कल्पना करा एक विस्तीर्ण असे मैदान. जिथपर्यंत आपली नजर जाऊ शकते तिथंपर्यंत पसरलेले गवताचे मैदान. ज्यात डोंगर आहेत, टेकड्या आहेत, त्यावर सपाट पठार आहे. मोठमोठे दगड-धोंडे इतस्तत: पडलेले आहेत. काही मोठ्या दगडावर पडलेले पांढरे डाग मोठ्या पक्ष्यांच्या आसनाची साक्ष देत असतात. दोन्ही बाजूला ज्वारीची शेतं आहेत. त्यांच्या मधोमध काळा डांबरी रस्ता आहे किंवा गाई-गुरं, वाहनं आणि वाटसरू यांच्यामुळे मळलेली मातीची वाट आहे आणि या सगळ्याला सामावून घेणारं निळशार आकाश आहे. ज्याच्या छटा प्रत्येक प्रहराला बदललेल्या दिसतात. जिथे मक्तेदारी चालते ती फक्त मोठ्या शिकारी पक्ष्यांची. आताच्या डिजिटल युगातल्या कुठल्याही मोबाईलवरून कुठल्याही दिशेला फोटो काढला तर तो एक उत्तम लँडस्केपचा नमुना ठरेल. डोंगरावर चढताना किंवा सपाट माळरानात अनेक मेंढपाळ आपल्या शेळ्या-मेंढ्या चरायला जाताना दिसतात. हे दृश्य फार अप्रतिम दिसतं. मेंढपाळाच्या डोक्यावर गडद भपकेबाज असा लाल किंवा नारिंगी फेटा बांधलेला असतो. अंगावर पांढरा स्वच्छ पेहेराव असतो जो कधीकधी मेंढ्यांच्या रंगात एकरूप होऊन जातो. तेव्हा हा मेंढपाळ फक्त त्या फेट्यामुळे ओळखू येतो. क्षितिजावर मोठ्या कळपात बऱ्याचदा चिंकाराही दिसतात आणि आपली चाहूल लागताच धूम पळून जातात. याठिकाणी प्रत्येकाला स्वतःचं असं एक अस्तित्व आहे. उन्हाळ्यात पिवळसर पडलेल्या आणि पावसाळ्यात हिरवाजर्द शालू पांघरलेल्या अशा गवतात अनेक जीव गुण्यागोविंदाने राहात असतात, ज्याचं अस्तित्व आपल्याला सहसा जाणवत नाही. या दोन्ही ऋतूत त्या गवतात एकरूप होऊन काही प्राणी-पक्षी आपली उपजीविका करत असतात. कधीकधी आपण त्यांच्या शेजारीच उभे असतो. आवाज शेजारीच कुठेतरी येत असतो, पण ते भुरकन उडून गेल्यावरच आपल्याला कळतं, कळतं कसलं.. दचकतोच आपण. कडेकडेनी फिरत असताना एकदम एखादी झोपडी नजरेला पडते. त्याच्या आजूबाजूला डाळिंब, चिकू, पेरू, सीताफळ अशा बागा दिसतात. ऐन हंगामात जर आलो तर या बागांच्या बाहेर तोडून ठेवलेली ताजी फळ दिसतात. मोठमोठ्या टोपल्या लालचुटूक डाळिंबानी ओतप्रोत भरलेल्या असतात. दुचाकीला मागे दोरीनी बांधलेल्या सीताफळाच्या पाट्या जवळच्या बाजारात विकायला चाललेल्या दिसतात. कुठेतरी गुऱ्हाळ असतं, तिथून मधूनच उसाच्या मळीचा वास येत असतो. काहींना हा वास आवडतो तर काहींना नाही. बऱ्याच अंशी आवडतच नसतो.

डोंगरावर वाढणाऱ्या गवतामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. कास पठारावर जशी फुलं येतात ना तशीच फुलं या गवतातसुद्धा बऱ्याचदा दिसतात. केवढा दुराभास आहे पाहा ना, कास पठार हे खास फुलांसाठी म्हणून संरक्षित केलेलं आहे. तिथे गेल्यावर त्याच फुलांवर पाय देऊन सेल्फी काढले जातात आणि अशा मोकळ्या माळरानावर फुलणाऱ्या फुलांकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो. या फुलांना दूरवरून पाहताना इतका अंदाज येत नाही, पण जवळून पाहिलं तर त्याचा आकार आणि रंग आपलं मन मोहून टाकतात. दिसताना हे गवत जरी सारखे वाटले तरी या गवताच्या बऱ्याच जाती आहेत बरं का!

