीची कला जोपासणारे अच्युत पालवकाका हे तिघे कार्यक्रमाचे विशेष अतिथी होते. या तिघांनीही मुलांना सुंदरशा कला विश्वात नेऊन प्रात्यक्षिकांसह सहजपणे रममाण केले. मुलंही त्यात सर्वार्थाने गुंग होऊन गेली.

मुलांना सोप्या भाषेत आणि प्रत्यक्ष कृतीतून सुंदर अक्षर म्हणजे काय? ते कसं काढायचं? त्यासाठी युक्त्या कोणत्या? हे समजावून दिलं. दोन अक्षरात सारखं अंतर, अक्षरांची उंची जाडी याचे योग्य प्रमाण, आणि अक्षरांचं वळण हे सगळ साधलं तर सुंदर अक्षर कठीण नाही हे त्यांनी मुलांना प्रात्यक्षिकातून सोदाहरण पटवून दिलं. राजीव तांबे काकांनी सुंदर कविता - कथा आणि शेवटी, ओळखा पाहू? मी कोण असे कोडे घालून त्याबद्दलची साधनं, माहिती मुलांना हसतखेळत दिली.शेवटच्या क्लूवरून ‘आणि मी कोण?’चे उत्तर मुलांनी एकासुरात ‘झुरळ’ असे दिले. खरंच एकीकडे मौजमज्जा आणि दुसरीकडे ज्ञान यांचा मनोज्ञ संगम येथे झाला होता. मुलांच्या कल्पनांना फुटलेले नवनवीन धुमारे पाहून खरंच खूप आनंद झाला.

गेली २७ वर्षे अनेक पिढ्यांसाठी चित्रातून चिंटू साकारणारे चिंटूमय झालेले चारुहासकाका चिंटूबद्दल भरभररून बोलले. २७ वर्षे झाली तरी चिंटू जेवढ्यास तेवढाच कसा राहिला? तो वयानं वाढला कसा नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना काका म्हणाले, प्रत्येक पिढीला त्या त्या वयात चिंटूची गरज् असते त्यामुळे चिंटू तेवढाच राहिला आहे. मात्र प्रत्येक पिढीच्या प्रश्नांकडे चिंटू डोळसपणाने पाहतो आणि म्हणूनच तो प्रत्येक पिढीला आपलासा वाटतो - हवाहवासा वाटतो.

हे सगळं ऐकताना मुलं अंतर्मुख झाली खरंच असा चिंटू आपल्याला प्रत्यक्ष साकारता येईल का? असा विचार करायला लागली आपणही छान वाचावं, ज्ञान मिळवावं, चिंटूसारखं समाजासाठी काही करून बघावं असे ही विचार त्यांच्या मनात येऊ लागले.

मंडळी एक लक्षात आलं कां? जे वाचलं जातं, ऐकलं जातं, त्यातलं सकस नक्कीच आपलंसं केलं जातं, मग आपण मुलांना तोत्तोचान, फास्टर फेणे, गोट्या, चिंगी, श्यामची आई हे वाचायला प्रवृत्त का करत नाही? गोष्टीरूपानं का सांगत नाही? ऐकून उत्सुकता वाढली की मुलं आपणहून वाचायला लागतील. ते विचार आत्मसात करतील याचे एकपात्री प्रयोग करून बघतील त्यांच सुरेख नाट्यीकरण करून पाहतील त्यावर आलेले चित्रपट-नाटके, अशाप्रकारे त्यांच्यातले गुणदर्शन घडवणारे नाट्य आपण मुलांपर्यंत का पोहोचू देत नाही?

 मुलांना विचारप्रवृत्त करण्यासाठी अशा सकस वाचनाची गरज आहे. म्हणूनच चांगल्या वाईटाची जाण येत जाईल. मित्रांना संकटात मदतीचा हात देणारा चिंटू, फास्टर फेणे तयार होईल. श्यामची आईमधला शाम, त्याचा सच्चेपणा, आईबद्दलचं प्रेम, राष्ट्रभक्ती हे मनात खोलवर रुजेल.

