सुपरहिरो

दिंनाक: 18 Nov 2017 15:15:57


“अशा आयडिया येतात कुठून रे बाईंना एकदम मॅड...”, इतक्यात मला समोर बघून आराध्य थबकला. तितक्याच शिताफीने वाक्य बदलून तो म्हणाला “माईंड ब्लोईंग आहेत बाई. अरे काकू आल्या. चला.”

मुलांना शाळेतून आणायला जायला मला दहा मिनिटे उशीरच झाला होता. आराध्य, श्रेयस, सौम्या आणि माझी लेक अनन्या ही आमची चांडाळ चौकडी शाळेच्या गेटवर उभी राहून वाट बघत होती.

श्रेयस आणि सौम्या ही जुळी भावंडे. आम्ही सगळे एकाच सोसायटीत राहत होतो. चौघेही जण एकाच वर्गात – सहावीत होते. मुलांची जानी दोस्ती होती. त्यांच्यामुळे आम्हा आयांच्यात ही दोस्ती होती.

गाडी सुरू केल्यावर मी म्हटले,

“काय आराध्य, काय माईंड ब्लोईंग आयडिया दिली आज नवाथे बाईंनी”

आराध्य  म्हणाला, “काकू पुढच्या सोमवारी शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे. एक आठवडा आहे हातात. थीम आहे सुपरहिरो”

“पण मुळात फॅन्सी ड्रेस करायचाच नाही आहे.” – श्रेयस.

“कारण नवाथे बाईंच्या डोक्यात काहीतरी माईंड ब्लोईंग आयडिया आहे.” आराध्य वैतागला होता.

माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून माझी लेक म्हणाली, “अगं आई, आम्हाला कोणत्यातरी एका सुपरहिरो बद्दल बोलायचे आहे. म्हणजे आम्ही सुपरहिरो बनणार आहोत पण..”

“कॅप घालायची नाही, टोपी घालायची नाही, जादूची छडी वापरायची नाही, जादू करायची नाही, इतकेच काय तर सुपरपॉवर ही वापरायची नाही.” सौम्याने नवाथे बाईंची अगदी सहीसही नक्कल केली आणि आम्ही सगळे खळखळून हसू लागलो.

मुलांच्या नवाथे बाईं म्हणजे अगदी अजब रसायन होत्या. एखादी कल्पना मुलांना शिकवायची असे त्यांनी ठरवले की अगदी हात धुवून मागे लागत. मग त्यासाठी वेगवगळ्या युक्त्या लढवत. हातात पुस्तक घेऊन शिकवलेले त्यांना कधी कोणी पाहिले नव्हते. त्यांचा वर्ग म्हणजे मुलांना वैचारिक खाद्य असे. त्या अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. आता या क्षणी मात्र मुलांना नवाथे बाईंची कल्पना पसंद पडलेली दिसत नव्हती.

“सुपरपॉवर शिवाय कधी सुपरहिरो असतो का? मूर्खपणा आहे सगळा. मी तर भागच घेणार नाही या फुटकळ स्पर्धेत.” अनन्याने घरात शिरता शिरता जाहीर करून टाकले. नंतर दिवसभर माझ्या डोक्यात सुपरहिरोच होता. रात्री झोपताना सहज टीव्ही लावला. टीव्हीवर फास्टर फेणे या आगामी चित्रपटाचे प्रमोशन सुरु होते. ते पाहता पाहता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कॅप न घालणारा, सुपरपॉवर नसणारा तरीही सुपरहिरो. फास्टर फेणे हा माझ्या लहानपणीचा संवंगडी. माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून मला नेहमी पुस्तकांचा संच मिळायचा. त्यात बऱ्याचदा फास्टर फेणे असायचाच. बोक्या सातबंडे असायचा. चिंगी आणि गोट्या ही असायचे. चाचा चौधरी आणि साबू असायचा. ठकठक, चंपक, चांदोबा या साऱ्यांतून कितीतरी सोबती भेटायचे. असेच काहीबाही लहानपणीचे आठवत आठवत मी झोपी गेले. सकाळी उठल्यावर विचारांची मालिका पुन्हा सुरू झाली. आज माझ्या अनन्याला असे खेळसोबती नाहीत. फास्टर फेणे हा पुस्तकावर आधारित चित्रपट आहे हे तिला माहितही नाही. या मुलांची सुपरहिरो ही कल्पनाच बदलली आहे. चित्रविचित्र कपडे घालणारे, कल्पनेपलीकडची सुपरपॉवर असणारे, उठसूट जिवावरच्या संकटांशी लढणारे यांचे सुपरहिरो.

