काल खूप दिवसानंतर शाळेत गेले होते. उन्हामुळे जाताना तोंडाला स्कार्फ बांधला होता. जशी शाळेच्या पहिल्या आणि मुख्य गेटपाशी आले, तेव्हा तोंडावरच्या ओढणी बरोबरच बाहेरच्या जगात वावरताना लावलेले असंख्य मुखवटे मी उतरवले अन जशी आहे, तशी जशी होते तशी अगदी मोकळ्या आणि निर्मळ मनाने माझ्या शाळेत पाऊल टाकलं.
 
आपल्या आयुष्यात अशी ठिकाणं खूप कमी असतात जिथे आपण जसे आहोत तसे वागू शकतो... घराशिवाय अशा जागा इतरांना क्वचितच मिळतात. मी किंवा आमच्या शाळेत शिकणाऱ्या आम्ही मुली त्या बाबतीत खूप भाग्यवान आहोत; कारण आजही शाळेत गेलो की आम्हाला ती आमची वाटते. शाळेतले काही शिक्षक निवृत्त झाले काही नवीन आले पण तरी ते परके वाटत नाहीत. आमचे वाटतात; माझे वाटतात. 
 
काल ही अशीच स्वछंद होऊन शाळेत प्रवेश केला आणि समोर मोकळे गवतात सोडलेले घोडे दिसले. सकाळ असल्याने कदाचित त्यांनाही मोकळेपणाने वावरायला सोडले होते. त्यातले काही घोडे नवीन होते मी शाळेत असताना ते इथे नव्हते पण तरीही त्यांच्याबद्दल आपुलकी वाटायची मात्र राहिली नाही. नंतर अश्वरोहणाच्या मैदान शेजारून जाताना जाणवले की ते मैदानही आता खूप सुधारलं आहे. त्याचं नुतनीकरण केलं आहे. बघून छान वाटले. मग चालत जाताना आमच्या प्रिय शिक्षकांची घरे दिसली. मग मनातल्या मनात कोणतं घर कोणाचं याची जुळवाजुळव करत चालत राहिले. त्या घरांशीही आमच्या असंख्य आठवणी जोडल्या आहेत. खरं तर आमच्या शाळेशीच आमचं आयुष्य जोडलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तिथून पुढे आले ते शाळेच्या मैदानापाशी. बास्केटबॉल आणि व्हॉलिबॉलचे ते मैदान आणि तिथेच होणारे 'हाऊस वाईज गेम्स' त्यांचे आणि आमचे एक वेगळं आणि मस्त नातं होतं. 3 दिवस हाऊस वाईज गेम्स म्हणजे 3 दिवस शाळेला सुट्टी आणि मोजता येणार नाही एवढी मजा. लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या रंगाचे घामाने आणि मातीने माखलेले टीशर्ट्स आणि लक्ष्मी, जिजामाता, अहिल्या आणि तारा या नावांचा आसमंतात दुमदुमणारा गजर... एक वेगळंच चैतन्य असायचं त्यात. कदाचित एकी, एकीचं बळ, लढा या गोष्टी आम्ही त्यातूनच शिकत गेलो असू. मैदानावरचे गेम्स पिरियड जेवढा आवडायचा तेवढंच सकाळची पी.टी. आम्हांला नको असायची. पावसाळ्यात तर कधी एकदा जोरदार पाऊस येतोय आणि आमची पी.टी. रद्द होतीये याची आम्ही वाट पाहायचो. आम्ही पी.टी.ला जेवढा चमका द्यायचा प्रयत्न करायचो तेवढाच पाऊस आम्हाला चमका द्यायचा. ५ वाजेपर्यंत जोरदार कोसळणारा पाऊस ५. ३० वाजले की गजर झाल्यासारखा उघडायचा. तेव्हा आम्ही पावसाला किती नाव ठेवली असतील ते त्यालाच माहिती. पण एकदा पी.टी.ला गेलो की मजाही तेवढीच यायची. सकाळच्या थंडीत बॉडी गरम करण्यात मजाच काही और होती.
 
