सुशांत नववीतला एक हुशार, सर्वगुणसंपन्न मुलगा. अभ्यास, छंद, खेळ या सगळ्यातच कायम अव्वल. पण नववीत आल्यापासून सुशांतची गाडी रुळावरून जरा घसरायला लागली. चाचणी परीक्षेत त्याला बरेच कमी मार्क मिळाले. ही गोष्ट त्याने इतकी मनाला लावून घेतली की, त्याचं इतर छंद, खेळ यांमधूनही मन रमेनासं झालं. परिणामी, कशातच सहभागी न होणं, मागे मागे राहणं, चिडचिड करणं असे त्याच्या वागण्यातले बदल दिसू लागले. समुपदेशनादरम्यान त्याच्या अशा वागण्यामागचं कारण हळूहळू लक्षात येऊ लागलं. ते कारण म्हणजे त्याचं स्वत:चं चोवीस तासांचं गणित बिनसलं होतं. शाळा, क्लास, छंदवर्ग, खेळ या सगळ्यांमधून अभ्यासासाठी वेळ देता येईनासा झाला. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं याचा प्राधान्यक्रम ठरवता न आल्याने सुशांत अभ्यासाला न्याय देऊ शकत नव्हता.

मुलांनो, सुशांतसारखीच अवस्था तुमचीही होत असेल, तर मात्र आपल्याला वेळेचं नियोजन करणं आवश्यक आहे. ‘निश्‍चयाचा महामेरू’ या मागील लेखात आपण इच्छाशक्तीचं महत्त्व जाणलं, पण इच्छेला योग्य वळण तेव्हाच मिळतं, जेव्हा आपल्या हातात असलेला वेळ आपण नेमकेपणाने वापरतो. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येणार नसते. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा पुरेपूर वापर करणं, हे नक्कीच फायद्याचं ठरतं. Those who fail to plan, they plan to fail असा एक सुविचार आहे. म्हणजेच, जे लोक वेळेचं नियोजन करत नाहीत, ते त्यांच्या अपयशाचं नियोजन करत असतात. तेव्हा मुलांनो, वेळीच जागे व्हा आणि मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा.

एकदा का आपलं ध्येय ठरलं की, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या 24 तासांचं नियोजन पक्क असावं लागतं. अभ्यासाच्या बाबतीत वेळचं नियोजन का बरं इतकं महत्त्वाचं आहे. कारण -

1) नियोजनामुळे कोणत्या विषयाचा अभ्यास कधी करायचा हे स्पष्ट होतं. 2) अभ्यासाचा वेग वाढतो. 3) नेमका किती अभ्यास करावा लागेल, याची व्याप्ती लक्षात येते. 4) एकाग्रता वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे ‘मी अभ्यास वेळेत पूर्ण करू शकेन, याबाबत आत्मविश्‍वास वाढतो. चला तर मग, घ्या वही, पेन आणि नियोजन करा. नियोजन करताना पुढील मुद्दे मात्र जरूर विचारात घ्या.

1) 24 तासांची विभागणी करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करता व किती वेळ करता हे लिहून काढा.

2) शाळा, क्लास, खेळ, छंदवर्ग, टी.व्ही., गप्पा, मोबाईल, या सगळ्यांतून आपल्याला रोज 2 ते 3 तास वेळाचे स्वयंअध्यनासाठी मिळायला हवे. ते कसे मिळू शकतील यावर विचार करा.

3) ताजेतवाने असताना अवघड विषयाचा अभ्यास करा.

4) नियोजन करताना फक्त पाठांतर करणे, या एकाच प्रकाराने अभ्यास करू नका तर निबंधलेखन, व्याकरण, वाचन, नकाशावाचन, प्रयोग, पत्रलेखन, सारांशलेखन, गणित सोडवणे इ. विविध प्रकाराने अभ्यास करा. जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला बसल्यावर कंटाळा येणार नाही.

5) सलग 2तास अभ्यासाला बसणे शक्य होणार नसेल; तर 1-1 तास अभ्यास करा. 1तासानंतर 5 ते 10 मि. ची विश्रांती जरूर घ्या.

6) प्राधान्यक्रम ठरवा. उदा., सहामाई परीक्षा 15 दिवसांवर आली आहे आणि त्यादरम्यान तुमची छंदांशी संबंधित एखादी स्पर्धा आहे.  अशा वेळी कशाला महत्त्व द्यायचं, हे तुमचं तुम्हाला ठरवावं लागेल. जो निर्णय तुम्ही घ्याल, त्याच्या परिणामांची जबाबदारीही तुम्हाला घ्यावी लागेल.

7) स्वयंअध्ययन म्हणजे केवळ गृहपाठ पूर्ण करणे असे नाही; तर परीक्षेच्या दृष्टीने तो धडा, विषय समजून घेणे होय.

8) दिवसभरात 2 किंवा 3 विषयांचाच अभ्यास करण्याचे नियोजन करा. एका दिवसात सगळेच विषय घेऊन बसलात,  तर एक ना धड... अशी अवस्था होऊ शकते.

9) नियोजनामध्ये ‘मनन’ करण्यासाठी आवर्जून वेळ ठेवा. जो अभ्यास केला, तो आठवून बघणे म्हणजे ‘मनन’ होय.

10) एवढे सगळे मुद्दे लक्षात घेऊनही अभ्यास नियोजनानुसार होत नसेल, तर निराश न होता त्यातील उणिवा शोधा. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. वेळ नेमका कुठे वाया जातोय? कोणाबरोबर वाया जातोय? किती वेळ वाया जातोय. याचा ताळमेळ लावा. उदा., आदित्य अभ्यासाला बसला नेमका त्याच वेळी त्याचा मित्र खेळायला बोलावयला आला. प्राधान्य ठरवता न आल्याने आदित्य खेळायला गेला. अर्धा तासच खेळणार, असं ठरवून गेलेला आदित्य दोन तासांनी घरी आला. या उदाहरणात आदित्यचा एकूण  दीड तास वेळ वाया गेला. मित्राबरोबर खेळण्यात हा वेळ वाया गेला. हे कळल्यावर आदित्यने दुसर्‍या दिवशी मात्र त्याच्या मित्राला ठामपणे नकार दिला. स्वत:चा अभ्यास झाल्यावर मगच तो खेळायला गेला.

नियोजन करताना वरील मुद्दे लक्षात घेतल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. फक्त नियोजन करून थांबायचे नाही ,तर त्याची प्रामाणिकपणे आणि सातत्याने अंमलबजावणी करायची आहे. हे काही तुम्हाला वेगळे सांगायला नको.

 इच्छाशक्तीचं महत्त्व जाणून घेऊयात खालील लिंकवर

निश्‍चयाचा महामेरु

 

 -रश्मी पटवर्धन
[email protected]