 “आजकाल इतकी दर्जेदार पुस्तके आहेतच कुठे?” मी स्वतःशीच म्हटले.

“तू शोध घेतलास? नाहीतर तुझ्या लहानपणीची पुस्तके तिने वाचावी याचा प्रयत्न केलास?” माझ्या मनाने मला प्रश्न केल्यावर मात्र मी दचकले.

त्याच दिवशी मी आराध्यच्या आणि श्रेयस – सौम्याच्या आईला एकत्र बोलावून चर्चा केली. मराठी साहित्यात बालसाहित्याचा इतका अनमोल खजिना उपलब्ध आहे. आपल्या मुलांना जर ही पुस्तके माहीत नसतील, आवडत नसतील तर ती आपली चूक आहे असे आम्हाला वाटले.

दुसऱ्या दिवशी रविवार होता. आम्ही तिघी दर रविवारी संध्याकाळी एकत्र योग प्रशिक्षण वर्गासाठी जात असू. साधारण दोन तास वेळ जात असे. वर्गाच्या ठिकाणी मोबाईलची नेटवर्क रेंज अजिबात मिळत नसल्याने तेवढा वेळ संपर्क होऊ शकत नसे पण आम्हालाही काळजी नसे. या दोन तासात चारही मुले आराध्यच्या घरी थांबत. त्याच्या आजीआजोबांच्या संगतीत मुलांचा वेळ आनंदात जात असे. आम्ही नेहमीप्रमाणे वर्गासाठी गेलो. मुलेही आराध्यच्या घरी जमली. आज त्याची आजी एकटीच घरी होती. आजोबा काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते. आजीने आणि मुलांनी मिळून व्यापारचा खेळ खेळायला सुरुवात केली. खेळ रंगात आला आणि अचानक आजी जोरजोरात खोकू लागली.  आजीला दम्याचा त्रास होता. आराध्य लगेच आजीच्या खोलीत धावला. त्याने आजीचे इनहेलर घेतले आणि बाहेर येऊन आजीच्या हातात दिले. आजी कशीबशी म्हणाली,

“हे - रिकामे - आहे.”

“आराध्य यात औषध टाकावे लागेल? कुठे आहे औषध?” सौम्याने विचारले.

“कपाटात. पण कपाटाला टाळे आहे.” आराध्य घाबरून म्हणाला.

“आपण आजोबांना फोन करू लगेच.” श्रेयस ने सुचवले.

“आजोबा नेहमीप्रमाणे फोन न घेता गेले आणि आईचा फोन लागणार नाही”, आराध्य रडवेला झाला होता.

“पुढचे दोन तास” सौम्याने पुस्ती जोडली.

“औषध – आणावे - लागेल.” आजीची खोकल्याची उबळ वाढली होती.

“पण पैसे सुद्धा कपाटातच आहेत आणि कपाट तर बंद आहे.” आराध्यच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले.

“एक मिनिट थांब आराध्य. सौम्या, आजीला पाणी आणून दे. आपल्यालाच काहीतरी विचार करावा लागेल.” अनन्याने पुढाकार घेऊन सूत्रे हाती घेतली. “मी माझ्या घरून पैसे घेऊन येते.”

