मित्रांनो
,

टि.व्ही.वरच्या रिअ‍ॅलिटी शोजच्या बाबतीत विचार करताना, आयोजक चॅनल, परीक्षक, स्पर्धक आणि प्रेक्षक अशा चार कोनातून त्याकडे पाहावं लागतं. यापैकी आयोजक चॅनल आणि परीक्षक याबद्दल आपण काहीच करू शकत नाही

 

हे रिअ‍ॅलिटी शोज पाहताना, एक प्रेक्षक म्हणून सुरुवातीला आपल्याला खूप उत्साह असतो. परीक्षक कोण असतील, स्पर्धकांची निवड कशी होतेय, अशा  अनेक बाबतीत आपल्याला कुतूहल वाटत असतं. शो सुरू झाला की काही भाग आपण आवडीनं बघतो. मग कधी कधी काही गोष्टी आपल्याला खटकायला लागतात. नंतर आपण शो बघणं सोडून देतो. एक प्रेक्षक म्हणून आपला सहभाग काढून घेतला, तरी माझं मन मात्र त्या स्पर्धकांचाच विचार करत राहतं. त्यामुळे मला स्पर्धकांसाठीच काही सांगावसं वाटतं आणि मी फक्त गायन स्पर्धांविषयीच बोलणार आहे.

 

काय फायदे तोटे आहेत अशा शोजमध्ये भाग घेण्याचे?

मित्रांनो, मी यापूर्वीच स्पर्धांविषयी सांगितलं होतं की, कोणत्याही स्पर्धेत उतरणं म्हणजे आपण स्वत:ला अधिकाधिक चांगल्या रीतीनं लोकांसमोर पेश करणं, आपल्याला येत असलेली कला उत्तम रीतीनं श्रोत्यांसमोर सादर करणं. अशा स्पर्धांमधून नेहमीच नवोदित कलाकारांना सर्वांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते. आपण जे काही शिकलो आहोत, जी कला आत्मसात करत आहोत, त्यात आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत हे तपासून पाहता येतं. पण कोणत्याही स्पर्धेत भाग घेताना, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. एकदा पहिला नंबर आला म्हणजे तो नेहमीच श्रेष्ठ, असे नाही. त्याचप्रमाणे एखादे वेळेस नंबर नाही आला, तर त्याने पुन्हा प्रयत्नच करू नयेत असं नसतं. आपल्यात अनुभवाने सुधारणा करत राहणं महत्वाचं.

 

टि.व्ही.च्या विविध चॅनल्सवर होणाऱ्या गायन स्पर्धा या, इतर स्पर्धांपेक्षा अनेक बाबतीत वेगळ्या असतात. या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी एक निराळीच मानसिकता व आत्मविश्वासाची जोड असावी लागते.  हे दृश्य माध्यम असल्याने, या स्पर्धांमधून भाग घेणाऱ्या स्पर्धकांना एकाच वेळी असंख्य लोकांसमोर यायची संधी मिळते. झटपट प्रसिद्धीही मिळते. तिथे मिळणाऱ्या सोयी सुविधांमुळे, हळूहळू स्पर्धकांच्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. हा बदल जसा बाह्यरूपात होतो, तसाच त्यांच्या कलेच्या सादरीकरणात व्हायला हवा, हे जास्त महत्त्वाचं. यासाठी कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. 

 

तिथल्या नवीन वातावरणाशी जुळवून घेत, आत्मविश्वासाने वावरायची सवय करून घ्यावी लागते. अत्यंत पाॅवरफुल साउंड सिस्टिमचा योग्य रीतीने वापर करण्याचं भान ठेवावं लागतं. सांगतील त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारची गाणी तयारीनं सादर करण्याचं आव्हान पेलावं लागतं, जे वाटतं तितकं सोपं नसतं.

या वेळी कामी येते ती यापूर्वी केलेली संगीत साधना. स्वर तालाचा पक्केपणा, आवाजाची तयारी, सुगम गायनाचा डोळसपणे केलेला अभ्यास. स्वत:ला हा अभ्यास, रियाज करावासा वाटला पाहिजे, समजून केला पाहिजे. यात आनंद घ्यायला लागलात की पुढचं सगळं सोपं होऊन जातं. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं करतोय ही भावनासुद्धा सुखावणारी असते.

