मित्रांनो, बालदिनानिमित्त सुरू केलेल्या ‘ओळख बालसाहित्यिकांची’ या सप्ताहातील शेवटच्या लेखात जाणून घेऊयात ज्येष्ठ साहित्यिक ल.म. कडू यांच्याविषयी...

आपल्या लेखन आणि चित्रकलेच्या माध्यमातून चिमुकल्यांचे भावविश्‍वाचे दर्शन घडवणार्‍या ल.म. कडू यांना यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या ‘खारीच्या वाटा’ या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आला.

नेहमीच मुलांना केंद्रस्थानी ठेवून साहित्य निर्मिती करणार्‍या ल.म. कडू यांनी आजपर्यंत तीसपेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. लहान मुलांचे भावविश्‍व जाणून घेत लिहिणारा लेखक, चित्रकार आणि प्रकाशक म्हणून ते सर्वत्र परिचित आहेत.

आज बालसाहित्यिक म्हणून नावाजलेल्या लक्ष्मण महिपती कडू यांचं शालेय शिक्षण एका दुर्गम खेड्यात झाले. एका शिबिराच्या निमित्तानं त्यांनी पुणे शहरात प्रवेश केला. सुरुवातीला बुजरा, संकोची स्वभाव बदलून एक नवा आत्मविश्‍वास त्यांना या शिबिरातून मिळाला. पुढे डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याची इच्छा असल्याने त्यांनी बी.एससी.ला प्रवेश घेतला; पण एका अपघाताने त्यांचे एक वर्ष वाया गेले.

लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्याने त्यांनी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्यांना शिक्षणाबरोबरच कामाचाही अनुभव मिळत गेला. कुठेही नोकरी करायची नाही हे त्यांनी आधीच ठरवलं होते. चित्रकार म्हणून त्यांनी व्यवसायास सुरुवात केली. १९७०च्या सुमारास मुलांसाठी त्यांनी बालनाट्य करण्यास सुरुवात केली. बालनाट्य सादर करताना त्यांनी खूप वेगवेगळे प्रयोग करून पाहिले, पण पुढे वेळेअभावी त्यांनी बालनाट्य करणे बंद केले.

मुलांसाठी असे वेगवेगळे प्रयोग करत असताना ते एकीकडे कथालेखनही करत होते. अनेक दिवाळी अंकात त्यांनी कथा लिहिल्या. त्यांच्या ‘झाड’ या छोटेखानी पुस्तकाची सर्वत्र दखल घेतली गेली. सतरा ते अठरा ओळींचे हे पुस्तक मुलांच्या सोयीकरिता त्यांनी मराठी-इंग्रजी या दोन्ही भाषेत (द्विभाषिक) प्रकाशित केले.

मुलांना, त्यांच्या जगातल्या गोष्टी मिळाव्यात, पुस्तकातील गोष्टी त्यांना आपल्याशा वाटाव्यात अशा पुस्तकांची निर्मिती आपण केली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. म्हणूनच १९७९ साली त्यांनी ‘गमभन’ प्रकाशन संस्थेची स्थापना केली. मुलांसाठी चांगली पुस्तके प्रकाशित करणे हाच या प्रकाशन संस्थेचा उद्देश. पूर्वी प्रकाशित झालेल्या साहित्यातील काही निवडक साहित्य त्यांनी या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून नव्या रूपात मुलांसमोर मांडले. राम गणेश गडकरी यांचे ‘चिमुकली इसापनिती’, बालकवींनी भाषांतरीत केलेले ‘निसर्गाची जादू’ हे गद्य त्यांनी प्रकाशित केले. कवी यशवंत यांच्या ‘मोतीबाग’ पुस्तकाची दुसरी आवृत्ती त्यांनी काढली.

