मागच्या महिन्यात आपण मुलांना ध्यानाचं शिक्षण देण्याची गरज, त्याविषयीचं संशोधन, भारताबाहेर मुलांना ध्यान शिकवण्याच्याबाबतीत झालेले प्रयोग, त्याची यशस्विता अशा अनेक गोष्टींविषयी बोललो.

या वेळी आपण मुलांना प्रत्यक्ष ध्यान कसं शिकवता येईल ते पाहू या. मुलांना ध्यान शिकवताना, आपल्या मोठ्यांच्या ध्यानाविषयी ज्या मुलभूत संकल्पना असतात त्या थोड्या बाजूला ठेवायला हव्यात. ध्यानात अगदी शांतपणे, डोळे मिटून, अजिबात हालचाल न करता आणि मुख्य म्हणजे बराच वेळ बसायला हवं अशी अपेक्षा असते. प्रत्यक्षात या गोष्टी मोठ्यानाही जमवणं अवघड जातं, तिथे मुलांकडून ही अपेक्षा केली तर ध्यान ही सुंदर प्रक्रिया त्यांच्या दृष्टीने फार अवघड आणि मुख्य म्हणजे अगदी रुक्ष आणि तांत्रिक होईल.

अगदी छोट्या छोट्या सोप्या तंत्रांतून मुलांना निसर्गाच्या माध्यमातून ध्यानाचे अनेक प्रकार शिकवता येतात. निसर्ग हा मुलांचा अगदी जवळचा, सच्चा मित्र असतो. त्याच्या सहवासात ती सहजपणे रमतात, तणावरहित होतात.

काही शाळांमध्ये मुलांना ध्यान म्हणून प्रार्थना म्हणायला सांगतात. अशा वेळी पारंपरिक प्रार्थनेऐवजी एखादी छानशी निसर्ग प्रार्थना म्हणायला सांगितली तर मुलं डोळ्यासमोर निसर्गाचं लोभस रूप साकार करत आतून शांत होत जातील. नुकतीच एक सुंदर प्रार्थना ऐकली ती खाली देत आहे...

आम्ही आकाश बघू....  आम्ही झाडं बघू....   आम्ही पक्षी बघू....   आम्ही पाऊस बघू....

आम्ही आकाश बघू ssss

हे रंग हे गंध हे स्पर्श सारे.....

ज्यांनी दिले आम्ही त्याला स्मरू.....

आम्ही आकाश बघू....  आम्ही झाडं बघू....   आम्ही पक्षी बघू....   आम्ही पाऊस बघू....

आम्ही आकाश बघू ssss

तो देतो अन...  देतच राहतो...

तो देतो अन...  देतच राहतो...

देणारा तो... अमुचा गुरू...                                     

आम्ही आकाश बघू....  आम्ही झाडं बघू....   आम्ही पक्षी बघू....   आम्ही पाऊस बघू....

आम्ही आकाश बघू ssss

हे नाही ते नाही म्हणणार नाही...

दुःखावरही प्रेमच करू...

आम्ही आकाश बघू....  आम्ही झाडं बघू....   आम्ही पक्षी बघू....   आंम्ही पाऊस बघू....

आम्ही आकाश बघू ssss

आॅडिओ: आम्ही आकाश बघू ssss

प्रार्थना ध्यान, शांतता ध्यान, कृतज्ञता ध्यान, सजगता ध्यान, निरीक्षण ध्यान, निसर्ग ध्यान असे ध्यानाचे अनेक प्रकार आहेत.

या प्रार्थनेत मला वाटतं ध्यानाचे सगळे प्रकार सामावलेले आहेत...

शाळेत मुलांना निसर्गासोबत एकटं बसायला शिकवता येईल. त्यातून मुलं शांतता, एकांत, स्वतःचं आकलन, स्वतःचं तटस्थ निरीक्षण अशा अवघड वाटणाऱ्या गोष्टी आपोआप करायला लागतात. त्याचा मुलांवर अतिशय गंभीर (चांगल्या अर्थाने), सकारात्मक, सृजनशील परिणाम दिसून येईल. हे परिणाम त्यांच्या अभिव्यक्तीत जाणवतील.

