निसर्गात सगळीकडे रंगांची उधळण असते. त्यात सगळे रंग भरलेले असतात. आणि त्या रंगांचे मनोहारी चित्र डोळ्यांना मनोहारी दिसते तसे ते कानांना नादमय असते. निसर्गातील हे मनोहारी, नादमय चित्र या कवितेत रेखाटले आहे. आणि हे चित्र काढणारा चित्रकार मात्र अज्ञात असतो. त्या अज्ञात चित्रकाराला अप्रत्यक्षपणे दिलेले मोठेपण या कवितेची अर्थघनता वाढवते.  


निळे ढग, हिरवेगार डोंगर
चंदेरी चमचमते झरे मनोहर !
गडद केशरी, हिरवे, पिवळे
किती फुलांचे रंग सोहळे !
प्राची उधळीत येता गुलाल
रंगे मग नभ रंगमहाल !
फुलपाखरे भिरभिर भिरती
शिवाशीविचा खेळ खेळती!
शुभ्र धुक्याचा सूंदर पडदा
धूसर होतो भास्कर येता!
कोण फेकतो रंग मनोहर
आकाशाच्या कॅनव्हासवर!
कुठे लपून बसतो चित्रकार तो
जो इतुके सुंदर  चित्र काढतो!
 
     --पद्माकर भावे