जूनपासून शालेय वर्ष सुरू होते आणि एक एक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करता करता दिवाळीच्या सुट्टीनंतर वेध लागतात ते एका मोठ्या सांस्कृतिक सोहळ्याचे, म्हणजेच  वार्षिक स्नेहसंमेलनाचे. स्नेहसंमेलन म्हणजे मुलांच्या विविध गुणदर्शनाचा सोहळा.

एका दिवसाच्या या कार्यक्रमाची तयारी मात्र सप्टेंबरपासूनच आम्हाला सुरू करावी लागते. कारण पूर्व-प्राथमिक शाळेतली मुले लहान असल्यामुळे त्यांचा सराव दोन-तीन महिने आधीच सुरू करावा लागतो. नाच बसवताना ते गाणे आधी सतत त्यांना ऐकवावे लागते. सध्याच्या काळात सगळ्यांच्या घरी संगणक, लॅपटॉप असल्यामुळे मुले गाणी सतत ऐकत पाहत असतात. परंतु १९८०-९० च्या दशकात नाच बसवायचा म्हणजे टेपरेकॉर्डवर गाणे स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करावे लागे. मग सरावाच्यावेळी ते मुलांना ऐकवून त्यावर नाच बसवला जाई. काही वेळा शिक्षिकेला प्रत्येक वेळेस गाणं म्हणून त्यावर नाचाचा सराव घ्यावा लागत असे. सरावाच्या वेळी छान नाचणारी मुले कार्यक्रमाच्या दिवशी स्टेजवर चढली की वेगळे वातावरण पाहून रडू लागत किंवा स्टेजवर न नाचता नुसती उभीच रहात.

साखरवाडीसारख्या छोट्या गावातील शाळेचे स्नेहसंमेलन हे पूर्व-प्राथमिकपासून दहावीपर्यंतच्या सगळ्या मुलांचे एकत्रित रात्री ८ वाजता सुरू होत असे. उघड्या मैदानावर असणाऱ्या स्टेजसमोर गावातील सर्व लहानथोर मंडळी मुलांचे कार्यक्रम पाहण्यासाठी येत असत. स्टेजच्या मागे मोठ्या मुलामुलींचा वावर आणि समोेर प्रेक्षक म्हणून बसलेले आई-बाबा, आजी-आजोबा वैगरे मंडळी बघून आमची मुले थोडीशी बावरून जात असत. मग त्यांना समजवावे लागे की तुम्ही छान नाच केला की सगळे टाळ्या वाजवणार आणि तुमचे छान फोटो पण काढणार. सगळ्याची समजूत काढून विंगेत उभी केलेली मुले ओळखीच्या गाण्याचे सूर पेटीवर वाजू लागले की सराईतपणे स्टेजवर एन्ट्री करून शिकवल्याप्रमाणे छान नाच सादर करत असत. नाच झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि आनंद पाहिला की, आतापर्यंतच्या मेहनतीचा थकवा दूर पळून जाई.

नुसता नाच बसवला म्हणजे शिक्षिकेचे काम संपत नाही. त्या नाचाला अनुसरुन ड्रेपरी आवश्यक असते. पूर्वी दुकानात जाऊन त्या ठरावीक रंगाचे फ्रॉक, शर्ट-पॅन्ट निश्चित करून मग ते पालकांना खरेदी करण्यास सांगितले जाई. काहीवेळेस शाळांचे नेहमीचे शिंपी येऊन नाचांना साजेसे कपडे शिवून आलेत का? आणि मुलांना नीट बसतात का हे सुद्धा शिक्षिकेला पाहावे लागते. त्याच्याबरोबर मोजे, मुलींचे हेअरबॅन्ड, माळा याबद्दलच्या सूचनाही पालकांना द्याव्या लागतात.

लोकनृत्य बसवले असेल तर त्याला अनुसरून वेगळी ड्रेपरी करावी लागते. एके वर्षी मी डोंबारीनृत्य बसवले होते. तेव्हा सगळ्या मुलींना पाचवारी साड्या दुमडून नऊवारी साड्या नेसवल्या होत्या. सगळीकडे पिना लावून साडी ऐनवेळेस सुटणार नाही, पायात येणार नाही याची काळजी घेतली होती. आता नऊवारी साड्या शिवलेल्याच मिळतात.

पूर्व-प्राथमिकची मुले असली तरी नियोजनानेच ती एका विंगेतून स्टेजवर प्रवेश करतील, आपला नाच सादर करतील आणि दुसऱ्या बाजूच्या विंगेतून बाहेर जातील हेही त्यांना शिकवावे लागते व त्याचा त्याप्रमाणे सरावही घ्यावा लागतो.

स्टेजची ओळख होण्यासाठी कार्यक्रमाआधी तीन चार दिवस त्यांचा सराव प्रत्यक्ष त्याच स्टेजवर घ्यावा लागतो. मुलांना स्टेजवरच्या जागेचा अंदाज द्यावा लागतो. काहीवेळेेस फुल्या, गोल आखून त्यांच्या जागा सांगाव्या लागतात. मोठ्या गटातील मुलांना रंगीत तालमीसाठी स्टेजवर नेले की ते बरोबर सांगतात ताई आम्ही छोट्या गटात असताना इथे नाच करायला आलो होतो.

रंगीबेरंगी कपडे घालून, गालांवर रुज, ओठांवर लिपस्टिक लावून आलेली ही मुले कार्यक्रम तर छान सादर करतातच आणि आपल्या नाचाचे निवेदनही आत्मविश्वासाने करतात.

ईशस्तवनाने सुरू झालेला हा सोहळा पसायदान म्हणून संपल्यानंतर पालक, पाहुणे आणि कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले सर्व मान्यवर जेव्हा आम्हा शिक्षिकांचे आणि आमच्या मुलांचे कौतुक करतात, तेव्हा या सोहळ्यासाठी सर्वांनी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले असे वाटते आणि पुढच्या वर्षी नवीन काय कार्यक्रम बसवता येईल याचे विचारचक्र मनात सुरू होते.

 

- हर्षाली अवसरे

 [email protected]