“थांब अनु. आराध्य तू पैसे साठवतोस तो डबा घेऊन ये पटकन”

आराध्य घाईने आत गेला आणि एक सशाच्या आकाराचा डबा घेऊन आला. आजी खोकल्याने कासावीस झालेली पाहून त्याला काहीच सुचेनासे झाले होते.

“याला पण टाळे आहे आणि चावी आईकडे आहे.” त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. “आता काय?”

आराध्य असे बोलेपर्यंत अनन्या आणि श्रेयसने तो डबा तोडला होता. त्यातले सगळे पैसे बाहेर काढले. हे बघून आराध्यला धीर आला. त्याने पटकन एक कापडी पिशवी आणली. सगळी नाणी त्यात जमा केली आणि म्हणाला,

“श्रेयस, चल मेडिकलमध्ये जाऊ.”

“आज रविवार आहे. सगळी मेडिकल बंद असणार. फक्त आपल्या शाळेजवळचे आयुरारोग्य मेडिकल सुरू असेल. ते २४ * ७ सेवा देते ना.”  सौम्या म्हणाली.

“काय वेळेवर सुचले तुला सौम्या! तुम्ही दोघे थेट तिकडेच निघा. सायकलने जा, पण जपून. गाड्या बघून सायकल चालवा. आम्ही दोघी थांबतो आजीजवळ”, अनन्याने आराध्यला आश्वस्त केले. आता आजीला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. पंधरा मिनिटांच्या आत दोघे परत आले तेव्हा घामाने निथळत होते. आजीने औषध घालून इनहेलर वापरले आणि ती पडून राहिली. आणखी पाच मिनिटे जातात न जातात तो दारावरची बेल वाजली. सौम्याने दरवाजा उघडला तर दारात आम्ही तिघी. आम्हाला बघताच मुलांनी एकच गलका सुरू केला. काय काय झाले हे चौघेही एकसाथ सांगू लागली. मुलांचे पूर्ण बोलून झाल्यावर मी म्हटले, “मुलांनो, तुम्ही सुपरहिरोचे काम केले बरे का?” चारी मुले प्रश्नार्थ नजरेने माझ्याकडे पाहत होती. “बघा पटतेय का? लहान लहान मुले अशा संकटात सापडली की तुमचा सुपरपॉवर वाला सुपरहिरो आकाशातून येतो आणि मदत करतो. मात्र तुमच्या बाबतीत असे काही घडणार नाही हे तुम्हाला माहीत होते, म्हणून तुम्ही स्वतःच सुपरहिरो झालात. कॅप, टोपी न घालता, जादूची छडी न वापरता.”

“कोणतीही गोष्ट घडली की त्यातून आपल्याला हवी तशी शिकवण देणे तुला कसे काय जमते आई?”, माझ्या लेकीने कौतुकाच्या स्वरात विचारले.

“उलट बोलते आहेस तू! मला ज्या गोष्टीची शिकवण द्यायची असते त्याला आवश्यक घटना मी घडवून आणते.”, मी मिस्कील हसत म्हणाले.

“म्हणजे?” इति सौम्या.

“म्हणजे आम्ही योग प्रशिक्षण वर्गावरून इतक्या लगेच परत कशा आलो हा प्रश्न तुम्हाला कसा पडला नाही.” मी विचारले.

“रोज घराबाहेर पडताना आजीचे इनहेलर दोन दोनदा तपासणारी आई आजच कशी विसरली? नेमके इनहेलर रिकामे असताना? आजच आजीकडे ही पैसे का नव्हते?” आराध्यच्या आईने विचारले आणि आराध्यच्या डोक्यात वीज चमकली असावी. तो चटकन म्हणाला, “एक मिनिट. म्हणजे हा सगळा बनाव होता की काय? दोस्त लोक आपल्याला पद्धतशीर गुंडाळले गेले आहे.”

