आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेण्यासाठी शाळेत दाखल झाले तो दिवस. ७  नोव्हेंबर. यावर्षीपासून विद्यार्थीदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. गावकुसाबाहेर राहून, शाळेच्या व्हरांड्याच्या बाहेर बसून शिक्षण घेतलेले बाबासाहेब भारताचे संविधान लिहितात, आजही आपण त्यांनी तयार केलेल्या संविधानाचा मान राखतो. त्याच बाबासाहेबांच्या शाळेत दाखल झालेल्या दिवसाला विद्यार्थीदिन म्हणून घोषित केले जाते, हे फारच सुयोग्य अशी घटना आहे. त्यानिमित्ताने देत आहोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक काही आठवणी.... 
 
डॉ. भीमराव उर्फ बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील मध्य प्रांतामध्ये ‘महू’ या गावी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. भीमरावांचे शालेय शिक्षण सातारा हायस्कूलमध्ये झाले. पुढे मुुंबईला जाऊन त्यांनी एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या परिवाराला एका मोहल्ल्यात जागा मिळाली, जेथे गरीब लोक राहत. सर्वांना झोपणे, राहणे, अभ्यास व स्वयंपाक सर्व काही एकाच खोलीत करावे लागत असे. दोघांना झोपायला आवश्यक एवढीही जागा नव्हती, इतकी ती खोली लहान होती. भीमराव लवकरच झोपून जात. त्यांच्या डोक्याच्या बाजूला एक पिठाची चक्की होती व पायाजवळ एक शेळी बांधलेली असे. त्यांचे वडील रात्री दोन वाजेतो जागत असत व जेव्हा भीमराव झोपून उठत, तेव्हा त्याच जागी ते झोपू शकत. काचेच्या शिशीचा तयार केलेला मातीच्या तेलाचा एक दिवा होता. त्या दिव्याच्या उजेडात भीमराव अभ्यासाला बसत.
लढाऊ वीरवृत्ती त्यांच्या रक्तात होतीच. भीमरावांचे वडील हे तत्कालीन सैन्यात भरती झाले होते. लहानपणापासूनच भीमराव दृढनिश्‍चयी होते. एके दिवशी धो धो पाऊस सुरू असताना बाल भीमराव आपल्या सवंगड्यांना म्हणाले, ‘‘मी तर आज अवश्य शाळेत जाणार.’’ मित्र म्हणाले, ‘‘उगीच फुशारकी मारू नकोस. या एवढ्या पावसात तू काही शाळेत जाऊ शकणार नाहीस. तोंडाची वाफ कशाला दवडतोस? आज मुसळधार पाऊस चालू असताना तुला शाळेत जाणे अशक्य आहे. पाऊस म्हणतो मी व तू म्हणतोस मी. निसर्गापुढे तुझा काय टिकाव लागणार?’’ परंतु, तेवढ्या पावसातही छत्री न घेताच भीमराव शाळेत पोहोचले. एखाद्या गोष्टीचा निश्‍चय केल्यास त्यासाठी ते सर्वस्व पणाला लावत असत.
जेव्हा डॉ. बाबासाहेब मुंबई येथील एलफिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले, त्या वेळी त्यांचे वय १७ वर्षे होते. त्याच वर्षी मुंबईच्या भायखळा मार्केटमधील एका छपराखाली रमाबाईंबरोबर त्यांचा विवाह झाला. रमाबाईंनी त्यांच्या अखेरपर्यंत बाबासाहेबांना खंबीरपणे साथ दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिका व लंडन येथून आपले उच्च शिक्षण पूर्ण कले. यासाठी त्यांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज व कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी साहाय्य केले. डॉ. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातून १९१७ साली डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. एवढ्यावर न थांबता १९२२ साली त्यांनी लंडन येथून बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाचे पहिले उच्चविद्याविभूषित होते. परंतु, हे त्यांना सहज प्राप्त झाले नाही, तर त्यासाठी त्यांनी खूप हालअपेष्टा सहन केल्या.
सन १९२०च्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाबासाहेब अभ्यासासाठी लंडनला पोहोचले. लंडनच्या ग्रंथालयात ते पावाचे दोन तुकडे खाऊन सतत अभ्यास करीत. एकदा शिपायाने सांगितले, ‘‘अहो साहेब, इथे काही खायचे नसते!’’ तेव्हापासून तेही बंद! टिपणं काढलेल्या वह्यांनी खिसे फुगलेले. चेहरा घामाने डबडबलेला, शरीर शिणलेले, पण डोळे टवटवीत; असे बाबासाहेब वाचनालयातून सगळ्यांच्या शेवटी बाहेर पडत. रात्री दहानंतर त्यांना सपाटून भूक लागे. मग मध्यरात्री, पत्र्यावर चार पापड भाजून खायचे, वर कपभर दूध!
एक दिवस शेजारचे अस्नाडेकर म्हणाले, ‘‘अहो आंबेडकर, रात्र फार झाली! किती जागता रोज? झोपा आता!’’
बाबासाहेब शांतपणे म्हणाले, ‘‘अहो, अन्नाला पैसा नाही, झोपायला माझ्यापाशी वेळ नाही. माझा अभ्यास मला शक्य तितक्या लवकर पुरा करायचा आहे.’’
अमेरिकेत शिकत असताना बाबासाहेबांनी पाठवलेल्या एका पत्रात ते म्हणतात, ‘‘आई-बाप मुलाला जन्म देतात; कर्म देत नाहीत, असे म्हणणे बरोबर नाही. आई-बाप मुलाच्या आयुष्याला वळण लावू शकतात, ही गोष्ट आपण आपल्या लोकांच्या मनावर बिंबवली पाहिजे. मुलांच्या शिक्षणाबरोबरच मुलींच्या शिक्षणासाठी आपण धडपड केली, तरच आपल्या समाजाची प्रगती झपाट्याने होईल.’’ 
 
आपले विद्यार्थी जीवन खडतर असूनही ज्यांनी आपल्या समाजाच्या शिक्षणाचा नेहमीच विचार केला, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील या काही घटना आणि त्यांचे एकूणच चरित्र सगळ्या विद्यार्थ्याना प्रेरणा देणारे असेल.