शहरी भागातील मुलांबरोबरच ग्रामीण भागातील मुलांचा विचार करून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. सर्व भागातील, स्तरातील मुलांचा विचार करून त्यांनी आदिवासी मुलांसाठी ‘आदिवासी बालगीतं’ हे पुस्तक काढले. ‘खारीच्या वाटा’ या कादंबरीत त्यांनी संपूर्ण ग्रामीण जीवन मुलांसमोर मांडले. ग्रामीण भागातील निसर्ग हे एक ‘व्यक्तिमत्व’ म्हणूनच आपल्या समोर येते. दोन मित्र त्यांचं गाव, शाळा, गावची नदी, आजूबाजूचा परिसर, त्यांनी पाळलेली लुकी नावाची खार, त्या तिघांची जमलेली गट्टी आणि रानावनात त्यांनी केलेली धम्माल ‘खारीच्या वाटा’मधून शहरातील मुलांनाही अनुभवयास मिळते. फक्त बाल, किशोर नाही; तर सर्वच वाचकांना भावेल अशी ही कादंबरी.

लहान वयात जे रुजते ते मुलांच्या पक्के लक्षात राहते. ल.म. कडू यांनी अगदी शिशू गटातील मुलांना समजतील त्यांना भावतील अशा पुस्तकांचे लेखन केले. ‘सईची चांगली सवय’, ‘रावीचा मोर’ अशी दैनंदिन आयुष्य आणि निसर्गाशी निगडित त्यांची पुस्तकं छोट्या दोस्तांच्या पसंतीस पडली. पिंटू आणि बेडूक आजोबा यांसारख्या अनेक बालकथा पुस्तकांचं लेखनही त्यांनी केले. मुलांना सतत काहीतरी नवीन करायचे असते. त्यांच्या हाताला सतत काहीतरी काम हवे असते हेच लक्षात घेऊन त्यांनी जाणीव-जागृती-जिज्ञासा यांसारखी दहा-पंधरा पानांची छोटी, ज्यातून मुलांना माहिती बरोबरच कृतीही करता येईल अशा पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. या पुस्तकांतील चित्रही स्वत: रेखाटली.

बालसाहित्याचा विचार करताना प्रथम भाषा, नंतर रेषा आणि शेवटी दिशा याचा विचार व्हावा, असा आग्रह धारणार्‍या ल.म.कडू यांनी अनेक पुस्तकांसाठी चित्रे व मुखपृष्ठ साकारली आहेत. मुलांना पुस्तकातील गोष्टी आपल्या जवळच्या वाटायला हव्यात; म्हणून मुलांसाठीचे कोणतेही पुस्तक करताना चित्र व मुखपृष्ठ यात तडजोड करू नये असं ते सांगतात.

आपल्या साहित्यकृतीतून मुलांना प्राणी, पक्षी, झाडं यांच्याजवळ नेले. मुलांना कला, पर्यावरण, निसर्ग यांचे प्रत्यक्ष अनुभव घेता यावेत म्हणून ते विविध प्रयोग करत आहेत. निसर्गातील ही समृद्ध संपत्ती कशी आहे? ते फक्त वाचून कळणार नाही; तर त्यांचा प्रत्यक्ष अनुभव मुलांना घेता आला पाहिजे. मुलांना असे अनुभव प्रत्यक्ष जगता यावेत म्हणून त्यांनी गमभन प्रकाशन संस्थेतर्फे पुण्याजवळच विद्याविहार प्रकल्प सुरू केला. शहरापासून दूर पानशेत धरणाजवळ त्यांनी एक छोटे जंगलच तयार केले. ज्यात अनेक प्रकारची दुर्मीळ झाडे, पक्षी तसेच रोजच्या आहारातील भाज्या, अन्नधान्ये कशी पिकतात हे मुलांना जवळून पाहता येते.

मुलांचे भावविश्‍व उलगडत, त्यांच्या भावविश्‍वातील वास्तव अनुभव देत आज वयाच्या ७२व्या वर्षीही ल.म. कडू छोट्या दोस्तांसाठी कार्यरत आहेत.

- रेश्मा बाठे 

[email protected]