“कसे शक्य आहे? आजी तर खरीखरी खोकत होती.” श्रेयसला अजूनही असलेली शंका आजीने मिटवली. पलंगावर उठून बसत ती म्हणाली, “खरीखुरी खोकण्याची नक्कल करत होती.”

मुलांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. सगळ्यात आधी अनन्याच सावरली आणि माझ्यावर चिडली. “नवाथे बाई शिरल्या आहेत का तुझ्यात? प्रयोग कसले करते शिकवण्यासाठी? आम्ही किती घाबरलो होतो.”

“आजी तू तरी यांना सामील व्हायला नको होतसं. या खोट्यानाट्या नाटकात मी मात्र खराखुरा रडलो.”

“नीट ऐका मी काय सांगते ते. तुमच्या कालच्या सुपरहिरोवाल्या कल्पनेमुळे मला हे सुचले. मुळातच कॅप किंवा टोपी घालणारा, जादू किंवा सुपरपॉवरवाला सुपरहिरो प्रत्यक्षात अस्तित्वात नसतोच. ज्या ज्या आणीबाणीच्या प्रसंगी आपण स्वतःसाठी किंवा इतरांसाठी काहीतरी असामान्य करतो त्या त्या क्षणापुरते आपण सुपरहिरोच असतो. नाहीतर चार वर्ष जिवापाड जपलेला पैसे टाकण्यासाठी वापरलेला ससुल्या आराध्यने तोडूच दिला नसता. शाळेपर्यंत नेण्या-आणण्यासाठी आईची वाट बघणारे तुम्ही शाळेपर्यंत एकटे धावला नसता. कोणीही मोठे माणूस आजूबाजूला असते तर तुम्ही जे केले त्याचा विचारही केला नसता. मग तुमच्यातला सुपरहिरो जागविण्यासाठी आम्ही तिघींनी हा बेत केला आणि आजीआजोबांना त्यात सामील केले.”

“याचा अर्थ आलेल्या संकटाचा धीराने सामना करणारा तो सुपरहिरो” – अनन्या.

“आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यातून समस्येवर उपाय शोधणारा तो सुपरहिरो” –श्रेयस.

“भीती वाटली तरी हिमतीने पुढे पाउल टाकण्याची हिमत करणारा तो सुपरहिरो” – आराध्य.

“आणि आपल्या दोस्तांसोबत कोणत्याही परिस्थतीला सामोरा जाणारा तो सुपरहिरो” – सौम्या.

“बरोबर. त्यासाठी कॅप, टोपी, जादू किंवा सुपरपॉवर उपयोगी पडत नाही. शक्ती आणि त्यापेक्षा महत्त्वाची युक्ती असावी लागते.” मी म्हटले.

“म्हणूनच आभाळाएवढी ताकद असणाऱ्या चार पातशाहांशी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराज लढू शकले.” सौम्याची आई म्हणाली.

“म्हणजे महाराज पण सुपरहिरोच की” अनन्या आनंदाने म्हणाली. छत्रपती शिवाजी महाराज हे तिच्या आणि माझ्याही श्रद्धेचे स्थान होते.

“कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन फुलवणारे बाबा आणि साधनाताई सुद्धा सुपरहिरो”, श्रेयस म्हणाला.

“आता कळली नवाथे बाईंची माईंड ब्लोईंग आयडिया”, आराध्यचे डोळे लकाकले.

“मग आता आमच्या सुपरहिरोंसाठी आम्ही बक्षीस आणले आहे बरे का!”, असे मी म्हटले आणि आम्ही तिघींनी हातातल्या पिशव्यांमधला खजिना मुलांसमोर ओतला.

त्यात शिवरायांच्या गोष्टी सांगणारे पुस्तक तर होतेच शिवाय होता फास्टर फेणे, बोक्या सातबंडे, चिंगी आणि गोट्याही. कॅप न घालणारे, सुपरपॉवर नसणारे तरीही सुपरहिरो.

- निवेदिता मोहिते

[email protected]