जे. कृष्णमूर्तींच्या शाळेत खूप वेगळ्या प्रकारचं ध्यानशिक्षण देतात. त्या शाळेतली मुलं म्हणतात, की निसर्गात खूप छान, शांत वाटतं. या मुलांनी त्यांच्या शाळेच्या मासिकात लिहिलेल्या कविता वाचल्या तर त्यातून त्यांचं निसर्गाशी झालेले एकरूपत्व जाणवतं. या कवितांमधल्या ओळी वाचताना मी भारावून गेलो. काही संकल्पना अशा होत्या...

वाऱ्याचा आवाज म्हणजे जणू निसर्गाचा श्वासोच्छ्वास...

पक्ष्यांच चिवचिवणं, पावसाच्या थेंबाचे आवाज म्हणजे जणू त्यांनी आपल्याबरोबर म्हणलेलं गाणं...

गुलाबाची फुलं, सुंदर फुलपाखरं, डोलणारी झाडं, सुंदर पक्षी यांची वर्णनं...

झाडं, फुलं, पाणी, खडक, पक्ष्यांशी मनातल्या मनात बोलायचं...

आपणही मुलांना अशा प्रकारचं निसर्गध्यान शिकवू शकतो.

शांतता अनुभवणं ही एक कला आहे. त्याचं शिक्षण ध्यानातून मिळतं. निसर्गाचं आकर्षण मुलांना असतंच. त्या आकर्षणाचा विकास यातून घडतो. फुलांचा सुगंध, गारेगार वाऱ्याचा स्पर्श यातून मुलांना त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं लक्षात आणून देता येईल. या विश्वातलं आपलं स्थान, पंचज्ञानेंद्रियांच्या आधारे निसर्गाचं ज्ञान त्यांना होत जाईल.

छोट्या छोट्या ध्यानाच्या अनुभवातून त्यांना एकटेपणा आणि एकांत यातला फरक कळेल. स्वतःच्या भावना, विचार यांना सामोरं जाण्याचं शिक्षण मिळेल. लौकिकार्थानं मोठ्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत, सारखंच कामात व्यस्त राहणं, तासनतास काम करणं हा आदर्शवाद समजला जातो. पण मला काही वेळा तो पलायनवाद वाटतो. कारण एकटं राहणं शिकवलेलंच नसतं. पण मुलांसाठी एकटं बाहेर पडणं, फिरायला जाणं, झाडाखाली नुसतं बसणं हेही ध्यानच आहे. ते शांततेचं शिक्षण आहे. नाहीतर मग नुसतंच सतत हातात पुस्तक धरून बसणं, मित्रांसोबत अर्थहीन बडबड करत राहणं अशा सवयी लागतात.

अधूनमधून अगदी एकटं बसावं, झाडाचं पान अलगद पडताना पाहावं, पाण्याच्या लाटांचा संवाद ऐकावा, पक्ष्यांचं निर्भर उडणं पाहत राहावं हे छानसं ध्यानच आहे. यातूनच त्यांना आपल्या मनाच्या आकाशातल्या हालचाली कळतील. आपले विचार कसे फुलपाखरांसारखे एकमेकांचा पाठलाग करतायत, एकमेकांशी खेळतायत ते समजेल.

ध्यानासारखी अवघड वाटणारी, पण अशा पद्धतीनं शिकवलं तर खूप सहज, सोपी, सुंदर वाटेल अशी ही योगप्रक्रिया आपण मुलांना नक्कीच शिकवू या!!!

'मुलांना ध्यान का शिकवावे?’ वाचा खालील लिंकवर 

 विद्यार्थ्यांसाठी ध्यान

- मनोज पटवर्धन

[email protected]