मुलांना लहानपणीच पुस्तकं वाचून दाखवावी या विषयावर आम्हा मैत्रिणींची चर्चा व्हायची. त्यातल्या एका खास मैत्रिणीने तिच्या मुलासाठी ७-८ वर्षांपूर्वी घेतलेली 'राधाचं घर ' मालिकेतली सगळी पुस्तकं उर्वी साधारण दीड वर्षांची असताना आणून दिली. त्या पुस्तकांनीच उर्वीला मराठी गोष्टीच्या पुस्तकांची ओळख झाली. पुस्तकं वाचताना मी एक नियम पाळला तो म्हणजे पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव आणि प्रकाशकाचं नाव हेही वाचायचं. हे वाचून दाखवल्यामुळे 'माधुरी पुरंदरे' ही अक्षरं तिला परिचयाची झाली. आणि मग राधाच्या घरापासून सुरू झालेला प्रवास वयाच्या पुढच्या पुढच्या टप्प्यात यश, केतकीपर्यंत; पाचव्या गल्लीत, सख्खे शेजारीपर्यंत पोहोचलाय. त्या पुस्तकांमुळे मराठी मध्यमवर्गाचं भावविश्व, मराठी माणसांची नाती, त्यांची घरही चित्रमय रूपात उर्वीपर्यंत पोहोचलं. या लेखिकेने सजग पालकांना जे जे पाल्यांपर्यंत पोहोचवायचं आहे, ते ते पोहोचवायला, ते ते सांगायला खूप चित्रं, किस्से, निसर्ग, नाती, घटना, आवडी, स्वभाव, दिनक्रम, सद्यपरिस्थिती यांच्या साहाय्याने मदतच केली आहे.

एक दिवस या आवडत्या लेखिकेबद्दल लिहायची संधी मिळाल्यावर विचार करताना जाणवलं की, त्यांच्या  बालसाहित्याबद्दल लिहिताना एक वाचक, एक बालवाचक आणि एक पालक या तीनही अंगाने लिहायला हवं. वाचकांच्या या तीनही दृष्टिकोनातून त्यांच्या सर्व पुस्तकांकडे पाहता येईल.

जी जी मूल्य, जी शिकवणी, बऱ्या वाईटाचा विवेक, आपल्या पाल्यांना न सांगता स्वतःहून यावा असं पालकांना वाटतं, ते ते गोष्टीरूपात माधुरी पुरंदरे करून देतात. राधा, यश, केतकी, ही रूपं धारण करून आलेल्या पात्रांकडून लहानातल्या लहान वयापासूनची मुलं काय आणि कसं वागावं हे शिकतात. 'राधाचं घरं'मधून बालवयातच नाती समजून घ्यायची प्रक्रिया घडते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच ही पुस्तकं ऐकताना बालवाचक रंगून जातात. म्हणूनच अनेक बालश्रावकांना ही पुस्तकं पाठही होतात. 'यश'च्या मालिकेतली 'पाहुणी', 'हात मोडला, 'कंटाळा', 'मुखवटे ', 'मामाच्या गावाला', 'मोठी शाळा', तसंच 'आमची शाळा' ही पुस्तकं म्हणजे साधारण तिसऱ्या, चौथ्या वर्षांपासूनच्या बालवाचकांना वाचून दाखवायची पुस्तकं! (किंवा अनेक पालक मुलांच्या वाचनाचीही या पुस्तकांपासून सुरुवात करतात. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांत असल्याने दोन्ही भाषा आणि त्यातलं वाचन सुरू करण्यासाठी ही उत्तम पुस्तकं आहेत.) त्या वयोगटातल्या मुलांच्या जीवनाचे विविध पैलू यात उलगडून दाखवल्यामुळे बालवाचक बरेचदा यशसारखं घर आवरायला मदत करतात. 'पाहुणी' कथेची आठवण करून दिल्यावर मित्रांचं कौतुक केल्यावर रागावत नाहीत. लहान शाळेच्या पुढे काय हे 'मोठी शाळा'मधून समजावून घेतात. 'आमची शाळा'मधली प्रक्रिया तर मुलांना बालवाडीच्या पुढच्या वयात गेल्यावर वाचायला पुन्हा पुन्हा आवडते. शेजारी भाग एक आणि दोन ही पुस्तकं साधारण ५-६ या वयोगटातली पुस्तकं! त्यातली केतकी आपले शेजारी, समाज याबद्दल बोलत असते. तिच्या, तिच्या मावशी-आजीच्या नजरेतून टिपलेलं आणि समाजातल्या बदलाचं चित्र या गोष्टींमधून येतं. 'राधाचं घर', 'यश'ची पुस्तकं, शेजार या क्रमशः सारख्या भासणाऱ्या पण तरीही स्वतंत्रपणे वाचनाचा आनंद देणाऱ्या पुस्तकांमधून लेखिका सामाजिक, भौगोलिक, पर्यावरणीय, कौटुंबिक बदल इतके बेमालूमपणे टिपते, की बालवाचकाला धक्का न देता, तरीही न लपवता समाजातले बदल सकारात्मकरित्या पचवण्याइतके साधेसोपे करून टाकते. उदा., केतकीचे आई-बाबा वेगवेगळे राहत असणं हे सख्खे शेजारी आणि पाचवी गल्लीत अशा पद्धतीने मांडलंय की केतकीबरोबर बालवाचकालाही त्यांचे पालक 'घटस्फोट' ही संकल्पना नकळत समजावून सांगू शकतील. 

