कार्य-अनुभव!!

दिंनाक: 04 Nov 2017 14:20:13

पुस्तकं, परीक्षा, घोकंपट्टी, टक्केवारीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या यशापयशाचं मूल्यमापन करण्याची पद्धत अविरत सुरू आहे. प्राथमिक अवस्थेमध्ये सर्वांना समान दर्जाचं आणि एकाच प्रकारचं शिक्षण देणं आवश्यक आहे. हे जरी मान्य केलं, तरी विद्यार्थ्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्यातील विशेष कौशल्यं ओळखून ती विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते शिक्षण देण्याची पुरेशी सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाही असंही दिसतं.
 
मात्र, प्रायोगिक पातळीवर आपल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये उपयोजित कला, कौशल्यविकास करणारं शिक्षण, मूल्यशिक्षण असे विविध शिक्षणपूरक शालेय उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्याच्या दृष्टीकोनातून शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, सामाजिक संस्था यांच्यामार्फत राबवण्यात येणारे उपक्रम, तसंच शासकीय शैक्षणिक धोरणं यांनुसार शाळांतर्गत राबवण्यात येणारे उपक्रम यांचादेखील यात समावेश आहे. कृतिशील किंवा श्रमप्रतिष्ठा रुजवणारं, जीवनोपयोगी असं शिक्षण देण्याची आपली परंपरा तशी खूप जुनी आहे. याची मुळं अगदी गुरुकुल पद्धतीमध्येदेखील सापडतात. अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सतत वेगवेगळे प्रयोगही झाले आहेत, होत आहेत. शिक्षण चळवळीत काम करणाऱ्या अनेक सुधारकांनी अशा प्रकारच्या उपक्रमांविषयी सखोल अभ्यास केला आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरेल; उदा., व्यावसायिक शिक्षण, होमसायन्स इत्यादींचा सुनियोजित आराखडा मांडून असे उपक्रम कार्यान्वितदेखील केले. तर दुसरीकडे, पारंपरिक शिक्षणपद्धतीही सुरूच आहे.
 
 या सगळ्याचा समन्वय साधण्याच्या दृष्टीकोनातून विचार करत असताना एक मुद्दा समोर आला की, आज-काल कार्य-अनुभव कुठेतरी मागे पडतो आहे का? शाळेत जर दैनंदिन शालेय शिक्षण दिलं जात असेल, तर घरात दैनंदिन जीवनोपयोगी कार्य-अनुभव मुलांना दिला जातो का? इथे पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.
 
 ‘कार्य-अनुभव’ ही संकल्पना अधिक स्पष्ट करायची, तर दैनंदिन जीवनातील काही कामं पालकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेणं किंवा विद्यार्थ्यांसमोर /पाल्ल्यासमोर कार्याचे (कामांचे) वेगवेगळे पर्याय ठेवणं आणि त्यातून त्यांना निवडीचं स्वातंत्र्य देऊन ती कार्य(कामं) त्यांच्याकडून करून घेणं (स्वतः कोणताही हस्तक्षेप न करता) आणि त्यानंतर त्यांना हे काम करत असताना आलेला अनुभव लिहून काढायला सांगणं. अशा या घरातल्या घरात राबवता येऊ शकेल, अशा क्लृप्तीला आपण कार्य-अनुभव असं म्हणू शकतो.
 
 आता कार्य-अनुभव सोप्या उदाहरणाच्या साहाय्याने अधिक  स्पष्ट करायचा तर -
प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याविषयी किमान माहिती असतेच. म्हणजे त्याच्या आवडी-निवडी, स्वभाव वगैरे. तर त्या अनुषंगाने प्रयोग म्हणून घरातील दैनंदिन कामांपैकी एखादं काम मुलाला/मुलीला करायला सांगावं. (इथे लिंगभेद नको हे सांगणे न लगे.) उदा., काही पैसे देऊन तीन-चार प्रकारच्या भाज्या आणायला सांगणं, जुने रद्दीचे कागद समोर ठेऊन ते कापायला लावणं, घराची स्वच्छता करायला सांगणं, संडास-बाथरूम साफ करायला सांगणं, स्वयंपाकघरात एखादा पदार्थ करायला सांगणं, घर/बिल्डिंगच्या आवारात मिळतील त्या टाकाऊ वस्तू एकत्र करायला सांगून त्यातून काही नवनिर्मिती, रचनाचित्र तयार करायला सांगणं, अशा प्रकारची काही कार्य मुलांना सांगता येतील. अर्थात मुलांचं वय, क्षमता आणि त्यांचा कल या गोष्टींचा विचार करून कार्यांची यादी करता येईल आणि त्यातून निवड करता येईल. एका गोष्टीचं भान ठेवायला हवं, ते म्हणजे मुलांना हे कार्य करण्यासाठी उत्साह वाटला पाहिजे. आपल्याकडून आपले आई-बाबा/ताई-दादा/पालक त्यांची कामं करून घेत आहेत, अशी भावना बिलकुल त्यांच्या मनात येता कामा नये. त्यासाठी एक खबरदारी घेता येईल की, रोजच्या कामांव्यतिरिक्त काही वेगळंच काम शोधता येईल. सुरुवातीला कमी कष्टाचं, ज्यात मुलं गुंतून राहतील, असं काम निवडता येईल आणि हळूहळू दैनंदिन जीवनात आवश्यक अशी कामं करून घेता येतील.
 
