“त्या दिवशी मला समजलं, ज्यांना मुलांपेक्षा चांगल्या साड्या आवडतात. अशा बायका मुलांची तेल लावून चंपी करतात!!!

त्यांना ती मुलं चंपी काकू म्हणतात.”

आणि ज्यांना चांगल्या साड्यांपेक्षा सुद्धा तेलकट, तुपकट मुलं आवडतात. अशा मुलांना त्या बायका मायेने आपल्या मांडीवर घेतात! त्यांना ती मुलं प्रेमाने आई... म्हणतात!”

हे मनोगत ‘पार्वतीबाई’ या बालकथेतील एका ३ ते चार महिन्याच्या बालकाचे. आणि या कथेचे लेखक आहेत, राजीव तांबे.

गेली अनेक वर्षं राजीव तांबे सातत्याने मुलांसाठी काम करत आहेत. मुलांना आनंददायी शिक्षण मिळावे व त्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला वाव मिळावा यासाठी ते शिक्षक तसेच पालकांच्या कार्यशाळा, कार्यक्रम घेतात. त्यांचे पालकांना मार्गदर्शन करणार्‍या लेखांचे ‘छोटीसी बात’ हे पुस्तक तसेच ‘गंमतशाळा’ हे वैज्ञानिक प्रयोगावर आधारित पुस्तक गाजले.

‘गंमतशाळे’ची कल्पना त्यांना ‘तोत्तोचान’ या तेस्तुको कुरोयानागी यांच्या पुस्तकावरून सुचली. ‘सृजनघर’ या नावाने आपल्या दोन मुलींना (सई आणि गायत्री) हाताशी घेऊन वीस वर्षापूर्वी त्यांनी शाळा सुरू केली होती. ही शाळा सलग पाच वर्षे चालली, ‘जे देत नाही शाळा ते देते गंमतशाळा’ हे या शाळेचं घोष वाक्य म्हणता येईल, जे खऱ्या अर्थाने सार्थक ठरलेले दिसते.

या शाळेतील प्रयोग किंवा खेळ कुठल्याही घरात किंवा शाळेत सहजी उपलब्ध असणाऱ्या गोष्टी घेऊन शून्य खर्चात राजीव तांबे यांनी केले. महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला शनिवारी भरणारी शाळा नंतर रविवारीसुद्धा सुरू राहिली. येथील प्रयोग मुलांच्या कल्पनेला वाव देणारे असतात. पुढे या नावाचे सदरही ‘लोकसत्ता’ या दैनिकातून सलग दीड वर्षे चतुरंगमध्ये सुरू होते. या सदरामध्ये त्यांनी पुन्हा मुलांच्या जिज्ञासेला विशिष्ट दिशा देण्याचे काम केले. उदा., ‘ता ना पी ही नी पा जा का?’ यात इंद्रधनुच्या रंगाबद्दल केलेलं विश्लेषण पत्राच्या माध्यमातून असल्यामुळे भाषेतील ओलावा मनाला स्पर्शून जातो. जणू आपणच हे प्रश्न उपस्थित केलेत आणि त्याची उत्तरे राजीव तांबे आपल्याला देत आहेत, हे स्वरूप मस्त आहे.

‘पालकासाठी मूलमंत्र- छोटीसी बात’ हे पुस्तकाचे शीर्षक खूपच बोलके आहे. ‘रेड अलर्ट’, ‘अपेक्षा पिपासू पालक’, ‘सुवासिक फिनेल’, ‘रंग बदलू पालक’, तसेच कथेतील शीर्षाकांचीही अशीच गंमत आपल्याला दिसते. या कथांमधून ते आपल्याला प्राण्यांच्या सृष्टीत घेऊन जातात, पण त्याच वेळी माणसाचे भावविश्वही उलगडून दाखवतात. ‘झुरळू’, ‘मगरू’, ‘कावळु’, ‘घुबडू’, ‘मांजरू’, ‘चिमणू’ या कथांमधील ही सगळी पिल्लं आहेत. त्यांच्या बाळलीला या कथांमध्ये वाचायला मिळतात. चित्रांची रेलचेल जरी या कथांमध्ये असली तरी संवादातील सहजतेमुळे जणू आपण आपल्या पाल्याशीच संवाद साधत आहोत, असा भास निर्माण करण्यात आणि त्यातून संवाद साधण्याची किमया त्यांनी सगळ्या पालकांना सांगून टाकलेली आहे. उदा., ‘झुरळू’मध्ये आपल्या पिलाला झुरळ म्हणते , “जे माणसं खातात तेच आपण खायचं किंवा ‘डूकरू’ या कथेत आई म्हणते, “आपण माणसासारखं वागावं, ताजं खावं शिळ फेकून द्यावं” तर दुसरीकडे म्हणते, “आपण माणसासारखं वागू नये. लहानांना मारू नये. माणसं घरात राहतात आपण गावात राहतो.” मानवाला आणि त्यातल्या पालकत्वाला दिलेली ही शाब्दिक समज भारी आहे.