लेखिकेची कथासूत्र समाजाशी घट्ट नाळ जोडणारी, मुलांच्या मनातल्या उलथापालथीचं चित्रण करणारी असतात. म्हणजे एकीकडे या लहान मुलांच्या, मुलांसाठीच्या कथा खूप काही सांगून जातात. साहित्य हे समाजाचं  प्रतिबिंब असतं, हे विधान या साहित्यालाही लागू पडते. 'काकूचं बाळ'मध्ये सर्वच ३ ते ६ वयोगटातल्या बालांना अगदी तान्ह्या बाळाचं आगमन स्वतःच्या किंवा जवळच्यांच्या घरात झाल्यावर काय जाणवतं ते सगळं प्रसंगरूपात आलेलं आहे. बाळांच्या त्याच भावना 'बाबुल दादा होणार' या सस्यांच्या गोष्टीतून व्यक्त होतात. 'नंदू आणि बुवा कुsक'मध्ये बुवाची वाटणारी भीती घालवायला लहान मुलांसमोर एक उदाहरणच ठेवले आहे.

माधुरी पुरंदरे यांच्या पुस्तकांमधून बालवाचकांमध्ये सकारात्मक बदल होतो तो केवळ सामाजिक, वागणुकीच्या अंगाने नव्हे, तर बौद्धिक विकासाच्या अंगानेही. 'बाबाच्या मिश्या'मधली अनू वेगवेगळ्या मिश्या असल्या की ती व्यक्ती कोणता चरित्र नायक साकारू शकते याची कल्पना करते. तिची ही कल्पनाशक्ती म्हणजेच लहान मुलांची प्रतीकात्मक कल्पनाशक्ती आणि लहान मुलांबद्दलचं अनूचं मत म्हणजे सगळ्याच लहान मुलांचं मत. 'मासोळी आणि चिमुकलं पाखरू'मधल्या मासोळीला आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही हे तिच्या आईवडिलांनी इतकं चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं, की यातून पालकांनाही पालकत्वासाठी मुद्दे मिळतात आणि पाल्यांनाही बोध मिळतो; तोही नकळत. तसंच बबीच्या गोष्टीतून मदत करताना स्वतःची काळजी घ्यायला बालवाचक शिकतील, तर आळशी मधमाशीमुळे आळस सोडायला शिकतील.

'श्यामाची गंमत'मधल्या शाम्या हा 'लहान मुलं मोठी होताना मोठी माणसं लहान होणार' अशा पद्धतीने विचार करणाऱ्या सर्व लहान मुलांचा प्रतिनिधी आहे. त्यांच्या या विचारप्रक्रियेतून आलेली गंमत या कथेत येते. 'अकुला भेटला दोस्त'मध्ये मैत्री होण्यासाठी, ती स्वतःहून करण्यासाठी काय काय करावं लागतं हे सहजरीतीने आलेलं आहे. मुलांना निखळ आनंद देणं, नकळत चांगलं-वाईटाचं तारतम्य देतानाच विचार स्वातंत्र्य देऊन योग्य निर्णय घ्यायचं बळ देणं, त्यासाठी पालक वाचकांनाही आपल्या पालकत्व पद्धतीत कोणता, कसा आणि कधी बदल करायला हवा याचाही नकळत बोध देणं हे लेखिकेचं साहित्य नक्कीच करतं. अलीकडच्या 'वयम' दिवाळी अंकातली त्यांची 'गाढव आणि चंद्र' ही फ्रेंच कथेचं पुनर्लेखन केलेली कथा हीसुद्धा मुलांना गंमतीबरोबर विचारांची एक वेगळी दिशा देऊ शकणारी आहे.