तशीच पुढे चालत गेले तर आमच्या डॉरमेटरीज आणि त्याची मडकी दिसली. बाकी ठिकाणी प्रचलित असलेला गॅलरी हा शब्द आमच्या इथे कोणालाच माहिती नव्हता. आम्हाला माहिती होतं ते फक्त आमचं मडकं. जिथे आम्ही तासंतास बसायचो. बेस्ट फ्रेंडचे ऐकत असायचो, मैत्रीचे उपदेश देत असायचो. बाकी आमची डॉरमेटरी म्हणजे आमचं घर होतं. जिथं आमच्या मैत्रीत आम्ही सगळी सुखं-दुःख मोकळेपणाने सांगून मस्त आयुष्य जगत होतो. घरापासून दूर होतो पण शिक्षक, मेट्रन आणि मैत्रिणीच्या सहवासामुळे आमच्या आयुष्याला पूर्णत्व येत गेलं आणि मडक्यात बसून आमच्या मनाच्या आणि शरीराच्या मातीच्या गोळ्याला सुंदर आकार येत गेला. पुढे आमचा मल्टी पर्पझ हॉल दिसला. जिथे आम्ही खूप घाम गाळून काम केलं होतं. कधी कराटेमुळे कधी नाटकासाठी, कधी उद्योजक मेळा, कधी गॅदरिंग, तर कधी एखादं एक्सिबिशन किंवा प्रोजेक्ट्स. रिकामा वेळ म्हणजे सैतानाचं घर असं म्हणतात. त्यामुळेच कदाचित शाळेत एवढे उद्योग असायचे की आमचं डोकं कधी रिकामं राहिलंच नाही. कधी शाळा आम्हांला उद्योग द्यायची तर कधी आम्ही शाळेचे उद्योग वाढवून ठेवायचो... पण त्या सगळ्यात ही एक मजा होती. Understanding होतं. 
 
पुढं समोर आला तो आमचा राजपथ... ज्यावर अगदी१२ ऑगस्टपासून आम्ही मार्किंग करत असायचो. सलग चार-पाच दिवस रोज हे मार्किंग करायचो. हॉल सजवायचो. ड्रिलबरोबर मार्किंगमधून शिस्तीचे धडे आपण गिरवतोय हे मात्र तेव्हा कधीच कळलं नाही. पण घडलं मात्र खरं. मग शाळेच्या इमारतीत पाऊल टाकलं. आम्हाला इमारतीत पाऊल टाकताना शाळेला वाकून नमस्कार करायची सवय होती... कदाचित शाळेतली प्रत्येक मुलगी ते करायची. कालही तेच केलं. क्षणभर डोळे मिटले आणि मनोमन शाळेला धन्यवाद दिले. कशासाठी ? नाही माहिती. कदाचित त्या सगळ्यासाठी जे मला आजवर माझ्या शाळेमुळे मिळालंय. मग आत जाऊन सगळ्या शिक्षकांना भेटले. ते सगळे तेवढेच मोकळे होते जेवढे वर्गात आम्हाला शिकवताना असायचे. जिंकल्यावर शाबासकीची थाप देणारे आणि चुकल्यावर कान पिरगळणारे... पण त्यात ही छान वाटायचं. कोणी किती ही ओरडलं तरी त्यांच्याबद्दल कधी मनात राग नसायचा; आजही नाही. उलट आता त्या कान पिरगळण्याचे, मारण्याचे फायदे कळतात आणि मुलासारखी माया करणारे आपले शिक्षक आपल्यासाठी देवदूत होते की काय असं वाटतं. कारण एवढी आपुलकी असणारे शिक्षक प्रत्येकाला मिळत नाहीत. काल अशीच सगळ्यांना भेटले. शिक्षक म्हटल्यावर अभ्यास कसा चालू आहे असा प्रश्न सहसा बाकी ठिकाणी शिक्षक विचारतात. पण काल मात्र मला भेटलेल्या एकाही शिक्षकाने हा प्रश्न विचारला नाही; विचारलं ते तुझं लिखाण, नाटक किंवा एक्सट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कशा चालू आहेत याबद्दल...एन.सी.सी., एन.एस.एस. याबद्दल... म्हणजे खरं तर माझ्यातल्या खऱ्या गायत्रीबद्दल. वाटलं इथला प्रत्येक जण आपल्याला एवढा चांगला कसा ओळखतो. नाही माहिती; पण ओळखतो. म्हणूनच मी तिथे गेले की जशी आहे तशी आणि मनमोकळी असते. मग सगळ्यांना भेटून पुन्हा निघाले. आले त्याच मार्गाने. येता येता पुन्हा अश्वरोहणाचं मैदान दिसलं. वाटलं जसं त्याचं नुतनीकरण झालंय तसंच आज इथे येऊन आपल्याला पुन्हा नवीन ताकद मिळाली आहे. तेवढीच जेवढी शाळा सोडून कॉलेजला जाताना मिळाली होती. आता पुन्हा जाईन १४ तारखेला नाशिकला पण फक्त मी आणि माझे सामान नसेल तेव्हा; तेव्हा असेल शिदोरी...नव्या उमेदीची... नव्या जगण्याची...
धन्यवाद!
                                  
                          गायत्री जोशी