एकोणिसाव्या शतकात जे अनेक समाजसुधारक होऊन गेले, त्यात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. समाजात त्या काळी अनिष्ट रूढी, परंपरा होत्या. त्या नष्ट करण्याचे काम अनेक समाजसुधारकांनी केले. त्यापैकीच एक परंपरा म्हणजे महिलांना न शिकवणे. घरातील मुलींना शिकण्याची त्या काळी प्रथा नव्हतीच. ‘काय करायचेय मुलींना शिकवून? पुढे चुलीशीच तर बसायचे आहे, घरकाम आले की पुष्कळ झाले’, असे मानून अगदी तीन-चार वर्षांच्या मुलीला घरकामाचे वळण लावले जाई आणि पाचवे वर्ष लागले की, तिच्या लग्नाचे वय झाले, असे समजून तिच्यासाठी स्थळे शोधून तिचे लग्न लावून दिले जाई. परिणाम व्हायचा तोच होई. मुलगी माहेरी परतून येणे, विधवा होणे इ. कारणांमुळे मुलींचे आयुष्य अगदी गांजून गेलेले असे. शिक्षण नाही, हक्काचे घर नाही. मग फक्त काम काम आणि हेटाळणी, अपमानास्पद वागणूक, हेच आयुष्य. समाजाचा अर्धा भाग असा पूर्ण अशिक्षिततेच्या अंधारात खितपत पडला होता.

धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. समाजातील महिलांची ही स्थिती ते पाहात होते. महिलांनी शिकले पाहिजे व स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्याशिवाय त्यांची ही स्थिती बदलणार नाही, हे कर्वे यांनी ओळखले.

कर्वे यांचा विवाह वयाच्या पंधराव्या वर्षी झाला व वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांची पत्नी राधाबाई त्यांना सोडून देवाघरी गेली. तेव्हा पदरी रघुनाथ नावाचा आठ वर्षांचा मुलगा होता. कर्वे यांना पुनर्विवाहासाठी लोकांचा आग्रह होऊ लागला, तेव्हा त्यांनी विधवेशीच विवाह करीन, अशी अट घातली आणि पंडिता रमाबाईंच्या शारदासदन मधल्या आनंदीबाईंशी म्हणजेच बायांशी विवाह केला. समाजामध्ये विधवाविवाह मान्य नसल्याने कर्वे मुरुडला घरी आले, तेव्हा गावाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला.

व्यक्तिगत पातळीवर विधवाविवाह करून कर्वे थांबले नाहीत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवाविवाह सशास्त्र आहे व त्याला स्मृतींचा आधार आहे असे सिद्ध केले होते, त्याचा आधार घेऊन कर्वे यांनी १८९३ मध्ये ‘विधवा विवाहोत्तेजक मंडळी’ या नावाची संस्था काढली. संस्थेची घटना व धोरण ठरवले, परंतु पुढे विधवाविवाहाला भले उत्तेजन देऊ नका; पण विरोधही करू नका अशा विचाराने संस्थेचे नाव बदलून ते ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ असे ठेवले.

त्या वेळेस पुण्यामध्ये विधवांसाठी ‘शारदा सदन’ नावाचा आश्रम कार्यरत होताच. त्याच आधारावर ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ या संस्थेच्या बरोबरीने विधवा गृहही चालवावे, असे कर्वे यांच्या मनात आले. त्याकरता समाजाकडून मदत मागावी लागणार होती. स्वतः काहीतरी केल्याशिवाय समाज मदत देणार नाही; म्हणून कर्वे यांनी आपली सर्व शिल्लक, म्हणजे रु. १००० या कार्याला दिली. या सर्व प्रयत्नांतून १४ जून १८९६ रोजी अनाथ बालिकाश्रमाची ‘मंडळी’ ही संस्था रावबहादूर वि.मो. भिडे यांच्या घरी त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. या संस्थेला आर्थिक स्थैर्य लाभावे; म्हणून आपली पाच हजार रुपयांची विम्याची पॉलिसी त्यांनी आश्रमाला अर्पण करून टाकली.

पुण्यात १ जानेवारी १८९९ मध्ये प्लेग आला, तेव्हा भिडे वाड्यातून सर्व जण रावबहादूर गोखले यांच्या गावाबाहेर असलेल्या हिंगण्याच्या बागेत राहायला गेले. तेव्हा हा आश्रम येथेच असावा असे कर्व्यांना वाटू लागले व या बागेला लागून असलेली सहा एकरांची जागा गोखल्यांनी कर्व्यांना दिली. हळूहळू आश्रमाला आकार येऊ लागला. १९०५ सालापासून अनाथ बालिकाश्रम पाहाण्यास दूरदूरहून माणसे येत. आश्रमाची महती सर्वदूर पसरू लागली. विधवांबरोबरच कुमारिकादेखील आश्रमात शिकाव्या, म्हणून १९०७ मध्ये महिला विद्यालयाची स्थापना करण्यात आली. विद्यालयात फक्त सहा विद्यार्थिनी होत्या. विद्यालय चालवताना कर्वे यांना फार कष्ट करावे लागले. एक ना एक दिवस हे विद्यालय समाजमान्य होईल, असा विश्वास त्यांना वाटत होता. 

१९१५ मध्ये महिला विद्यापीठाची कल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी ते विचार आपल्या भाषणात मांडायला सुरुवात केली. महिलांसाठी उच्चशिक्षण किती आवश्यक आहे, असा विचार त्यांच्या भाषणात दिसतो. ३ जून १९१६ रोजी भारतवर्षीय महिला विद्यापीठाची स्थापना झाली. गृहिणीपदाची कर्तव्ये आणि जबाबदार्‍या ठसतील आणि समाज कर्तव्याची ओळख होईल, अशा सुशिक्षित स्त्रिया तयार करण्याचा यत्न करणे, हा त्यामागचा उद्देश होता. या विद्यापीठाकरता सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी पूर्ण मदत केली आणि महिला विद्यापीठ सुरू झाले. १९३६ मध्ये हे विद्यापीठ ठाकरसींनी मुंबईला हलवले आणि कर्वे यांची संस्था पुन्हा एकदा शालेय शिक्षणाचे आपले काम शांतपणे करत राहिली.

९ नोव्हेंबर १९६२ मध्ये अल्पशा आजाराने महर्षी कर्वे यांची प्राणज्योत मालवली.

त्यानंतर १९८५ मध्ये संस्थेने ज्युनिअर कॉलेज आणि १९९० मध्ये पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले कला-वाणिज्य महिला महाविद्यालय काढून पुन्हा एकदा विद्यापीठाच्या प्रांगणात पाऊल टाकले. त्यानंतर लगेचच १९९१ मध्ये सुरू झालेल्या कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, व्यवस्थापन शास्त्र, आय.टी., व्होकेशनल, नर्सिंग, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, इ. सुरू झाल्या. संस्थेचा विस्तार पुणे, सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर येथेही वाढला. कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजने आता स्वायत्तता मिळवली आहे आणि काही अंशी महर्षींचे स्वतःचे विद्यापीठ उभे करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.

- डॉ. पुष्पा रानडे

अध्यक्ष, आजन्म सेवक मंडळ