बालवाचकांना आवडणारे प्राणी-पक्षी जगत माधुरी पुरंदरे आपल्या कथांमध्ये सहजी वापरतात. त्यात मग मासे, कुत्रे, गाढव,  डुक्कर, मधमाशी, चिऊताई, मेंढी, उंदीर असे अनेक प्राणी असतात. ते केवळ त्यांच्या साहित्यात सहनायक किंवा खलनायक म्हणूनच नाही, तर नायक म्हणूनही येतात. 'डचू मधुमिलिंदा पाचवडेकर' असं नाव सांगणाऱ्या मेघनाच्या कुत्र्याची गोष्ट पूर्णतः 'डचू'ने सांगितली आहे. त्याच्या भावविश्वातून तो इतर पात्रांविषयी बोलतो. या कथेत डचूची लांबी, उंची, रंग, वय या पद्धतीने दिलेली माहिती ही खासच वाटते. कथेतले हे पात्र, नायक बालवाचकांच्याही डोळ्यासमोर तंतोतंत उभा राहावं त्यासाठी ही माहिती आणि त्याचं चित्र खूप मदत करतं. बालवाचकांच्या दृष्टीने दृकमाध्यम खूपच महत्त्वाचं असतं याचा विचार माधुरी पुरंदरे यांच्या सर्वच पुस्तकांमधून केलेला दिसतो. त्या स्वतः चित्रकार आहेत हेही विसरायला नको. त्याचे परिणाम पात्र उभे करताना होतोच. राधा, यश, अनु, केतकी, चुटकी, परम, श्याम्या, डचू, अटटू, लालू, बुदगुल्या, सलीम, इत्यादीची चित्र त्यांची वैशिष्टय दर्शवणारी आहेत. कार्तिकचा 'किकीनाक' हे पात्र तर त्याचं वर्णनं, त्याचे रंग आणि चित्र या सर्वच बाबतीत खास आहे. लेखिकेने पात्रांना दिलेली नाव काही अगदी नेहमीच्या ऐकण्यातली आणि काही अतिशय कल्पक पण लक्षात राहणारी आहेत. अगदी छोट्या गटापासून सुरू करून माधुरी पुरंदरे पाचवीच्या, पुढे १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीही लिहितात. सामान्य मुलांपासून अतिसामान्य, तर काही वेळा खास मुलांच्या विश्वात डोकावतात. चुटकीसारखं  'खजिना'मधलं पात्रं असो, की परम कथेचा नायक असो, की पुढे 'त्या एका दिवशी... ' कथेतले नायक-नायिका असोत, मुले खूप वेगळ्या पद्धतीनं विचार करतात हे दाखवलं आहे.

'त्या एका दिवशी'सारख्या लघुकथात्मक पुस्तकातून पौगंडावस्थेतल्या मुलांचं 'मोठं होणं', केवळ शरीरानेच नाही, तर विचार करून - विश्लेषण करून त्यावर कृती करणं या त्यांच्या परिपक्वतेकडे झुकणाऱ्या प्रक्रियेचा आलेख खूप पद्धतशीरपणे जाणवतो. एक मोठ्या वयातला वाचक म्हणूनही कथेची उत्कंठा तेवढीच ताणली जाते, जेवढी ती बालवाचकांचीही जाईल. कथेतल्या गौतमचं मोठं होणं हे घरातल्या नवीन पिढीचं (विचाराने पुढच्या पिढीचं ) मोठं होणं आहे. चोराला पकडून देण्यासाठी काय करायला हवं आणि आईबाबांचं भांडण कसं सुटेल या विचाराने अस्वस्थ होणारा गौतम हा केवळ सुपरहीरोच्या टाईपचा नाही, तर साध्या मुलांपैकीच एक असा नायक आहे हे जाणवतं. 

याच पुस्तकातली 'मला क्रियापद भेटले तेव्हा....' ही कथा तर मुलांसाठी हसतखेळत शिकवण्याची एकच इच्छा असणाऱ्या पालकांसाठी आणि ते पद्धत स्वीकारणाऱ्या मुलांसाठी मेजवानीच आहे. एका क्रियापदातली क्रिया आपल्या आयुष्यात कधी, कुठे, कशी, कुणामुळे, का आली असा निबंध लिहिता लिहिता कथानायिका चिन्मयी 'मरण' या क्रियेभोवतीच्या गोष्टी सांगतेय अशी ही कथा.  हातातून न सोडवणारी ही कथा लिहिता लिहिता लेखिका नकळत तत्त्वज्ञानावरही चर्चा घडवून आणते.

कथात्मक साहित्याशिवायचे माधुरी पुरंदरे यांचे कागदी खेळ हे पुस्तक तर अफलातून आहे. त्यातली पात्रे मुलांनी रंगवून छोटीशी नाटुकली करण्यासारखी आहेत. त्यासाठी त्यांच्या कागदी बाहुल्या तयार करायचा सेटही दिला आहे. हेही त्यांचे बालांसाठीचे  साहित्यच आहे. बालांमधली निरीक्षण शक्ती,  शब्दसाठा, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, अनुभवसंपन्नता, बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी, विकसित करण्यासाठी चित्रवाचनाची पुस्तकेही आहेत. आत्तापर्यंत 'साहित्य अकादमी पुरस्कारा'सह अनेक पुरस्कार मिळालेल्या या लेखिकेचे साहित्य बालसाहित्यातला मोठा खजिनाच आहे. 

                                                                 -पल्लवी गाडगीळ
                                                         [email protected]