पुस्तकात रमताना...

दिंनाक: 21 Nov 2017 15:07:16


उडाणपूर नावाचं छोटंसं गाव होतं. त्या गावात दिनूआबा नावाचे शेतकरी गृहस्थ राहत होते. दिनूआबा शेतकरी असले तरी साऱ्या कामात पारंगत होते, पण लहानपणी अभ्यास केला नाही, शिकलो नाही याची खंत सतत त्यांना बोचत असायची. आणि म्हणून आपली मुलगी शिकेल, मोठी अधिकारी होईल असं त्यांच स्वप्न होतं. त्यांच्या मुलीचं नाव होतं पारू. पारू ही खूप गोड आणि तितकीच हुशार मुलगी. आपल्या बाबांना काय आवडतं तिला अचूक कळायचं. त्यांचं स्वप्न पूर्ण करावं असं तिला नेहमी वाटायचं आणि म्हणून पारू मन लावून अभ्यास करायची. एके दिवशी पारू असंच पुस्तक वाचत बसली होती. शेतातून आलेल्या आबांनी मुलीला पुस्तक वाचताना पाहिलं आणि तिच्याजवळच पायरीवर बसले.. दिनूआबा शिकलेले नसले तरी आपल्या मुलीच्या शिक्षणाकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. तिच्या हातातलं ते पुस्तक पाहून दिनूआबांनी विचारलं, "अगं, हे कोणतं पुस्तक आहे? ते तर तुझ्या शाळेत मिळालेलं अभ्यासाचं पुस्तक दिसत नाही."  पारू म्हणाली, "आबा, हे गोष्टींचं पुस्तक आहे." 
"पोरी, या पुस्तकानं तुझा अभ्यास थोडीच होणार आहे? कशाला हे? आणि परीक्षेत नापास झालीस तर? त्यापेक्षा अभ्यास कर." आबा काळजीच्या स्वरात हे पारूला सांगत होते. पारूला आबांना काय म्हणायचं ते कळलं होतं कारण बाईंनी तिच्या हातात हे पुस्तक ठेवलं, तेव्हा तिलाही हाच प्रश्न पडला होता. पारू म्हणाली, "आबा, तुमचं म्हणणं अगदी खरंय पण एक सांगू का?" पारू आबांना आवडेल अशा उदाहरणानेच तिची बाजू मांडू लागली. "आबा, तुम्ही आधी शेतात पिकाची पेरणी करता बरोबर ना?" आबा म्हणाले, "हं, बरोबर."  पारू पुढे सांगू लागली, "मग आमच्या शाळेतही आधी पुस्तकातला अभ्यास शिकवतात. मग शेतात तुम्ही नंतर काय करता हो आबा?" 
आबा म्हणाले, "पिकांना पाणी घालतो आणि मध्ये तण आले तर ते काढतो.." 
"मग तसंच आमच्या बाईही शिकवलेल्या अभ्यासावर आमच्या चुकांची दुरुस्ती करून मार्गदर्शन करतात आणि त्यानंतर...." पारू सांगत होती. "त्यानंतर काय?" आबांनी विचारले. "आबा, एवढी मेहनत करून पीक येतच ना, मग आपण शेतात पिकाला खत लावतो, ते का बरं?" पारूनं विचारले. आबा सांगू लागले, "अगं पोरी, खत नाही लावलं तर चांगलं पीक कसं येईल, उत्पन्न कस वाढेल?" "मग आबा अगदी तसंच.. ही वेगळी पुस्तकं वाचणं म्हणजे आपल्या बुद्धीला दिलेलं खतच आहे, या पुस्तकामुळेच तर आपल्या ज्ञानात अधिक भर पडेल आणि नवीन जगाशी आपली ओळख होईल.. आमच्या बाई म्हणतात, "तुमच्या बुद्धिरूपी पिकाला या अशा पुस्तकरूपी खताची खूप गरज आहे.." हे सारं पारू सांगत होती.. पारूचं हे बोलणं आबा मन लावून ऐकत होते. चिमुकल्या पारूच्या तोंडातून निघालेला शब्द नि शब्द आबांच्या लक्षात येत होता. आता आबांना वाचनाचं महत्त्व कळून चुकलं होतं. "उद्या खतं घ्यायला जिल्ह्याच्या गावी जायचयं बघ, तिथून तुलाही आणखीन गोष्टींची पुस्तकं आणून देतो." असं म्हणतंच आबा पायरी चढून घरात गेले. पोरीच्या शहाणपणाचं अपार समाधान त्यांच्या डोळ्यात दिसत होतं.. आबांच्या बोलण्याने पारूचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता.. पुस्तकांचा खजिनाच तिला मिळणार होता..आता पारू पुन्हा आपल्या पुस्तक वाचनात रममाण झाली होती.....

 

- भाग्यश्री कारभारी शिंदे

 [email protected]