त्यांच्या या कथांमधून प्राण्यांचे विशेषही सहज दिसतात, (जे आपण वाचता वाचता सहज मुलांना सांगू शकतो.) म्हणजे झुरळ आपल्या मिशांनी फटके देते. मगर आपल्या शेपटीने मारते. किंबहुना ‘शूर ससोबा’मध्ये आई बाजारात जाताना ससोबा आईला सांगतो, “तू माझ्यासाठी गाजर, मुळा घेऊन ये.”

राजीव तांबे यांच्या कथांचा प्राण छोट्या छोट्या मुलांच्या भावविश्वाला धरून असला तरी त्यातल्या आशयाचा आवाका मोठा असतो. या कथांमध्ये कुठलेही शिकवणुकीचे पाठ पढवले जात नाहीत, तर सहज आणि साध्या उदाहरणाने या कथा मर्मज्ञ होतात. लहान थोरांच्या मनाला गवसणी घालत संवादी होतात. उदा., ‘जसजशी परीक्षा जवळ येऊ लागते, तसतशी घरातली गुलाबी थंडी संपू लागते. घरात दिवसा ढवळ्या खारे वारे आणि मतलबी वारे वाहू लागतात. अभ्यासाचा विषय निघाला की त्यांची चक्रीवादळे होतात.’

हेच वेगळेपण त्यांच्या नाटुकलीमध्येही पाहायला मिळते. मुलांना ‘भूत’ नामक गोष्टीबद्दल एकाच वेळी असलेली भीती आणि उत्सुकता याचं समीकरण राजीव तांबे या नाटुकली मधून मांडलय. ‘प्रेमळ भूत’ही नाटुकली चार भागांमध्ये आहे. मुलांनी अभ्यासापासून दूर पळू नये अभ्यास प्रत्येक गोष्टीत कसा महत्त्वाचा असतो हे सांगताना भूतही म्हणते, मेल्यावर कोणालाही भूत होता येत नाही. त्यासाठी खूप परीक्षा द्याव्या लागतात. उदा., तोंडी, लेखी, प्रक्टिकल आणि प्रोजेक्ट असतात. स्मशानात दर अमावस्येला मध्यरात्री जळत्या चितेत अंघोळ करावी लागते, प्रथम घुबडाची भाषा १९ दिवसांत शिकावी लागते...” यातील एका नाटूकलीत ‘बंडू बडबडेचा अभ्यास’ आणि त्याने लावलेले शोध वाचले की, मुलांना सतत प्रश्न पडले पाहिजेत आणि आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला सक्षम असले पाहिजे, हे नकळत जाणवून जातं.

याशिवाय मुलांसाठी त्यांनी गाणी-कविता-गोष्टी लिहिल्या आहेत. सोबत कादंबरीही लिहिली आहे. 'साहसी', 'पिंकू', 'गुरूदक्षिणा' त्यांच्या ध्वनीफितीही आहेत, ज्यात इसापच्या गोष्टी, गाणी आहेत.  

तसेच काही स्वयंसेवी संस्था, युनिसेफसारख्या संस्थांसोबत काम केल्याने आजवर त्यांनी महाराष्ट्र तसेच भारतातील अनेक शाळांना भेटी दिल्या आहेत. त्यातही आदिवासी भागातल्या, दुर्गम प्रदेशातल्या शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुलांसाठी त्यांनी काम केले आहे.

लेखातून, गोष्टींमधून, कार्यशाळा, तसेच टीव्ही शोजमधून मुलांना, त्यांच्या भावविश्वाला समजून घेण्याची त्यांची धडपड आपल्याला प्रेरणादायी आहे. त्यांनी अध्यापनाचे कौशल्य, नवीन स्वाध्याय निर्मिती, पालकांसाठी कार्यक्रम घेतलेले आहेत. अभ्यास कसा करावा? असे  विविध उपक्रम ते राबवताना दिसतात. प्रसार-माध्यमांचा वाढता बाजार आपल्या अवतीभवती असला तरी ते याच प्रसारमाध्यमांची गरज लक्षात घेऊन ते मुलांपर्यंत सहज पोहोचाताना दिसतात. त्यांनी सांगितलेल्या या चिनी म्हणी प्रमाणे “उंच उडी मारण्यासाठी, भरारी घेण्यासाठी अपयशाचा स्प्रिंग बोर्ड वापरावा लागतो. तर २०१३ साली भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते सुरुवातीला म्हणाले होते. बाल साहित्याबाबत भूतकाळाचा तपशीलवार आढावा न घेता वर्तमानात राहून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे...!  हेच वैशिष्टय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सतत जाणवतं राहत.

 

- शारदा गांगुर्डे 
[email protected]