संध्याकाळच्या सुमारास आकाशात रंगांची उधळण झालेली असते. त्यात सोसाट्याचा वारा आला की या गवतातून येणारा सळसळणारा आवाज शांततेची जाणीव करून देतो. हवेत एक छान गारवा पसरलेला असतो आणि हातात एक मस्त चहाचा कप घ्यावासा वाटतो. तो क्षण आपल्याला सांगत असतो घे बाबा जेवढा आनंद मिळतोय ना तेवढा साठवून ठेव. जमेल तेवढे फोटो घेऊन ठेव. सुगरिणीनी केलेली पण सध्या वापरात नसलेली घरटी काढून जपून ठेव कारण नंतर ती बांधायला झाडेच राहणार नाहीयेत. इथल्या विहिरीचे पाणी जेवढं पिता येत असेल तेवढं पिऊन घे. इतकंच कशाला... जमल्यास या वाऱ्याची सळसळ पण रेकॉर्ड करता येत असेल तर करून ठेव. काही वर्षातच हे सगळं संपणार आहे. बघ हे.. का बरं? असं काय होणार आहे?

अरेच्या.. खरंच की. पुण्यातल्या लोकांना मुंबईपेक्षा जवळ विमानतळ हवा आहे ना. मग काय बरोबर आहे की. इथे काय फक्त माळरान तर आहे. नुसते दगड आणि धोंडे. गवत आणि पातं. डोंगर आणि दरी. आणि सर्वदूर पसरलेली पडीक जमीन. या सगळ्या पेक्षा हे सगळं नष्ट करून छान चकाचक रस्ते करू. तिथे दोन्ही बाजूला मोठमोठी हॉटेल्स उभारू. पार्किंगसाठी मोठी जागा करू. विमानांसाठी अद्ययावत यंत्रणा उभारू. मोबाईलचे टॉवर उभारू. झालंच तर आशियातलं सर्वात उत्तम विमानतळ उभारण्याचा प्रयत्न करू. आधी असलेल्या नापीक जमिनीचा, माळरानाचा नामोनिशाना मिटला पाहिजे.

यातलं खरं दु:ख काय आहे माहीत आहे?

आपण इथेही आपलाच विचार करतोय. म्हणजे असं की आपल्याला असं माळरान दिसणार नाही. ज्वारीच्या शेतात फिरता येणार नाही. तिथल्या लोकांना जमिनीची चांगली किंमत मिळेल. जमिनीला सोन्याचा भाव येईल.. वगैरे वगैरे..

पण तिथे युगानुयुगे जे जीव राहतायत. उपजीविका करतायत, अनेक संकटांवर मात करून आपला वंश वाढवतायत. त्याचं काय? त्यांनी कुठे जायचं? ज्या डोंगरात कोल्हे, लांडगे गुहा करून राहतात. त्यांनी त्याच गुहेत समाधी घ्यायची का? कुजलेल्या सडक्या मांसावर उपजीविका करणारे तरस.. त्यानी आपले पोट कसे भरायचे? असे कितीतरी प्रश्न आहेत. पण उत्तरं कोणाकडेच नाहीत. थोडक्यात हळूहळू या सगळ्यांची प्रजाती लोप पावणार आणि आपल्याला SAVE WOLF * SAVE FOX * SAVE HYENA अशा नवीन प्रकल्पांवर काम करायला मिळणार. आपण जर त्यांचा अधिवास टिकवू शकणार नसलो तर त्यांना वाचवून तरी काय अर्थ आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की आकाशात आपल्याला कुठली flight पाहायला आवडेल! मानवनिर्मित विमानाची की उत्तुंग भरारी मारणाऱ्या गरुडाची.....

 या विमानतळाच्या बांधणीमुळे धोक्यात येणाऱ्या जिवांची यादी:

* पक्षी:

तित्तीर (Francolin), चंडोल (Lark), टिटवी (Red & Yellow Wattled Lapwing), तीरचिमणी (Pipit), धाविक (Courser), भारीट (Bunting), तीन ते चार प्रकारचे गरुड (Eagle), कापशी घार (Kite), तिसा (Buzzard), भोवत्या (Harrier), खरुची (Kestrel), ससाणा (Falcon), गप्पीदास (Stonechat), सुगरण (Baya Weaver), मनोली (Munia), नीलपंख (Roller), लावा (Quail), रातवा (Nightjar), घुबड (Owl), पिंगळे (Owlet), सातभाई (Babbler), खाटिक (Shrike), पाखुर्डी (Sandgrouse), होला (Dove), चष्मेवाला (White eye), वटवट्या (Warbler), वेडा राघू (Bee-eater), चीरक (Robin), रणगोजा (Wheatear).

* सस्तन प्राणी:

चिंकारा, कोल्हा, लांडगा, तरस, रानमांजर, रानससा, मुंगुस.

* सरपटणारे प्राणी:

साप, नाग, सरडे, घोरपड.

* फुलपाखरे:

Danaid Eggfly, Joker, Plain Tiger, Crimson Rose, Hedge Blue, Zebra Blue, Striped Tiger, Blue Tiger, Common Wanderer, Great Orange Tip.

 

-अमोल बापट 

[email protected]