मित्र-मैत्रिणींनो, शब्दांच्या प्रवासातील चौथ्या टप्प्यात आपण डोळे, कान, नाक याअवयवांवर आधारित काही वाक्प्रचार पाहिले. अवयवांवर आधारित आणखी काही वाक्प्रचार सांगायचे तर, तोंड येणे, तोंड फिरवणे, तोंड उतरणे, तोंडदेखले बोलणे, तोंडी लागणे, तोंडाला पाने पुसणे, तोंडावरची माशी न हलणे, हे तोंडावर आधारित काही वाक्प्रचार.


हात झटकणे, हातखंडा असणे, हातचलाखी करणे, पाय खेचणे, तळपायाची आग मस्तकात जाणे, पोटात गोळा येणे, पोटात कावळे ओरडणे,  दात दाखवणे, दाताच्या कण्या करणे, हे हात, पाय, पोट, दात, या अवयवांवर आधारित वाक्प्रचार. तुम्ही असे वाक्प्रचार आठवा आणि लिहून काढा बरं.रागावणे, खाणे, या संदर्भातले काही वाक्प्रचार तसंच विविध रंगांवर आधारित वाक्प्रचार, अतिशयोक्तीचे आणि ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ असलेले काही वाक्प्रचारसुद्धा आपण पाहिले. 


विविध व्यवसायातून काही वाक्प्रचार आपल्या भाषेत आले आहेत. उदा., गळ टाकून पाहाणे , मात्रा लागू पडणे, बीजारोपण करणे, वकिली करणे, पाया घालणे, तारेवरची कसरत करणे, हे वाक्प्रचार अनुक्रमे कोळी, डॉक्टर, शेतकरी, वकील, बांधकाम व्यावसायिक, डोंबारी यांच्या व्यवसायातून आले आणि आपल्या दैनंदिन भाषेत सहज सामावून गेले. असे आणखीन काही वाक्प्रचार आठवा, लिहून काढा आणि मलाही सांगा.
'अनागोंदी कारभार ' या ऐतिहासिक वाकप्रचाराची गोष्ट आपण मागच्या टप्प्यात पाहिली. आज आणखीन काही वाकप्रचारांच्या गोष्टी पाहू या.राघोबादादांनी आपल्या कारकिर्दीत हिंदुस्थानचा मोठा भाग पादाक्रांत करून, मराठ्यांचं भगवं निशाण अटकेच्या किल्ल्यावर नेऊन फडकवलं, यावरून फार मोठा पराक्रम करणे, याअर्थी वाक्प्रचार आला, 'अटकेवर झेंडा लावणे '. 
घोर अपराधाबद्दल कड्यावरून लोटून देण्याची शिक्षा पूर्वी रूढ होती. शिक्षेचं हे स्वरूप आता नष्ट झालं आहे. त्यामुळे हद्द होणे, एखाद्या गोष्टीचं अंतिम टोक गाठणे, याअर्थी 'कडेलोट होणे' हा वाक्प्रचार प्रचलित आहे. 
पूर्वी योद्धे लढाईवर जाताना किंवा दरबारात जाताना, कमरेस शेल्यासारखे एक वस्त्र बांधीत असत, त्यावरून सिद्ध होणे, सज्ज होणे, यासाठी वाक्प्रचार रूढ झाला, 'कंबर कसणे'. सीतेने दिलेल्या रत्नहारामध्ये राम दिसतो का , हे पाहण्यासाठी मारुतीने प्रत्येक रत्न फोडून पाहिले आणि राम न दिसल्याने तो हार फेकून दिला, या पौराणिक गोष्टीवरून, तथ्य नसणे, अर्थ नसणे, याअर्थी वाक्प्रचार आला,' राम नसणे '. श्रीरामाचा बाण कधीही वाया जात नसे, या पौराणिक संकेतावरून, हमखास यश देणारी अचूक गोष्ट, याअर्थी शब्दप्रयोग आला, 'रामबाण'.  बरेचदा हा शब्द आपण औषधासाठी वापरतो.
भगीरथाने दीर्घ परिश्रमाने गंगेला पृथ्वीवर आणलं, त्यावरून अचाट कार्य पार पडणे, याअर्थी शब्दप्रयोग रूढ झाला,  'भगीरथ प्रयत्न'. ऐतिहासिक, पौराणिक गोष्टी आणि त्यावर आधारित वाक्प्रचार तुम्हाला माहीत असतील तर नक्की सांगा आणि या प्रवासात सहभागी व्हा.शब्दांच्या प्रवासाचा हा टप्पा कसा वाटला?  पुढच्या स्थानकावर लवकरच भेटू या, आणखीन काही वाक्प्रचार आणि म्हणींसह.

 अवयवांवर आधारित असलेल्या वाकप्रचारांचा पहिला लेख वाचा खालील लिंकवर  

शब्दांच्या गावा जावे - लेख क्र 4

-दीपाली केळकर

[email protected]