गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ भारत अभियान, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण आणि त्यावरून सुरू असलेला वाद किंवा डंपिंग ग्राउंडची संपत चाललेली मर्यादा असे विषय तुमच्या वाचनात आलेच असतील. घरच्या कचऱ्याचं व्यवस्थापन करा असाही सल्ला दिला जातोय. पण हे व्यवस्थापन नेमकं कसं करायचं? हा प्रश्न आपल्याला कायम पडतो. चला तर मग आजच्या लेखातून आपण त्याची माहिती घेऊ या.
 
घरातला कचरा हा साधारणपणे दोन गटात विभागला जातो. १) ओला कचरा - यात पालेभाज्या, फळभाज्या, फळे यांची साले, देठं, खराब झालेली पानं, चहाचा, कॉफीचा चोथा, बुरशी आलेलं अन्न, कीड लागलेलं धान्य, अंड्याची टरफलं यांचा समावेश होतो तर, २) सुका कचरा - यात वाळलेला पालापाचोळा, निर्माल्य,  वर्तमानपत्रे, प्लास्टिकच्या वस्तू, जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा समावेश होतो.
 
खत तयार करण्याच्या दृष्टीने यातला ओला कचरा एका भांड्यात साठवून तो नैसर्गिकपणे कुजू देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण घरामध्ये हा कचरा कसा कुजवणार? त्याला घाण वास नाही का येणार? मुंग्या, माश्या, चिलटे यांचा त्रास नाही का होणार? असे प्रश्न आपल्याला नक्कीच पडणार. पण माझ्या अनुभवावरून सांगते की, अशा विघटनाच्या प्रक्रियेत दुर्गंध न येता उलट पहिल्या पावसात मातीचा जसा सुगंध येतो तसाच सुगंध येतो. पण जर सुगंध येत नसेल तर आपला प्रयत्न कुठेतरी चुकतोय हे लक्षात घ्या.
 
या प्रकल्पासाठी आवश्यक आहेत ते घटक पुढील प्रमाणे -
१. पुष्कळ छिद्रे असणारा डबा, ट्रे किंवा माठ, मोठा पाण्याचा ड्रम. यांना सगळ्या बाजूंनी वायूविसर्जनासाठी  छिद्रे असणे आवश्यक आहे
२. नारळाच्या शेंड्या
३. घरातला वर सांगितलेला ओला कचरा. शक्य तितका बारीक चिरलेला
४. सुकलेला पालापाचोळा आणि निर्माल्य
५. शेणखत किंवा कंपोस्ट खत. हे नसेल तर घरातील चमचाभर दही
६. पाणी
जर जाळीदार ट्रे किंवा डबा घेणार असाल तर आतल्या बाजूने बारीक जाळीचे कापड नीट बसवून घ्या. यामुळे किडे किंवा चिलटांचा त्रास होणार नाही. पण हवा खेळती राहील. माठ किंवा पाण्याचा ड्रम घेतला तर त्याला मोठ्यांच्या मदतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित छिद्रे पाडून घ्या. अशा तयार केलेल्या डब्याच्या तळाशी नारळाच्या शेंड्या थोड्याशा पिंजून एक बोटभर जाडीचा थर द्या. यावर घरातला बारीक केलेल्या कचऱ्याचा एक सारखा थर पसरा. या थरावर सुकलेला पालापाचोळा, निर्माल्य  पसरून एक मूठभर शेणखत किंवा कल्चर पावडर पसरा. या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर घरातील एक चमचा दही फेटून त्यावर घाला. परत एकदा ओला कचरा, सुका पालापाचोळा, निर्माल्य,  कल्चर असे थर देत जा. कंपोस्ट किंवा दह्यामुळे ओला कचरा खतात रूपांतरीत करण्याची प्रक्रिया अधिक जलद घडते. डब्याला झाकण लावायला विसरू नका. 
 
 आता यानंतर रोज आपल्या स्वयंपाकघरात तयार होणारा ओला कचरा या खताच्या डब्यात टाकायचा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढा ओला कचरा त्याच्यापेक्षा थोडा जास्त पालापाचोळा, निर्माल्य कचऱ्यात मिसळायचा, आणि किंचित पाणी शिंपडायचे. हा विघटन होणारा कचरा दर दोन ते तीन दिवसांनी खालीवर करावा. जर कचऱ्यातून दुर्गंधी येत असेल तर पालापाचोळा घालण्याचं प्रमाण वाढवायचं. पण जर मातीचा वास आला तर आपला हा प्रकल्प योग्य दिशेने चालला आहे हे लक्षात घ्या. अशी प्रक्रिया तो ट्रे किंवा डबा पूर्णपणे भरेपर्यंत करावी. पूर्ण भरलेल्या या डब्यातील कचऱ्याचे खतात रूपांतर होण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन महिने लागतात. या काळात हा कचरा ओलसरपणा कायम ठेवून सतत हलवत राहावा.
 
ज्या वेळी डब्यातील कचऱ्यामध्ये ओळखता येण्यासारखा कोणताही घटक शिल्लक रहात नाही, त्या वेळी खत तयार झाले हे समजावे. पूर्ण तयार झालेले खत काळसर तपकिरी आणि काहीसे दाणेदार बनते. ते बाहेर काढून चाळून एका हवाबंद डब्यात नीट भरून ठेवा. हे खत दर पंधरा दिवसांनी आपल्या बागेतल्या झाडांना घाला. काही दिवसातच या खताचे चांगले निकाल आपल्याला बघायला मिळतील. रसायनमुक्त या खतामध्ये असणाऱ्या घटकांमुळे मातीचा कस सुधारतो आणि झाडांचे आरोग्यही. त्यामुळे झाडांना कीड लागणं, कळ्या, फुलं, फळं अकालीच गळून जाणं, पानं करपणं यासारखे प्रकार कमी होत जातात.
 
या संपूर्ण प्रक्रियेत आवश्यक आहे तो संयम आणि थोडासा वेळ देण्याची गरज. शिवाय पानगळतीचा सीझनही सुरू होईल. त्यामुळे आवश्यक पालापाचोळाही सहज उपलब्ध होईल. मग वाट कसली बघताय? चला सुरुवात करा आणि स्वच्छ भारत मोहिमेत आपलाही खारीचा वाटा उचला.
 
 
-आराधना जोशी