कार्य-अनुभव इथेच संपतो का? नाही. याच्या पुढचा एक टप्पा महत्त्वाचा आहे, ज्यामुळे या सगळ्या प्रकारात औत्सुक्य आणि रस निर्माण होईल; तो म्हणजे हा कार्य-अनुभव मुलांनी आणि पालकांनी लिहून काढायचा.
 
या अनुभवलेखनाचं स्वरूप साधारण कसं असेल, तर नोंद स्वरूपात. त्यात कोणतंही व्यक्तिगत मत किंवा निष्कर्ष नसेल. थोडक्यात - काम काय ठरवलं, त्याचं स्वरूप काय होतं, प्रत्यक्ष कृती कशी केली, लागलेला वेळ वगैरे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काम करून काय वाटलं? त्यानंतर पालकांनी काढलेल्या नोंदी मुलांना वाचू द्यायच्या आणि मुलांनी काढलेल्या नोंदी पालकांनी वाचायच्या आणि ठेऊन द्यायच्या. साधारणतः आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून तीनदा हा उद्योग करायचा. महत्त्वाचं म्हणजे, निवडलेल्या कामांमध्ये पूर्णपणे वैविध्य हवं हं!
 
दोन महिने झाल्यावर त्या काढलेल्या नोंदी पुन्हा वाचायच्या. या नोंदींच्या वाचनातून एक गोष्ट नक्की घडते, ती म्हणजे पालक-मुलांचा छान संवाद होतो. आणि दुसरं म्हणजे, पालकांनी लिहिलेलं मुलं वाचतात आणि मुलांनी लिहिलेलं पालक वाचतात. यातून छान मनोरंजनदेखील होतं. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी की, कालांतराने काम करत असताना नोंदीच्या आधारे, झालेल्या चुकासुद्धा आपोआप समोर येतात. त्यांना टाळता येतं आणि हळूहळू काम करण्यामध्ये आत्मविश्वास आणि सफाईदारपणा यायला लागतो.
 
एक सर्वात महत्त्वाची गोष्ट होते ती म्हणजे, ‘हे मला जमत नाही' किंवा 'हे मला येत नाही’ किंवा ‘आमचा मुलगा/मुलगी हे करत नाही.' किंवा 'त्याला/तिला हे काही येत नाही.’ ही जी एक नकाराची भावना असते, ती कमी व्हायला लागते.
 
अशा कार्य-अनुभवाचा नेमका उपयोग काय? तर पुढे जाऊन नोकरी/व्यवसाय करत असताना नियमित कामापेक्षा  वेगळ्याच जबाबदाऱ्या जेव्हा अंगावर पडतात, तेव्हा त्यांच्याकडे संकट म्हणून पाहण्याऐवजी संधी म्हणून पाहण्याचा कल वाढतो. करिअरच्या एखाद्या टप्प्यावर अचानक उलथापालथ झाली आणि अपयशाला/पराभवाला तोंड द्यावं लागलं, तर अशा वेळी पर्यायी कार्य निवडण्याची आणि प्रयत्नपूर्वक ते पूर्ण करून, त्यात विशेष कौशल्य प्राप्त करण्याची वृत्ती निर्माण होते.
 
थोडक्यात काय, तर प्राप्त परिस्थितीत जीवनाच्या परीक्षेचा पेपर पूर्ण प्रयत्नाने आणि उमेदीने सोडवण्यासाठी आवश्यक तो सकारात्मक विचार हळूहळू रुजू लागतो. 
 
- अक्षय वाटवे