या प्रकारची नाटके, सिनेमे पाहणे हा पण एक छान अनुभव असेल. त्या त्या भावनेला भिडणं मुलांना आवडू लागेल ती तरल अनुभूती नवनव्या कल्पनांची भरारी घेत कृतीशील बनतील. यातून नाट्यवेड्या मुलांना या क्षेत्रात नवाच अनुभव घेता येईल. धडपडून प्रयत्नपूर्वक यश कसं संपादन करायचं हे मुलं शिकतील. वाचनानं विचार समृद्ध होतील.

आपल्या छोट्या छोट्या मित्रांना एकत्र करून ते वाचलेलं अभिनित करत  समाजासमोर मांडतील या सादरीकरणात निखळ अभिनय करणारेच बालमित्र नसतील तर त्या त्या प्रसंगाचे लेखन करणारे बाल लेखकही असतील बालरंगकर्मीही असतील यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व चहुअंगांनी बहरेल, फुलेल.

एक समाजाभिमुख उमदा माणूस यातून तयार होईल. तो आशावादी असेल, हसतमुख असेल, एकमेकांना सांभाळून घेणारा जिवाभावाचा मित्र असेल आणि ज्ञानाची आस असणारा विद्यार्थीही असेल. एक नाट्य जीवनात आलं तर बरं-वाईट, योग्य-अयोग्य, याची पडताळणी त्या त्या पात्राच्या अनुभूतीतूनच मुलांना घेता येईल.

यातूनच एक सुंदर संपन्न आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्व आकाराला येईल एकमेकांना सांभाळू घेणार टीमवर्क असतं हे सगळे बॅकस्टेज आर्टिस्ट एकमेकांशी सहकार्यानं वागले तर हे सहजसाध्य असतं अन्यथा त्या रत्नागिरीच्या प्रयोगासारखी फजिती होऊ शकते.

त्याचं काय झालं, एकदा रत्नागिरीला ‘भूमिकन्या सीता’चा प्रयोग होता शेवटच्या प्रसंगात सीतेला धरणीमाता आपल्या पोटात घेते व सीता गुप्त होते. असा सीन होता पण रामाचं आणि एका बॅकस्टेज आर्टिस्टशी भांडण झालं होतं, त्यानं त्या शेवटच्या सीनच्या वेळी सीतेच्या पायाखालची फळी  सरकवण्याऐवजी रामाच्या पायाखालची फळी सरकवली. झालं... सीतेऐवजी रामच धरणीमातेच्या पोटात गेला आणि मग भला थोरला हशा पिकला. पण नाटकाचा मात्र गोंधळ उडाला. का? केवळ टीमवर्कचा अभाव हेच कारण, टीमवर्कच महत्त्व इथं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. सुसंस्काराची संपत्ती व्यक्तिमत्वासाठी कास धरणं किती गरजेचं आहे, हे देखील लख्ख दिसलं.

अर्थातच प्रत्येक पात्राच्या अंतरंगात शिरणं हे पण तितकचं कौशल्याचं असतं. एकप्रकारचा परकाया प्रवेशच म्हणा ना. पण यासाठी त्या पात्राचं आंतर्बाह्य निरीक्षण करतां येणं गरजेच असतं त्याचा स्वभाव वाचता यावा लागतो तो कसा वाचायचा हे पुढील भागात बघू.

नटसम्राटमधला गणपतराव बेलवलकर ‘कुणी घर देता का घर?’ असं मोठ्या आर्ततेनं ओरडतो तेव्हा प्रेक्षकांच्या हदयाला घरं पडतात आणि पॉलिशवाल्या पोऱ्याला असं नाटक असतं - राजा म्हणत नाटक सप्रयोग करून दाखवतात, तेव्हाचा त्यांचा अभिनय निव्वळ लाजवाब. भूमिकेच्या अंतरंगाचा ठाव घेतल्याशिवाय हे शक्य नाही. तेव्हा त्यांना त्या कौशल्याला सलाम करतानाचं नव्या भूमिका वाचनाचा शोध घेऊ द्या.

नाटक आलं तरी कुठून? त्याचं पितृत्व कोणाकडे जातं? वाचा खालील लिंकवर 

लहान मुलांनी नाटक का पाहावं?- भाग 2

 मनीषा बर्वे

[email protected]