 

सुगम संगीत स्पर्धेत स्वर-तालाबरोबरच महत्त्व दिलं जातं ते त्यातील भावाला. गीतातील भाव ओळखून, स्पष्ट शब्दोच्चारासह त्या काव्याला योग्य न्याय द्यावा लागतो. गाण्याची निवडही महत्त्वाची असते. निवडलेलं गाणं मूळ रेकाॅर्डच्या गायकाच्या पट्टीत न गाता, आपल्या आवाजाच्या योग्य पट्टीत गायला हवं. बऱ्याच वेळेला न झेपणाऱ्या पट्टीत गाऊन, आवाज नीट चढला नाही म्हणून फजिती होते. पूर्ण वाद्यवृंदाच्या साथीनं गायचं असल्यानं, गाण्यातील म्युझिक पीसेसचाही अभ्यास करावा लागतो. गझल सारख्या हिंदी, उर्दू भाषेतील गीतांचा विचार करताना, त्यातील शब्दांचा अर्थ आणि त्यांच्या उच्चारांची पद्धत ( त्या भाषेचा लहेजा ) जाणून घ्यावा लागतो.

 

नाट्यगीत गात असाल तर त्या गीताची पार्श्वभूमी माहीत असायला हवी. ते पद कोणत्या नाटकात, कोणत्या प्रसंगात, कोणत्या पात्राच्या तोंडी आहे हे जाणून घेतलं तर अधिक परिणामकारकरित्या सादर करता येतं. काही नाट्यगीतं शास्त्रीय रागांवर आधारित असल्याने गायकीने खुलवण्याची असतात, तर काही प्रासंगिक गाणी त्यातील भाव ओळखून, विविध प्रकारांनी (व्हरायटी - व्हेरिएशन्ससह) गायची असतात. त्याबरोबर चेहेऱ्यावरील हावभावांची (एक्सप्रेशन्स) दिलेली जोडही शोभून दिसते.

स्पर्धकानं कितीही मनापासून तयारी केली, तरी काही गोष्टी मात्र त्याच्या हातात नसतात. परीक्षकांचा मिळणारा चांगला/वाईट प्रतिसाद, प्रेक्षकांकडून मिळालेली पसंती, त्याचा स्पर्धेत टिकून राहणे - न राहणे यावर होणारा परिणाम या गोष्टी स्वीकारण्याची मनाची तयारी पहिल्यापासून ठेवावी लागते

.

टि. व्ही. चॅनलवाल्यांची अतिशयोक्ती, स्पर्धेच्या नावापासूनच दिसून येते. संगीत सम्राट काय, महाराष्ट्राचा महागायक काय. ज्या पदव्या आयुष्यभराच्या तप:श्चर्येनं प्राप्त करावयाच्या असतात, त्या ४ महिने स्पर्धेत गाऊन दिल्या जातात. 

 

या स्पर्धांमध्ये बऱ्याचदा, यश - अपयशाचा जरा जास्तच देखावा केला जातो. अतिस्तुतीसुद्धा कधी कधी मारक ठरू शकते. सुरुवातीच्या अशा अतिशयोक्तीनंतर, जेव्हा स्पर्धेतून बाद होण्याची वेळ येते, तेव्हा कौतुकाच्या शिखरांवरून एकदम बाहेर फेकलं गेलं जाण्यानं येणारी निराशा फार घातक असते. या बाद होण्याच्या भीतीनं, स्पर्धकांवर सतत प्रचंड मानसिक ताण असतो. त्याचप्रमाणे, स्पर्धकांपेक्षा त्यांच्या पालकांवर, त्यांच्या पाल्याच्या यशापयशाचा परिणाम जास्त होत असतो. आपले मित्र-मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक या सर्व समाजाचं प्रेशर ही पालक मंडळी स्वत: तर घेतातच, पण मुलांवरही आणतात. अशा वेळी मनाचा तोल जाऊ न देता, स्पर्धकांना आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणं, किती कठीण जात असेल बरं?

 

यापुढचा एक महत्त्वाचा भाग म्हणाल तर, स्पर्धकांच्या गुणांचं योग्य रीतीनं मूल्यमापन केलं गेलं नाही, निर्णय पक्षपातीपणे दिला गेला, तर मग स्पर्धकांना येणारं नैराश्य अधिक असतं. त्यांच्या मेहनतीचं, प्रयत्नांचं चीज न होता, केवळ पडद्यामागील राजकारणामुळे ते स्पर्धेतून बाहेर फेकले गेले, तर 'फळाची अपेक्षा न करता, आपलं काम फक्त करा' असा सल्ला मी देऊन कसं चालेल? वाईट तर वाटणारच. अशा गोष्टी घडताना आपण पाहतोच ना.

 

शेवटी काय, तर चॅनलवाले त्यांच्या पद्धतीने सादर करणार, आपण श्रोते करमणूक म्हणून ते पाहणार, परीक्षक वरवर सगळ्याच स्पर्धकांना खूश ठेवणार, (त्यांच्या शब्दात सांगायचे तर उत्तेजन देणार) आणि स्पर्धक प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणार. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून, योग्य रीतीनं काम केलं तर हे स्पर्धेचं दुधारी शस्त्र कुणालाही गंभीर इजा करणार नाही.

 
- मधुवंती पेठे
[email protected]